Total Pageviews

Sunday, 9 April 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २४४


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २४४
छत्रपती राजाराम महाराजांचा इतिहासप्रसिद्ध जिंजीचा प्रवास !
लेखक : डॉ. जयसिंगराव पवार (पुढारी, २९.३.२०००)
भाग २
३. कोणत्याही परिस्थितीत राजास पकडायचे, असा चंग औरंगजेबाने बांधला असणे आणि कोणत्याही परिस्थितीत शत्रूस चकवा देऊन जिंजीस पोहोचायचे, असा राजाचा कूटनिश्चय असणे
‘आपल्या दबावामुळे मराठ्यांचा नवा राजा महाराष्ट्रातून निसटून जिंजीकडे जाण्याची शक्यता आहे’, याचा अंदाज चाणाक्ष औरंगजेबाने अगोदरच बांधला होता आणि त्या दृष्टीने दक्षिणेतील सर्व संभाव्य मार्गावरील किल्लेदार आणि ठाणेदार यांना त्याने सावधानतेचा आदेश पाठवला होता. राजा कदाचित समुद्रमार्गावरून पळून जाईल; म्हणून त्याने गोव्याच्या पोर्तुगीज व्हॉईसरॉयलाही लक्ष ठेवण्यास सांगितले होते. ‘कोणत्याही परिस्थितीत राजास पकडायचे’, असा चंग त्याने बांधला होता आणि ‘कोणत्याही परिस्थितीत शत्रूस चकवा देऊन जिंजीस पोहोचायचे’, असा राजाचा कूटनिश्चय होता.
४. पन्हाळगडाहून सरळ दक्षिणेचा मार्ग न धरता महाराजांनी शत्रूस चकवण्यासाठी पूर्वेचा मार्ग धरणे
पन्हाळ्याचा वेढा चालू असतांनाच २६.९.१६८९ या दिवशी राजाराम महाराज आणि त्यांचे सहकारी िंलगायत वाण्याचा वेश परिधान करून गुप्तपणे वेढ्याबाहेर पडले. सोबत मानसिंग मोरे, प्रल्हाद, निराजी, कृष्णाजी अनंत, निळो मोरेश्वर, खंडो बल्लाळ, बाजी कदम इत्यादी मंडळी होती. वेढ्याबाहेर
पडताच घोड्यावरून प्रवास चालू झाला. सूर्योदयाच्या वेळी सर्व जण कृष्णातीरावरील नृसिंहवाडीजवळ पोहोचले. पन्हाळगडाहून सरळ दक्षिणेचा मार्ग न धरता महाराजांनी शत्रूस चकवण्यासाठी पूर्वेचा मार्ग धरला होता. आग्र्याहून निसटतांना शिवछत्रपतींनी अशी युक्ती अवलंबली होती. ते सरळ दक्षिणेस न जाता प्रथम उत्तरेस नंतर पूर्वेस आणि नंतर दक्षिणेस वळले होते. कृष्णेच्या उत्तरतिराने काही काळ प्रवास करून त्यांनी पुन्हा कृष्णा पार करून दक्षिणेचा रस्ता धरला; कारण जिंजीकडे जायचे, तर कृष्णा आणखी एकदा पार करणे गरजेचे होते. हा सर्व वरवर ‘अव्यापारेषु व्यापार’ केवळ शत्रूस हुलकावणी देण्यासाठी होता. शिमोग्यापर्यंतचा महाराजांचा प्रवास गोकाक-सौंदत्ती-नवलगुंद-अनेगरी-लक्ष्मीश्वर-हावेरी-हिरेकेरूर-शिमोगा असा झाला.

 

No comments:

Post a Comment