Total Pageviews

Friday, 4 August 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३८३

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३८३
सरजा सिवाजी जंग जीतन चलत हैं । (उत्तरार्ध)
भाग १३
हजार स्वारांसकट ते निघाले. सोबत काकाजीपंत पेशवे, जगन्नथपंतलु, शिवाजीपंतलु कोन्हेर, महदेव मुजुमदार हे होते. खेरीज शहाजीराजांच्या नाटकशाळेचे २ पुत्र प्रतापजीराजे व भिवजीराजे हे देखिल होते. महाराजांचे अजून एक सावत्रबंधू संताजीराजे हे महाराजांना कदाचित आधीच येऊन मिळाले होते. त्यांना महाराजांनी हजार स्वारांची सरदारकी दिली. स्वत:चे वडिलपण विसरुन महाराज स्वत: त्यांना तिरुपन्नृती गावापर्यंत सामोरे गेले. तेथिल पुष्पवनेष्वरच्या मंदिरात दोघा बंधुंची भेट झाली. व तेथुन मोठ्या सन्मानामे महाराजांनी त्यांना तिरुमळ्ळपाडिच्या छावणीवरती नेले. येथे व्यंकोजीराजे ८ दिवस मुक्काम करुन होते. त्यांछ्यात अनेक बैठकी झाल्या महाराजांचे म्हणणे होते - "तुम्ही आम्ही प्रत्यक्ष बंधु. आज तेरा वर्षे जाली, महाराजांनी कैलासवास केला. सर्व दौलतीचा अनुभव घेतलात. वडिलांचे संपादिल्या अर्थाचे उभयतांही विभागी. तुम्हीच आम्हांस काहिच न कळविता आपले विचारानी वहिवाट केली. तुमची संपादिली दौलतीत आम्ही विभाग मागतो असा अर्थ नाही.तुम्हास ईश्वरने सामर्थ्य द्यावे, नवीन संपादावे, परंतु वडिलांचे जोडीचे अर्थास आमए विचाराशिवाय करणे चालणे तुम्हास विहीत नाही. काय दौलत आहे त्याचे कागदपत्र समजावावे. तुम्ही आम्ही समजोन चालू. तुम्हांस जड पडेल तिथे आम्ही मदत देऊ. जोणेविशी मनात खतरा ठेवू नये." मात्र व्यंकोजी काहि बधत नव्हते. त्यांना विजापूरकरांची बांधिलकि सोडवत नव्हती. व या दुसरा अर्थ स्वराज्य विस्ताराला आपल्याच माणसाचा विरोध असा होता. वरुन महाराजांच्या हक्काच्या वाट्यावरती इतकी वर्षे उअपभोग घेऊन त्यापुढेही त्याच वाट्याच्या मदतीने स्वराज्याला अपाय होऊ शकत होता. महाराजांनी दूरदर्शीपणाने हे ताळायचे ठरवले होते. पण बोलण्यातून गुंता काही सुटत नव्हता. महाराज चिडून भर बैठकीतून उठून गेले.
२३ जुलैच्या रात्री बहुदा महाराजांच्या कोपाच्या भीतीने कदाचित जगन्नाथपंतांच्या सल्यावरुन वुंकोजीराजे कोल्लिडम नदी ओलांडून गुपचूप तंजावरकडे निसटले. महाराजांना फार वाईट वाटले. मागे राहिलेल्यांपैकि एकट्या जगन्नाथ पंतांना अटक केली व बाकिच्यांना सन्मानाने परत पाठवले. पण फार दु:खाने महाराज उद्गारले - "काय निमित्त पळाले? आम्ही त्यास धरीत होतो की काय? ... उगेच उठून पळोन गेले. अती धाकटे ते धाकटे. बुद्धिही धाकटेपणायोग्य केली." तरीही महाराजांनी अखेरचा निरोप पाठवून बघितला. मात्र व्यंकोजीराजांनी संघर्षाचा पवित्रा घेतला. मग मात्र महाराजांनी आपले सैन्य व्यंकोजींच्या हद्दित घुसवले. त्यांनी जनदेवगड, चिदंबरम, वृद्धाचलम वगैरे भाग जिंकला.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३८२

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३८२
सरजा सिवाजी जंग जीतन चलत हैं । (उत्तरार्ध)
भाग १२
आता शेरखानला एकटा पाडल्यावरती त्याची शिकार करणे सोपे झाले. तो आपल्या सासर्याकडे तिरुवाडिच्या किल्यात आश्रयासाठी गेला होता. त्याचे ३ हजार घोडदळ व ४ हजार पायदळ त्याच्या बरोबर होते. मात्र तो स्वत: कसलेला लढवैय्या नव्हता. त्याच्या मुत्सद्यांना त्या सैन्याचा फाजिल आत्मविश्वास होता. वरुन विजापूर्वरुन मदत येईल अशी वेडि आशा त्यांना होती. पण महाराज तडकाफडकि तिरुवाडिजवळ येऊन ठाकले. जवळिल काहि सैन्याला त्यांनी मराठ्यांवरती पिटाळले. मात्र मराठ्यांनी स्वस्थता धारण केली. गोंधळून जाऊन आपले काहितरी चुकले आहे असे वाटून शेरखानने सैन्य उलटे बोलावले. सैन्य माघारी वळाले आहे याचा अंदाज येताच मराठी सैन्याची फळी वेगाने त्यांवरती चालून गेली. मग काय? त्यांच्या पळापळिला धरबंधच उरला नाही. स्वत: शेरखान लोदी अकलनायकाच्या अरण्यात शिरला. मागे प्रतिकारासाठी त्याने ५०० पठाण ठेवले होते. मात्र २-३ तासांतच तो प्रतिकार मोडून मराठे त्याच्या मागावर गेले. काहि हत्ती - उंट व आपले घोडदळ घेऊन शेरखान भुवनगिरीकडे निसटला. मराठ्यांनी निकराचा पाठलाग करुन त्याचे २७० घोडे, २० उंट, शेकड्यानी बैल, अनेक तंबू, काही नगारे पकडले. महाराज यावेळी तेवनापट्टम जवळ होते कारण तिरुवाडिचा किल्ला शेरखानच्या सासर्याने झुंजता ठेवल्याने त्याकडेही लक्ष देणे भाग होते. महाराजांची दुसरी तुकडी शेरखानवरी चालून गेली तिने २०० घोडे व ४ हत्ती पकडून आणले. आता शेरखान आपल्या १००-१२५ स्वारांनिशी भुवनगिरीपट्टणमच्या किल्यात निसटून गेला. आता शेरखानचे खरे नाही हे बघताच वालदूर, तेगनापट्टण वगैरे किल्यातून पठाणी सैन्य शरण आले अथवा सरळ सरळ पळून गेले. जुलैच्या १६७७ च्या पहिल्या आठवड्यात महाराजांच्या उपस्थितीतच मराठी सैन्याने भुवनगिरीपट्टन वरती जोरदार हल्ला चढवला. अखेर शेरखान लोदिने गुडघे टेकले. त्याने किल्ला तर ताब्यात दिलाच वरुन २० हजार होनांची खंडणी द्याचे कबूल केले. त्यावेळी पैसे नसल्याने त्याने आपल्या मुलाला ओलिस ठेवले. महाराजांनी शेरखानची सन्मानपुर्वक भेट घेतली. तह झाल्यावर एखाद्या सामान्य स्वाराप्रमाणे तो केवळ २० घोडेस्वारांनीशी अरीयलूरच्या झंगलात निघून गेला. तब्बल सहा महिन्यांनी त्याने आपल्या हिंदू मित्रांकडून पैसा गोळा करुन ती खंडणी भरली व आपल्या मुलाची सूटका केली. मग शेरखान आपल्या मुलासह आश्रयासाठी मदुरेच्या नायकाकडे निघून गेला. बहलोलखानाचा दख्खनमधला सर्वात मोठा साथीदार महाराजांनी असा कायमचा गपगार करुन टाकला.
महाराज आता व्यंकोजीराजांकडे वळले. वास्तविक कर्नाटकात आल्यापासून महाराजांनी त्यांना अनेक खलिते पाठवून भेटण्याची इच्छा प्रकट केली होती. मात्र व्यंकोजीराजांनी टाळाटाळ केली. आता कायमचा सोक्षमोक्ष लावण्याच्या विचाराने महाराज स्वत: तंजावरच्या दिशेने निघाले. त्यांनी तिरुमळ्ळपाडि जवळील कोल्लिडमच्या पात्राजवळ छावणी केली. व व्यंकोजींना निरोप पाठवला "राजश्री गोविंदभट गोसावी, राजश्री काकाजीपंत, राजश्री निळोबा नाईक व रंगोबा नाईक व तिमाजी यक्षियारराऊ असे भले लोक आम्हांपासी पाठवणे." नाईलाजाने व्यंकोजीराजांनी त्यांना पाठवले. महाराजांनी इतके वर्ष सामंजस्य दाखवल्याने व्यंकोजीराजांनी जी वडिलोपार्जित जहागिरी व संप्पत्ती उपभोगली होती त्याबाबत ’बहुत रीती घरोबियाचा व्यवहार सांगुन’ आपला हक्क असलेला अर्धा वाटा द्यावा अशी मागणी शिवरायांनी केली. मात्र अनेक दिवस व्यंकोजींनी त्यावर प्रतिक्रियाच दिली नाही.मात्र मुत्सद्दि फारच मागे लागले तेव्हा ’आम्ही वडिलाचे दर्शनाला येतो’ असा निरोप त्यांनी महाराजांना पाठवला. महाराज आनंदले. अभयाची खात्री देऊन त्यांना निमंत्रण धाडले.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३८१

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३८१
सरजा सिवाजी जंग जीतन चलत हैं । (उत्तरार्ध)
भाग ११
जिंजीच्या दुर्गाची भक्कम व्यवस्था महाराजांनी लावली. रायाजी नलगे यांना किल्याची हवालदारी, तिमाजी केशवांना सबनिशी आणि रुद्राजी साळवी यांना इमारतींच्या कामावरती नेमले. व महाराज लगोलग २५ मे च्या सुमारास वेल्लोरच्या दिशेने निघाले. वेल्लोरचा भुईकोट किल्ला दख्खन मधला फार ताकदिचा किल्ला होता. सभासदाने लिहुन ठेवले आहे - "तो कोट म्हणजे पृथ्वीवर दुसरा गड असा नाही. कोटात जीत पानियाचा खंदक. पाणियास अंत नाही असे. उदकात दहा हजार सुसरी. कोटाच्या फाजियावरुन दोन गाडिया जोडून जावे ऐशी मजबुदी. पडकोट तरी चार फेरीयावरी फेरे ये जातीचा कोट." इ.स. १५६६ च्या सुमारास विजयनगर साम्राज्याचा अधिकारी असलेल्या चिन्नबोमी नायकाने हा भुईकोट उभारला होता. वेल्लोरची मजबुती बघुन भुईकोटाच्या पूर्वेला असलेल्या टेकड्या ताब्यात घेऊन त्यावरती मराठ्यांनी तटबंदी बांधली त्यांनाच महाराजांनी साजरा-गोजरा अशी नावे दिली. काहींच्या मते हे गड आधीच बांधले होते. याच ठिकाणहुन कुत्बशहाच्या तोफखान्याच्या मदतीने वेल्लोरच्या भुईकोटावरती हल्ला करायचा महाराजांचा मानस असावा. मात्र त्याच सुमारास कुत्बशहाने महाराजांसोबत दिलेला तोफखाना परत मागवून घेतला होता. कदाचित महाराजांनी जिंजीचा किल्ला कुत्बशहाला न दिल्याने नाराज होऊन त्याने ही मदत थांबवली असावी. कींवा दुसरे कारण असेही असू शकते की या सुमारास मुघल-आदीलशहा व कुत्बशहां यांच्यातला संघर्ष पुन्हा सुरु झाला होता त्याच कारणाने कुत्बशहाने आपला तोफखाना परत मागवला असावा. कारण काहिही असेल मात्र याच कारणाने आता हा किल्ला जिंकणे जास्त कठिण व वेळखाऊ होऊ शकते हे लक्षात घेऊन त्याला दिर्घकाळ वेढा देऊन बसण्याची गरज महाराजांनी ओळखली. या वेढ्याचे काम त्यांन बहुदा नरहरी रुद्र यांकडे सोपवले व ते शेरखान लोदिचा बंदोबस्त करायच्या मागे लागले.
त्यांनी लोदिच्या अंमला खालचा मैदानी प्रदेश जिंकायला सुरुवात केली. अधेमध्ये जे गड होते त्यांवरतई शेरखान लोदीची माणसे होती. मात्र ते गड सांभाळण्याचे सोडून मराठ्यांना इतर प्रतिकार करायला किल्यांच्या बाहेर पडलेच नाहीत. महाराजांनी आजूबाजूच्या शहरांतील धनाढ्य सावकार व्यापार्यांना २ लाख होनांचे कर्ज देखिल मागवले होते पण ते घाबरुन जंगलात परागंदा झाले. मद्रास, पुलकित भागातुन ५ हजार होनांची व्यवस्था झाली. मराठ्यांनी इंग्रजांची टिमेरी येथील वखार लुटून अजून २ हजार होनांचा माल लुटला. वेल्लोरच्या मुक्कामात आजुबाजुच्या संस्थानिकांनी महाराजांकडे आपापले वकील पाठवले. फ्रेंचांनी देखिल आपला वकिल पाठवला. फ्रेंचांनी शेरखान लोदिला वालदूरचा किल्ला जिंकून दिला होता. महाराजांनी त्याबाबत नाराजी दाखवून आता त्याच्या विरोधात मदत मागितली. मात्र फ्रेंच याकरीता तयार झाले नाहीत. मात्र प्रत्यक्ष युद्धाखेरीज काही मदत लागली तर ती करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३८०

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३८०
सरजा सिवाजी जंग जीतन चलत हैं । (उत्तरार्ध)
भाग १०
महाराजांनी कृष्णा ओलांडून निवृत्तीसंगम आणि पुढे श्रीशैलम्‌ याठिकाणी त्यांनी तीर्थस्नान केले. या ठिकाणी स्नान करुन ते श्र्र्मल्लिकार्जुनाच्या दर्शनाला गेले. तिथे त्यांछ्या अंगात देवीचा संचार झाला असे बखरकार म्हणतात. आजूबाजूचे अध्यात्मिक वातावरण, जिजाऊसाहेब गेल्यावरती त्यांच्या आयुष्यात तयार झालेली पोकळी, घरात सुरुवात झालेला सुप्त गृहकलह ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांना विरक्तीचे विचार आले असावेत. इतका विरक्तपणा आला की मल्लिकार्जुनाच्या पुजेत बिल्वदलांऐवजी स्वत:चे शीरकमल वहावे असं त्यांना वाटून गेलं. त्याचे वेळी त्यांच्या अंगात भवानीची संचार झाला "तुज ये गोष्टि मोक्ष नाही. हे कर्म करु नको, पुढे कर्तव्यही उदंड तुज हाते करणे आहे." महाराजांनी स्वत:ला सावरले. कदाचित याच दरम्यान महाराजांनी काही अध्यात्मिक पदेही रचली होती. त्यातले एक तंजावरच्या महालातील दफ्तरात सापडले ते पुढीलप्रमाणे -
नासिवंत सुखासाटी। अंतरला जगजेठी॥
नाहि नाहि याते गोडी । लक्ष चौर्यौशीच्या जोडी॥
मणुष जन्म गेल्यावारे। काय करशिला बारे॥
शिवराजे सांगे जना। म्या तो सोडिली वासना॥
महाराज साधारण ९ दिवस श्रीशैलम मुक्कामी होते. मल्लिकार्जुनाच्या उत्तरेला महाराजांनी जे गोपुर बांधून घेतले त्याला आज शिवाजीगोपुरम असे ओळखले जाते. तिथेच महाराजांची शिल्पाकृती देखिल आहे. तिथुन महाराज ४ मे १६७७ रोजी तिरुपतीच्या दर्शनाला गेले. महाराजांनी प्रतिवर्षी ४२० होन श्रींच्या अभिषेक, पुजा व नंदादिपासाथी देण्याचे थरविले व एका वर्षाचे द्रव्य त्यांनी तत्काळ दिले सुद्धा. तिरुपतीहुन मद्रासजवळ पेड्डापोलम् इथे महाराज पोहोचले. महाराजांनी महादोजी पंतलुंना इंग्रजांच्या भेटिवरती पाठवले आणि काहि रत्ने व विषावरील उतारासाठी औषधे पाठवण्यास सांगितले. इंग्रजांनीही या वस्तू तातडिने रवाना केल्या. वरुन या वस्तूंची किंमत न आकारता त्यांनी त्या भेटिदाखल महाराजांना दिल्या. शिवाय ४ वार कापड व चंदनाची ४ पात्रे देखिल भेट म्हणून पाठवली.
पेड्डापोलमच्या मुक्कामातच बहुदा महाराजांनी जिंजी स्वारीचा बेत आखला असावा. पूर्वार्धात सांगितल्याप्रमाणे पठाणी पक्षाच्या शेरखान लोदिचा प्रभाव वाढलेला बघून खवासखानाचा भाऊ नासीर मुहम्मदने किल्ला पठाणांच्या ताब्यात जाण्यापेक्षा आपणच तो कुत्बशहाला देऊया असा विचार केला व मादण्णांकडे दूत पाठवला. मात्र विजापुरकरांचा किल्ला असा उघडपणे ताब्यात घेऊन मुघल - विजापूरकरांच्या डोळ्यात येणे त्यावेळि मादण्णांना योग्य वाटले नाही. मात्र किल्लाही जाऊ द्यायचा नव्हता म्हणून मग त्यांनी हुशारीने त्याच दूताला शिवाजी महाराजांची भेट घ्यायला सांगितले. त्यानुसार तो दूत महाराजांना पेड्डापोलम्‌ इथे येऊन भेटला. महाराजांनी देखिल ५० हजार होन व १ लाखाच्या मुलुखाची लालुच नासीर मुहम्मदाला दिली. आणि अपेक्षेप्रमाणे मासा गळाला लागला. थोडिशी लुटूपुटुची लढाई करुन २० मे रोजी त्याने किल्ला महाराजांना दिला देखिल वरुन ठरल्याप्रमाणे महाराजांनी देखिल आपला शब्द पाळला. ५० हजार होन व लाखाचा मुलुख देऊन महाराजांनी दक्षिणेत एक बलाढ्य किल्ला आपलासा केला. ह्याच जिंजी वरुन सुमारे नऊ वर्षे राजाराम महाराजांनी मुघलांना तोंड दिले हे लक्षात घेतल्यावरती महाराजांची दूरदृष्टि लक्षात येते.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३७९

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३७९
सरजा सिवाजी जंग जीतन चलत हैं । (उत्तरार्ध)
भाग ९
महाराजांबरोबर जनार्दन पंत, प्रल्हादपंत, सोनाजी नाईक बंकी व बाबाजी ढमढेरे हे पाचजण होते. शिवाय अक्कण्णा व मादण्णा होतेच. महाराज व पातशहा एक प्रहर संवाद करत होते. कुत्बशहा व जाळीआड असलेल्या त्याच्या स्त्रीया, इतर मंत्री दस्तुर खुद्द महाराजांच्या तोंडून त्यांच्याच अतुलनिय पराक्रमाच्या कथा ऐकून अचंबित झाले. भेटी अखेर पात्शहाने महाराजांना उंची वस्त्रे, अलंकार, घोडे, हत्ती दिले व त्यांचा सत्कार केला. महाराजांना निरोप द्यायला पातशहा स्वत: महालाखाली आला. पातशहाचे चांगले मत बनले - ’राजा प्रामाणिक, आपल्यास रक्षिले, क्रिया जतन केली." दुसर्या दिवशी महाराजांना मादण्णांनी आपल्या घरी मेजवानीचे निमंत्रण दिले. महाराजांनेही ते स्वीकारले. शिष्टाईच्यावेळी हस्तीनापुरात फक्त विदुराकडे श्रीकृष्णाने भोजनाचे निमंत्रण स्वीकारले होते अगदी तसेच. मादण्णांच्या आईने स्वत: महाराजांसाठी अन्न शिजवले व वाढले.
कुतुबशहाने मादण्णास बोलावून ’राजियास काय पाहिजे ते देऊन संतुष्ट करुन निरोप द्यावा’ असे सांगितले. पुन्हा एक सुमुहुर्त पाहून कुत्बशहा व महाराजांची भेट घडवून आणली गेली. तह ठरला. कुत्बशहाने मादण्णांना सर्व अधिकार दिले. "आपली पादशाही जितकि वाढवू ये तितकी वाढवणे, पठाणाची नेस्तनाबूद करणे, दक्षीणची पातशाही आम्हा दक्षणियांचे हाती राहे ते करावे." या सुत्रावरुन उभय पक्षात करार झाला. -
१) स्वारी खर्चासाठी कुत्बशहाने दरमहा ३ हजार होन अथवा ४ लक्ष ५० हजार रुपये महाराजांना द्यावेत. २) कर्नाटक स्वारीत मदत म्हणून मिर्झा मुह्हमद अमीन याने एक हजार घोडदळ व ३ हजार पायदळाची मदत करावी. ३) पाश्चात्य तोपचींसह कुत्बशाहीचा नावाजलेला तोफखाना दारुगोळ्यासह महाराजांना मिळावा व त्याबदल्यात आदिलशहाने बळकावलेला कुत्बशाहीचा प्रदेश भूभाग शहाजीराजांचे जहागिरी वगळून जिंकलेल्या भागाचा एक हिस्सा कुत्बशहाला देण्यात येईल अशी मुख्य कलमे होती. खेरीज मुघलांचे आक्रमण आले तर परस्परांना मदत करावी. एकमेकांचे वकील एकमेकांच्या दरबारी रहातील. तसेच कुत्बशहाने दरवर्षी एक लाख होनांची खंडणी महाराजांना द्यावी असेही तहात ठरले. महाराज भागानगरात सुमारे दिड महिना मुक्कामास होते. तिथूनही त्यांनी आदिलशाहीतील घोरपडेंसारख्या मोठ्या सरदारांना आपल्या किंवा कुतुबशाहीच्या बाजूने ओढण्याचे प्रयत्न केले. त्याचा फारसा उपयोग झाला नसला तरी महाराजांचा राजकिय प्रभाव अर्थात विस्तारला होता. एप्रिल १६७७ मध्ये महाराजांनी भागानगर सोडले ते भरपूर द्रव्य, दाणा, व अधिकची कूमक घेऊनच. दक्षिण दिशा विजयश्रीची माळ घेऊन त्यांची वाटच बघत होती.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३७८

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३७८
सरजा सिवाजी जंग जीतन चलत हैं । (उत्तरार्ध)
भाग ८
महाराजांनीया मोहीमेवरती निघण्या आधी पाटगावास मौनीबुआंचे दर्शन घेतले. आशिर्वाद मिळावा म्हणून महाराज बराचवे थांबले. मौनीबुआ अर्थात कधी काही बोलत नसत. बर्याच वेळाने त्यांनी खडीसाखर दिली व महाराजांसोबत उभे असलेल्या मोरोपंतांच्या हातातील चंपक फुलांचा तुरा महाराजांच्या डोईवर ठेवला. महाराज नेहमीच सर्व धर्म-पंथांच्या संत-सत्पुरुषांचा आदर करीत मात्र त्यांनी भलत्या ठिकाणी नाक खूपसले तर ते त्यांना सूनवायला देखिल मागे-पुढे बघत नसत. मौनीबाबांच्या प्रमाणेच महाराज चिंचवडकर देवांनाही फार आदर देत. मात्र महाराज सातारा भागात असताना निमसड भागात त्यांना जेजूरीचे कान्हा कोळी व सूर्याजी घडसी येऊन भेटले. त्यांनी चिंचवडकर देवांविरुद्ध महाराजांकडे तक्रार केली. जेजुरीला गुरवांचा तंटा सुरू होता. देवांनी त्यात हस्तक्षेप करुन परस्पर निर्णय देऊन दोघांचे हात तोडले व त्यांना कोंडाण्यावरती कैदेत टाकले होते. ही तक्रार ऐकून महाराज संतापले. त्यांनी टाकोटाक देवांना तिरकस पत्रं लिहिले - "तुमची बिरदे आम्हांस द्या व आमची बिरदी तुम्ही घ्या!" दुसरे पत्र कोंडाण्याच्या गडकर्यास लिहिले - "तू चाकर आमचा की देवांचा?" कैद्यांची सुटका करुन या प्रकरणावरती स्वारीहून आल्यावरती निर्णय द्यायचे वचन महाराजांनी दिले.
महाराज बहुदा गोदातीराने मराठवाड्यातून नांदेड बोधन मार्गाने सिकंदराबाद व तेथून भागानगरकडे गेले असावेत. एका सनदपत्रात ’महाराज राजश्री थोरले कैलासवासी स्वामी भागानगर्प्रांते स्वारीस आले होते, ते समयी मौजे कंदकुडती परगणे बोधन सरकार नांदेड हा गाव समग्र ब्राह्मणास अग्रहार करुन दिला’ अशी नोंद आहे. महाराजांनी कुत्बशाहिच्या हद्दित प्रवेश केला. महाराजांचे सैन्य शिस्त पाळून येत असलेले बघून कुत्बशहावरती त्याचा परीणाम झाला असावा. त्याने स्वत: महाराजांच्या स्वागतार्थ काही गावे सामोरा येण्याची तयारी तो करु लागला. हे समजताच महाराजांनी निरोप पाठवला ’आपण वडील भाऊ, मी धाकुटा, आपण पुढे न यावे’ बादशहा अधिकच संतुष्ट झाला. त्याने अक्कणा व मादण्णांना पुढे धाडले. त्यांनी मोठ्या सन्मानाने महाराजांना शहरात नेले. दिनांक होता - ४ मार्च १६७७. सभासद म्हणतो - "राजियांनी आपले लष्करास कुल्जरी सामान केला होता. सूमुहुर्त पाहून पातशाहाचे भेटीस भागानगरमध्ये चालिले. पातशहाने नगर शृंगारिले. चौफेरी बिंदीस कुंकुम केशराचे सडे, रंगमाळा घातल्या, गुढिया, तोरणे, पताका, निशाणे नगरात लावली. नगर नागरीक लोक कोट्यान कोटी राजा पहावयास उभे राहिले. नारींनी मंगळ आर्त्या अगणित उजळून राजियास वंदिले. सोने - रुपियाची फुले राजियावरती उधळली. राजियांनी लोकांस खैरात द्रव्य वस्त्रे अगणित दिली आणि सर्व सैन्यासहित दादमहालात पावले..... तेथून पातशहास खालते उतरु नका आपणच खासा येतो असा निरोप पाठविला." मात्र इथे महाराजांनी आपणही सार्वभौम राजे आहोत हे दाखवून द्यायचे ठरविले. वास्तविक कुतुबशाहीचा रिवाज होता की शिरभोई धरावी, तसलिम करावी - म्हणजे पातशहाला लवुन कुर्निसात करावा व मुजरा करावा. मात्र महाराजांनी म्हंटले - ’आम्ही आपणावरी छत्र धरीले असे. त्यामुळे शिरभोई धरणे व तसलिम करणे हे माफ व्हावे.’ कुत्बशहाने ते मान्य केले. महाराजांना समोरे जाऊन त्याने महाराजांना थेट आलिंगन दिले. व महाराजांचा हात धरून त्यांना आपल्याच शेजारी बसविले. दोघेही एकासनिच बैसले. अनेकदा डोकेफोड करुन देखिल जे साधता येत नाही ते अश्या कृतींनी साधता येते. दस्तुर खुद्द कुत्बशहाच त्यांना आलिंगन देऊन एकासनी बसवतो आहे ह्याचा अर्थ महाराजांच्या राज्याला - सिंहासनाला त्याची मान्यता आहे हा उघड संदेश सगळ्यांना मिळाला.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३७७

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३७७
सरजा सिवाजी जंग जीतन चलत हैं । (उत्तरार्ध)
भाग ७
या मोहीमेवरती महाराजांनी ठरवून वरकड खर्च केला होता. सैनिकांचे पोषाख, निशाणे वगैरे हा सार्वभौम राजाच्या सैन्यासारखा केला होता. नवी शस्त्रे, दारुगोळा, चिलखते, शिरस्त्राणे उत्तमोत्तम प्रतीची होती. दोन घोडेस्वारांत तीन घोडे ठेवले होते. अर्थात हा भपका मुद्दामहुन केला असला तरी सर्व सैन्य शिस्तबद्धच होते. इतर चैनीच्या वस्तू, स्त्रीयांना अजिबात प्रवेश नव्हता. महाराजांनी सैन्याला कडक हूकूम केले होते - "एक काडी रयतेची तसनस न व्हावी.’ आवश्यक त्या वस्तू खरेदी कराव्यात, लूट कदापि करु नये. उल्लंघन झाल्यास शिरच्छेदच होणार होता. खुद्द महाराजांचा व मुख्य ४-६ अधिकार्यांचे तंबू साधे जाड कापडाचे होते. तर नेहमीच्या कारभारासाठी म्हणून असलेला मोठा तंबू देखिल जाड्याभरड्या कापडाचाच होता. त्यामुळे अर्थात इतरांचे तंबू भपकेबाज असण्याची शक्यताच नव्हती.
आपली हालचाल शक्य तितकी महाराज गुप्त ठेवत होते. महाराजांनी दोन तुकड्या करुन दुसरी तुकडी हंबीरारांवांसोबत दिली जी तोरगळप्रांतातून तुंगभद्रेच्या किनार्याने कुत्बशाहीत शिरणार होती. याच तुकडीत बाजी सर्जेराव जेधे व त्यांचा तरणाताठा मुलगा नागोजी जेधे होता. ह्या तुकडिला बहलोलखानचा सरदार हुसेनखान मियाण आडवा आला. येलगेंदलाजवळ मोठी धुमश्चक्री उडली. मराठ्यांनी हुसेनखानच्या सैन्याला पार चेचून टाकले. त्याचे सैन्य माघार घेऊ लागले. खुद्द हुसेनखानचा हत्ती रणांगणातून पळून जाऊ लागला. नागोजी जेध्याने हे बघितले. व दौडत जाऊन स्वत:चा घोडा मध्ये घातला. हत्तीची सोंडच कापली. हत्ती घाबरुन उलटा फिरला व परत रणांगणाकडे जाऊ लागला. हुसेनखान संतापला त्याने एक तीर नागोजीच्या दिशेने सोडला. तो थेट नागोजीच्या कपाळात घुसला. हुसेनखानला देखिल मराठ्यांनी पकडले. नागोजीच्या मस्तकात घुसलेला तीर बाहेर काढताच नागोजीही तडफडत मृत्युमुखी पडला. त्याची पत्नी गोदूबाई हे वृत्त समजताच कारीस सती गेली. या घटनेनंतर बहुदा बाजी जेधे आधी रायगडला गेले व तेथून कारीला गेले असावेत. नंतर महाराजांसोबत पुन्हा दख्खनमध्ये आले असावेत. ह्या घट्नेनंतर महाराज स्वत: कारी गावांत गेले व नागोजीम्च्या आईचे सांत्वन केले. त्यांना प्रतिवर्षी एक शेर सोने खर्चासाठी देण्याची व्यवस्था लावली. जेधे शकावली म्हणते पौषात हुसेनखानचा पाडाव झाला. यावरुन ही घटना डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीत घडली असावी. म्हणूनच वरती मी महाराज डिसेंबरच्या शेवटी रायगडवरुन निघाले असण्याची शक्यता नोंदवली आहे.