हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २९३
रामशेज किल्ला मानाजी मोरेंच्या पराक्रमाचे प्रतिक - बंडातात्या कराडकर
संभाजी राजांच्या शौर्याचे प्रतीक असलेल्या किल्ले रामशेजला ऐतिहासिक व पौराणिक महत्व असल्याचे स्पष्ट करतांनाच हा किल्ला मानाजी मोरे यांच्या शूर सहकाऱ्यांच्या वीरत्वाचा दाखला आहे, असे प्रतिपादन ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी केले. श्रीरामांनी वनवासकाळात या किल्ल्यावर मुक्काम केल्यामुळेच त्याला ‘रामशेज’ असे नाव पडले. केवळ सहाशे मावळ्यांनी औरंगजेबच्या ३५ हजार मुगलांविरूध्द साडे पाच वर्षे गनिमी काव्याने लढा दिला असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने आयोजित प्रतापी संस्कार शिबीरात ‘असा लढला रामशेज’ या विषयावर बंडातात्यांचे व्याख्यान झाले. किल्ल्याला मुगलांनी दिलेला वेढा राजे संभाजींच्या सैनिकांनी परतवून लावल्यामुळे औरंगजेबही हतबल झाला होता. या रामशेजवर कुठल्याही प्रकारची शस्त्रसामग्री, तोफगोळा, पुरेसे अन्नधान्य नसतांना मुगलांची रसद रात्रीच्या अंधारात किल्ल्यावरील मावळे घेऊन जात. त्यावर साडेपाच वर्षे त्यांचा गुजारा सुरू होता. औरंगजेबाने शहाबुद्दीन फिरोजजंग याला किल्ला जिंकण्याची दिलेली जबाबदारी पूर्ण न केल्याने दुसरा मुगल सरदार बहादूरखान याला पाठविण्यात आले. किल्ल्यावरून दगडांचा वर्षांव करत मुगलांच्या सैनिकांना झुंजविणाऱ्या मानाजी मोरे यांना त्यांच्या शौर्याबद्दल राजे संभाजींनी सोन्याचे कडे दिले होते. अशा शूरत्वाची महती असलेला किल्ले रामशेज हा अभेद्य किल्ला जतन करण्याची गरज आहे, असे कराडकरांनी सांगितले.
राजे संभाजींच्या चरित्र्यावर, पुरूषार्थावर नाहक चिखलफेक करणाऱ्यांनी राजे संभाजीचा शूरत्वाचा इतिहास डोळ्याआड का केला, हा प्रश्न आजही तितकाच महत्वाचा असल्याचे कराडकर यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment