Total Pageviews

Monday, 9 October 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४६१

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४६१
मराठेशाहीला साम्राज्यवादाची चव दाखवणारा हा पहिलाच सेनापती.
श्रीमंत बाजीराव पेशवे
भाग १४
पालखेडची मोहीम म्हणजे बाजीरावाच्या कारकिर्दीतील व आयुष्यातील एक महत्त्वाची घटना आहे. या स्वारीनंतर त्याचा आपल्या लष्करी नेतृत्वक्षमतेवरील विश्वास वाढीस लागला आणि या मोहिमेनंतर त्याने मागे वळून कधी पाहिले नाही. हे जरी खरे असले तरी पालखेडच्या विजयाचे सर्व श्रेय एकट्या बाजीरावास देणे अयोग्य ठरेल. त्याला चिमाजी आपाची जशी बहुमुल्य साथ लाभली. त्याचप्रमाणे शिंदे, होळकर, जाधव, पवार इ. सरदारांनीही बरीच मदत घेतली. याबाबतीत पिलाजी जाधव, मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे हे बाजीरावाचे गुरुचं समजले पाहिजेत. या सर्व अनुभवी योद्ध्यांमुळेचं २७ - २८ वर्षीय बाजीरावास हे यश प्राप्त झाले.
पालखेड येथे बाजीरावाने निजामाला शरण येण्यास भाग पाडले, त्याचवर्षी होळकर, उदाजी पवार, कंठाजी कदम बांडे इ. च्या साथीने चिमाजी आपाने दयाबहादूर व गिरिधर बहादूर या दोन बलवान मोगल सुभेदारांना युद्धात ठार करून माळवा प्रांत एकदाचा ताब्यात घेतला. चिमाजीच्या विजयाची बातमी मिळतांच स्वतः बाजीराव बुंदेलखंडात छत्रसाल राजाच्या मदतीस धावून गेला. महंमदखान बंगशच्या विरोधात बुंदेलखंडचा राजा छत्रसाल याने बाजीरावाची मदत मागितली होती. त्यावेळी चिमाजी माळव्याच्या प्रकरणात अडकल्याने बाजीरावास तातडीने बुंदेलखंडात जाता आले नाही. परंतु दया बहादूर व गिरिधर बहादूरचा बंदोबस्त होताच बाजीरावाने बुंदेलखंड प्रकरण हाती घेतले. यावेळी चिमाजी उज्जैनला वेढा घालून बसला होता व त्याची बातमी महंमदखान बंगशला होती. पण देवगडावरून गढामंडळमार्गे बाजीराव येत असल्याची कल्पना बंगशला नव्हती. परिणामी जैतपुरावर महंमदखान बंगश मराठी व बुंदेल्यांच्या फौजांच्या चिमट्यात कोंडला गेला. त्याने दिल्लीहून कुमक मागवली. मुलगा काईमखान यांस तातडीने मदतीस बोलावले. बापाच्या मदतीला मुलगा धावला खरा पण जैतपूरच्या अलीकडे सुपे येथे मराठी सैन्याने गाठून लुटून घेतले. केवळ १०० स्वारांनिशी काईमखान जीव घेऊन पळत सुटला. सुटकेचे सर्व मार्ग बंद झाल्याचे पाहून स. १७२९ च्या मे महिन्यात बंगश शरण आला. पावसाळा तोंडावर आल्याने बाजीरावास परत फिरणे भाग होते. तेव्हा त्यानेही फारसे ताणून न धरता बंगशला सोडून दिले. छत्रसालने बाजीरावास या मदतीच्या बदल्यात पाच लाखांची जहागीर नेमून दिली. या जहागिरीच्या मोबदल्यात मोगलांच्या आक्रमणापासून छत्रसालच्या राज्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी बाजीरावाने उचलली. अशा प्रकारे माळवा - बुंदेलखंडातील विजय संपादून चिमाजी - बाजीराव पुण्यास परतले.

No comments:

Post a Comment