Total Pageviews

Friday, 6 October 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४४७


 हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४४७

सूर्याजी काकडे म्हणजे महाभारतातला जणू कर्णच
साल्हेरचा किल्ला मराठ्यांनी घेतला पण तो पुन्हा जिंकण्यासाठी बहादूरखान, दिलेरखान, इखलासखान साल्हेरवर चालून आले. इखलासखानाने किल्ल्याला वेढा घातला तर बहादूरखान आणि दिलेरखान महाराजांचा मुलुख मारण्यासाठी मोहिमेवर गेले.

जवळजवळ वीस हजार मुघली सैन्याचा वेढा किल्ल्याभोवती पडला होता. महाराजांनी तडक आपल्या हेरां मार्फत ही बातमी सेनापती प्रतापराव यांस कळविली. १६७२ च्या आरंभिस प्रतापराव आणि मोरोपंत यांच्या संयुक्त फौजा साल्हेरच्या आसमंतात दाखल झाल्या.

पहाटेच्या वेळेस सेनापतीच्या फौजेने पहाटेच्या साखर झोपेत असणाऱ्या मुघली छावणीवर असा काही हल्ला चढविला की, अनेक मुघल सैनिकांना शस्त्रे उचलायला उसंतच मिळाली नाही आणि ते कापले गेले. थोडावेळ खडाजंगी झाली आणि अचानक मराठ्यांनी माघारीची शिंगे फुंकली. विजय जवळच असणाऱ्या मराठ्यांनी अशी माघार का घेतली हे मुघलांना कळलेच नाही. पाळणारे मराठे बघून मुघलांना जोर आला आणि ते मराठ्यांचा पाठलाग करू लागले. छावणी पासून दूर आल्यावर पाळणारे मराठे पुन्हा उलटे फिरले आणि त्यांनी मुघलांचा सामना केला, तर मुघलांच्या मागेच ताज्या दमाची मराठ्यांची फौज येऊन थडकली आणि आशयाच प्रकारे त्यांच्या परतीची वाट बंद करून टाकली.

छावणीतल्या मुघली सैन्याला पाठलागावर गेलेल्या आपल्या सैन्याची काही बातमी मिळतच नव्हती आणि त्यातच त्यांच्यावर मोरोपंतांची राखीव फौज येऊन आधळली. मराठ्यांचा हा हल्ला सुद्धा इतका भयानक होता की, मुघलांना हत्ती आणि बैल गाड्यांच्या मागे लपून बसण्या शिवाय पर्याय नव्हता.

अखेर मुघल हरले. अमरसिंह, मोहकमसिंह आणि असे त्यांचे अनेक सरदार मारले गेले तर अनेक सरदार कैद झाले. खुद्द इखलासखान जखमी होऊन पकडला गेला. दहा ते बारा हजार मुघल सैनिक मारले गेले. त्यांचे अनेक हत्ती, उंट, घोडे, बैल, तोफा, शस्त्रे, जडजवाहीर, उंची कापडे, आणि तंबू मराठ्यांचा हाती लागले. या युद्धात मराठ्यांचे सुद्धा बरेच नुकसान झाले. चार ते पाच हजार मराठी सैनिक मारले गेले.

सभासद लिहितो की, "या युद्धात रक्ताचे पूर वाहिले. रक्ताचे चिखल जाहले. त्यामध्ये रुतो लागले, असा कर्दम जाहला. प्रतापराव सरनौबत व आनंदराव व व्यंकोजी दत्तो व रुपजी भोसले व सूर्यराव काकडे, शिदोजी निंबाळकर, खंडोजी जगताप, संताजी जगताप, मानाजी मोरे, विसाजी बल्लाळ, मुकुंद बल्लाळ व मोरो नागनाथ उमराव असे यांणी कस्त केली. मुख्य मोरोपंत पेशवे व प्रतापराव सरनौबत या उभयतांनी आंगीजणी केली आणि युद्ध करिता सूर्यराव काकडे पंचहजारी जांबुरीयाचा गोळा लागून पडले ".

सूर्याजी काकडेना महाभारतातल्या शूर कर्णाची उपमा दिली आहे.

संदर्भ: डॉ.शिवदे आणि सभासद बखर...

No comments:

Post a Comment