Total Pageviews

Sunday, 9 April 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २५४

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २५४
बाळाजी आवजी चिटणवीस -
बाळाजीस नेहमीच शिवरायांबरोबर रहावें लागे, त्यामुळे त्याला स्वतंत्रपणे मुलुखगिरी करता आली नाही. शिवाजी राजास इ.स. १६६६ त आग्रयास कैद केले तेव्हा बाळाजीनेही सुटकेकरिता बरेच प्रयत्न केले. तसेच सर्वच महत्त्वाच्या कागदपत्रावर चिटणिशी दरख व्हावयाचा असल्याने बाळाजीला विशेषच धोरणाने वागावे लागे. बाळाजीवर जशी मुख्य राजकीय दफ्तराची जबाबदारी होती तसेच त्याच्यावर नेहमी नाजूक वकिलतीचेहि काम करण्याची विशेष प्रसंगी जबाबदारी येई व ती तो नेहमीच सफाईने पार पाडी. विशेषत: मोंगल व इंग्रज यांच्याकडील राजकारणे बाळाजीनेंच साधली. बाळाजीच्या स्पष्टवक्तेपणाबद्दल व एकनिष्ठतेबद्दल शिवरायांनी जंजिराप्रकरणी तर चांगलीच खात्री होऊन चुकली. परंतु बाळाजीच्या शिवाजी राजाच्या जवळील निकट सहवासामुळे व विशेषतः सर्वच राजकीय बाळाजीजवळच राहिल्याने इतर सरकारकून मंडळीत मनांत त्याच्याबद्दल द्वेष उत्पन्न झाला व बाळाजीवर विषप्रयोग करण्याचा कटहि रंगला. परंतु तो शिवरायांनी युक्तीने मोडून टाकला. बाळाजीला ता. १३ ऑक्टोबर स. १६७३ रोजी पालखीचा सन्मान मिळला. बाळाजीचा अशाप्रकारे झालेला परामर्ष व तारीफ सहन न होऊन त्याच्यावर ग्रामण्य उभारून त्याला अक्षत्रिय बनविण्याचा जोराचा प्रयत्न झाला परंतु बाळाजीने त्या सर्वांचे निवारण करून शिवाजी राजांचा सहि राज्यभिषेक करविला. बाळाजीस शिवरायांनी मुख्यप्रधानपद देण्याचे ठरविले. परंतु बाळाजीने प्रधानपद स्वीकारून एखाद्या भागाचा कारभार पाहून स्वामिसेवा करण्यापेक्षा चिटणविशीच करून मुख्य व सर्वच राज्यसूत्रे आपल्या हाती ठेवून निरभिमानी व निस्वार्थी स्वामिसेवा व देशसेवा करण्याचा हट्ट धरिला. बाळाजीची लेखनशैली इतकी साधी, स्पष्ट व पूर्ण असे की, त्यामुळे राजकीय हुकुमांत कधीहि घोटाळ उडत नसे. काम करण्याची धर्तीहि त्याच प्रकारची होती. त्याच्या दूरदर्शी व चाणक्षबुध्दीवरून विजापूरकर, भागानगरकर व मोंगल याच्याकडून त्याला फितवण्याचे नेहमी प्रयत्न होत असत. परंतु ते नेहमी निष्फळ ठरत . रायगडी आल्यानंतर संभाजीे राजांनी बाळाजीला जितक्या मानाने वागविता येईल तितक्या मानाने वागविले व कारभारहि तसाच घेतला. इंग्रजाकडील राजकारणहि बाळाजीने तसेंच पुढे चालविले. परंतु संभाजी राजाच्या राज्यारोहणानंतर अनाजी यांनी जो दुसरा विषप्रयोगचा कट केला त्यांत बाळाजीला कलुशा व दादजी रघुनाथ यांनी खोडसाळपणानें गुंतवून संभाजीस खोटेंच सांगून त्याला मारण्याची अर्धवट आज्ञा घेतली, व बाळाजी, त्याचा भाऊ चिमणाजी व पुत्र आवजी यांस परळीखालीं स. १६८१ च्या आगष्टांत ठार मारलें बाळाजीची स्मृति फारच तीव्र होती. तो एखादें लांबलचक पत्र एकदां ऐकूनहि दोन तीन वेळां सहज बिनचुक म्हणून दाखवी. राजकारणांत तो फारच दक्ष होता व त्यानें राज्यकारभाराचा गाडा सावधगिरीनें व सफाईनें हांकल्यामुळें तो शिवाजीचा एक हात होऊन राहिला होता. मराठयांच्या इतिहासांत एकनिष्ठेचें पहिलें उदाहरण जसें बाळाजी आवजी आहे तसेंच मोडीलेखनांत सुबोध व स्पष्ट वळणाचाहि आद्यमान बाळाजीकडे आहे (वा.सी. बेंद्रे.)

No comments:

Post a Comment