Total Pageviews

Sunday, 9 April 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २४७

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २४७
छत्रपती राजाराम महाराजांचा इतिहासप्रसिद्ध जिंजीचा प्रवास !
लेखक : डॉ. जयसिंगराव पवार (पुढारी, २९.३.२०००)
भाग
८. खानाला कैद केलेल्यांमध्ये प्रत्यक्ष मराठ्यांचा राजा दिसणे आणि नंतर तो नकली असल्याचे त्याच्या लक्षात येणे
या चकमकीत अनेक मराठे मारले गेले. कित्येक कैद झाले. खानाला कैद केलेल्यांमध्ये प्रत्यक्ष मराठ्यांचा राजा दिसला. त्याच्या आनंदास पारावार राहिला नाही. त्याने तातडीने बादशहाकडे हे वृत्त धाडले. बादशहाने राजास सुरक्षाव्यवस्थेने (बंदोबस्ताने) आणण्यासाठी विशेष सैन्य रवाना केले; पण लवकरच अब्दुल खानाच्या लक्षात आले की, आपण पकडलेला मराठ्यांचा राजा नकली आहे. सिद्दी जोहरच्या वेढ्यात शिवछत्रपतींचे असेच सोंग करून शिवा काशीद याने शत्रूस चकवले होते. हिंदवी स्वराज्याच्या होमकुंडात या वेळी अशाच प्रकारे आत्मबलिदान करून एका अनामिक मराठ्याने
मराठ्यांच्या छत्रपतीस वाचवले होते. धन्य तो अनामिक मराठा बहाद्दूर वीर ! त्याच्या बलिदानाने मराठ्यांचे स्वातंत्र्य-समर अधिक तेजस्वी झाले.
९. आता मोगलांनी सर्व संभाव्य मार्र्गांवर हेरांचे जाळे पसरल्याने राजाराम महाराज आणि त्यांचे सहकारी यांनी नाना प्रकारची वेषांतरे करून आपला खडतर प्रवास चालूच ठेवणे
शिमोग्यापर्यंतचे अंतर राजाराम महाराज आणि त्यांचे सहकारी यांनी घोड्यांच्या पाठीवरून तोडले होते; पण आता मोगलांनी त्यांच्या सर्व संभाव्य मार्गांवर हेरांचे जाळे पसरल्याने घोड्यावरून प्रवास धोक्याचा ठरला. तेव्हा त्यांनी यात्रेकरू, तडीतापडी, कापडी, व्यापारी, भिक्षेकरी अशी नाना प्रकारची वेषांतरे करून आपला खडतर प्रवास चालूच ठेवला. ठिकठिकाणचे चौक्या-पहारे चुकवत त्यांनी शिमोग्याच्या आग्नेयेस १७० मैलांवर असणारे बंगळूर गाठले.

No comments:

Post a Comment