भाग २३९
मराठा सरदार अंताजी माणकेश्वर
भाग २
अहमदनगर जिल्हाच्या पश्चिमेस पंडेपेठ वडगांव परगण्याच्या गांवी (म्हणजे आताचे सुपे) 1695 मध्ये माणकेश्वरांचा पिता माणकेश्वर लिंगोजी व माता-काशिबाई यांचे पोटी जन्म झाला. लहानपणापासून बाळ अत्यंत धीट व हुशार व शेवटपर्यंत एखादी गोष्ट तडीस नेणारा होता. एकदा घरी आलेल्या नाथ पंथी साधूला लहानग्या ‘बाळ’ ने प्रश्नांचा भडिमार करुन सळोकीपळो करुन सोडले. साधू त्याकडे पाहून म्हणाला ‘‘ हा बाळ एक तर कुणाचा तरी अंत करेल किंवा सत्यासाठी स्वत:चा स्वत: सतत पुढे राहून अंत पाहिल. हा अंताजी !’’ पंडेपेठ वडगांवच्या भिक्षुक लिंगोजी जोश कुलकर्णी यांच्या घरात ‘बाळा’ चे नामकरण ‘अंताजी माणकेश्वर’ झाले. तोपाच वर्षांचा असतांनाच पितृछत्र हरपले. त्यात भीषण दुष्काळ पडला. मोठे चुलते नरसोपंत लिंगोजी यांच्या बरोबर शिक्षण व उदरनिर्वाहासाठी अंताजी देशावरुन हिन्दुस्थानात गेला कनौजास. तिथे नरसोपंत उदरनिर्वाह तर अंताजी हा कनौजी ब्राम्हण रामचंद्र पंताकडे शास्त्र व शस्त्राचे शिक्षण घेऊ लागला. कठोर परिश्रमसह शास्त्र अन् शस्त्र शिक्षेबरोबरच महान सुफी संत हयात बाबांकडे संगीत कलेचेही शिक्षण घेऊ लागला. इकडे वडिल बंधू हरिमाणकेश्वर दुष्काळी परिस्थितीतही जोश कुलकर्णी पद सांभाळत होते. आई काशिबाईच्या आठवणीने लहानग्या अंताजीचे सारे शिक्षण कनौज देशी नीट चालले होते. काही वर्षे गेली अन् देशावरची खबरबात घ्यायला चुलते नरसोपंत गेले ते परतलेच नाही. पुढे त्यांचे काय झाले याचाही ठिकाणा लागला नाही. पुढे अंताजीचा सर्व सांभाळ रामचंद्र पंतानी केला, हयात बाबांनी मोठा आधार दिला. दहा वर्षे निघून गेली. अंताजी आता शास्त्र निपुण, शस्त्र पारंगत आणि संगीतात माहिर झाला होता. कनौजी भाषाही तो उत्तम बोलत होता. देशावरचे मराठा राजे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (थोरले) हे मोगलांचे मुक्त कैदेत असताना औरंगजेबाच्या छावणीबरोबर फिरत कनौजास आले. तेव्हा रामचंद्रपंत आणि हयात बाबांकडे मैफिल जमली. अंताजीचे गाणे झाले. हयातबाबांनी अंताजीचा महाराजांशी परिचय करुन दिला. ‘‘यह आपका ही मरहठ्ठा है’’ छत्रपतींनी कौतुकाने अंताजीस जवळ घेतले. रामचंद्र पंतांनी सर्व हकिकत कथिली. महाराजांनी अंताजीस देशावरचे आवतण दिले. कैदेतून सुटका झालेवर देशात परत जाईन व सत्ता स्थापन करून माझे पदरी तुज ठेवून घेईन असे आश्वासन दिले. दुसरे दिवशी या तरुण अंताजी बरोबर महाराजांनी तलवारीचे दोन हात करुन त्याची शस्त्र निपुणताही अजमावून पाहिली.
No comments:
Post a Comment