राजस्थानातील मुसंडी
भाग ३
मराठय़ांनी तोपर्यंत माळव्यात आपले पाय उत्तम रोवले होते. १७२६च्या पूर्वार्धात मराठी फौज मेवाड, कोटा आणि बुंदीत उतरली. मराठय़ांच्या हल्ल्यात त्यांना फार लूट हाती लागली नाही. सवाई जयसिंहाने आता इतर राजपुतांना मराठय़ांविरुद्ध एकत्र येण्यासाठी परत आवाहन केले. त्याने जोधपूरपासून सगळीकडे भराभर पत्रे पाठवली. त्यावेळी कोटय़ाचा महाराव दुर्जनसालाने जयसिंहाला संपूर्ण पाठिंबा दिला. जयसिंहाने आपला एक वकील साता-याला पाठवला. १७३० पर्यंत जयसिंहाने मराठय़ांशी सलोखा साधला.
१७३३ मध्ये नाहरगढाचा किल्लेदार नाहरसिंह याने कोटय़ाच्या राजाचे अधिपत्य अमान्य करून स्वत:ला सार्वभौम म्हणून घोषित केले. त्याने इस्लाम स्वीकारून स्वत:ला नाहरखान म्हणवले. दुर्जनसालाने शाहूराजांकडे दूत पाठवून नाहरखानाचा बंदोबस्त करण्याची विनंती केली. शाहूराजांनी त्यांचे तीन सरदार नारो विठ्ठल, कृष्णाजी आणि उदाजी पवार यांना कोटय़ास जाण्यास सांगितले. त्याच वेळी पिलाजी जाधवराव पार्वती आणि अत्रू या नद्या उतरून आला. तेथे असूजी नावाचा एक मराठा जहांगीरदार होता.
दुर्जनसालाने पिलाजीस १.५० लाख रुपये देतो, असे सांगून नाहरखानावर पाठवले. पिलाजीने नाहरखानाचे मूळ उखडून काढले. नाहरगढ ताब्यात घेऊन पिलाजीने तो दुर्जनसालास दिला. त्याने पिलाजीस दीड लाख रुपये दिले. मराठयांशी महारावाचे संबंध चांगले राहिले. पुढे जयसिंह आणि अभयसिंहाच्या राजकारणाला कंटाळून दुर्जनसाल हा मुघल खानदौरानला मिळाला. त्यावेळी मराठय़ांनी मुघलांचा मोठा पराभव केला. मराठय़ांचे नंतर कोटय़ावर वर्चस्व राहिलेच.
No comments:
Post a Comment