Total Pageviews

Friday, 6 October 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४३९


 हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४३९

गोविंदपंत बुंदेले यांची कामगिरी
पानिपतच्या प्रांतात दोन्ही फौजा आमने सामने उभ्या ठाकल्या होत्या. ते एकमेकांची ताकद आजमावून पहात होते. दिवसा दोन्हीकडच्या फौजा आमनेसामने येत आणि कधी छोट्या तर कधी भीषण चकमकी करून पुन्हा संध्याकाळी आपल्या आपल्या छावणीत परतीत. असेच काही दिवस गेले, पहिले काही दिवस मराठ्यांची बाजू वरचड होती, झाडलेल्या चकमकीत त्यांचेच वर्चस्व दिसून येत होते पण नंतर परिस्थितीत झपाट्याने बदल होत गेले. मराठ्यांनकडचा अन्नसाठा संपत आला त्यांचा रसद पुरवठा बंद पाडण्यात आला, छावणीत खायला अन्न महाग झाले. अब्दालीने मराठी फौजेला पाणी पुरविणारे कालवे सुद्धा बंद पाडले. डिसेंबर महिन्यात मराठ्यांचे हाल कोल्ही-कुत्र्यांना सुद्धा नको झाले. याच्या विपरीत परिस्थिती अब्दालीच्या फौजेत दिसू लागली. जी फौज काही महिन्यापूर्वी हताश झाली होती त्यात एकदम नवा जोम दिसू लागला. ताज्या दमाचे सैनिक काबुलहून येऊन त्यांना मिळाले, गील्च्यांना नजीब आणि शूजच्या प्रदेशातून व्यवस्थित रसद पुरविली जाऊ लागली.
अखेर ही रसद थांबविण्याशिवाय दुसरा पर्याय भाऊ समोर राहिला नाही. पण जनकोजी किंवा दत्ताजी शिंदे सारखा तडफदार सरदार अंतर्वेदित नव्हता. तिथे मराठ्यांच्या बाजूचा जर कोणी होता तर तो म्हणजे गोविंदपंत बुंदेला. पण गोविंदपंत हा एक मामलेदार होता कोणी शिपाईगडी नाही, त्याचे निम्मे आयुष पालखीत बसण्यात गेले असावे आणि आता त्याला घोड्यावर बसून शत्रूच्या मुलुखात धुडगूस घालणे कर्मकठीण होते. बरे त्याच्या हाताखाली सुद्धा खडी फौज नव्हती त्याला उत्तरेतल्या जाठ, गोसावी, आणि मुसलमानी लोकांचीच मदत घेण्यावाचून पर्याय नव्हता. इतके असून सुद्धा केवळ भाऊची आज्ञा मानून त्याने अब्दालीची रसद मारण्याचे काम अंगावर घेतले होते.
गोविंदपंत यमुना पार होऊन मेरठकडे सरकला व त्याने मुलुख लुटून अब्दालीची रसद तोडण्याचा सपाटाच लावला. जवळजवळ आठ दिवस असेच चालू राहिले आणि अब्दालीच्या छावणीत सुद्धा अन्नाची चणचण भासू लागली. काबुलहून आलेल्या ताज्या दमाच्या फौजेला अब्दालीने गोविंदपंतांचा समाचार घेण्यास पाठविले. तिथे अंतर्वेदित गुजर नामक एका जमीनदाराने खंडणी देतो असे सांगून गोविंदपंतांना थांबवून घेतले आणि अब्दालीस फौज पाठविण्याचा निरोप पाठविला. निरोप मिळताच आताईखान जलालबादेजवळ पोचला. जेवायला बसलेल्या गोविंदपंतांवर गिलचे येऊन धडकले आणि त्यांचे शिर कापून अब्दालीकडे पाठवून दिले.

अब्दालीने हे शिर भाऊकडे त्यांस खिजविण्यासाठी म्हणून पाठवून दिले.

ही घटना साधारण २० डिसेंबर १७६० या दिवशी झाली असावी असे अनेक बखरकार लिहितात. गोविंदपंत मामलेदरांवर इतिहासकारांनी अनेक आरोप केले आहेत पण त्यांच्या बलिदानामुळे हे सर्व आरोप कसे अयोग्य होते हे कळते.

No comments:

Post a Comment