मराठेशाहीला साम्राज्यवादाची चव दाखवणारा हा पहिलाच सेनापती.
श्रीमंत बाजीराव पेशवे
बाजीरावाचं उमदेपण सांगताना तसंच बाजीरावाच्या युद्धकौशल्याचे दाखले देताना इतिहासाचे गाढे अभ्यासक निनाद बेडेकर सांगतात , ‘बाजीरावाच्या युद्धकौशल्याची जाणीव आपल्याकडे नाही. पण अमेरिकन लष्कर आजही ती जाणीव ठेवून आहे. लष्करी डावपेच आणि रणनीतीच्या अभ्यासक्रमात आजही बाजीरावाने निजामाविरुद्ध १७२८ मध्ये पालखेड इथे केलेली लढाई अमेरिकन सैनिकांना शिकवली जाते. त्यासाठी पालखेडचं कायमस्वरूपी मॉडेलच तयार केलं गेलेलं आहे. बाजीरावाने निजामाला कसं घुमवलं आणि त्याचा पूर्ण पराभव करण्यासाठी त्याला पालखेडच्या कात्रीत कसं पकडलं याचा स्ट्रॅटेजिक वॉरफेअरच्या अभ्यासाचा भाग म्हणून आजही सांगितलं जातं.
बाजीराव खूप मोठा युद्धनीतीज्ञ होता. म्हणूनच तो अजेय राहिला. त्याच्या कारकीर्दीतली एकही लढाई तो हरला नाही. म्हणून त्याची तुलना नेपोलियनसारख्या युद्धनिपुण सेनापतीशी केली जाते.
फील्डमार्शल मॉण्टगोमेरी यांचं युद्धशास्त्रावर आधारित ‘अ कन्साइज हिस्ट्री ऑफ वॉरफेअर’ नावाचं एक प्रसिद्ध पुस्तक आहे. त्यात त्यांनी बाजीरावाच्या पालखेडच्या लढाईबाबत म्हटलंय की १७२७-२८ची बाजारावाची निजाम-उल-मुल्क याच्याविरुद्धची चढाई हा ‘मास्टरपीस ऑफ स्ट्रॅटेजिक मोबिलिटी’ होता. बाजीराव आपल्या शत्रूला इप्सित स्थळी आणून मात देत असे. मैदानात अनुकूल परिस्थिती नसेल तर बाजीराव वाट पाहायचा. एखाद्या कसलेल्या शिकाऱ्याप्रमाणे तो पेशन्स ठेवायचा. घोडदळ हे बाजीरावाचं सर्वात मोठं बलस्थान होतं. दिवसाला ४० मैलाचा टप्पा त्याचं सैन्य गाठायचं. तो त्याच्या काळातला अत्युत्तम वेग होता. त्यामुळे शत्रूला सुगावा लागायच्या आतच बाजीरावाचा हल्ला झालेला असायचा.
बाजीरावाची गुप्तचर व्यवस्था ही त्याची दुसरी मोठी शक्ती होती. अक्षरश: क्षणा-क्षणांची माहिती त्याला मिळायची. मार्गात येणाऱ्या नद्या, उतार-चढाव, पर्वत, घाट या सगळ्यांची अचूक माहिती बाजीरावाकडे असायची.
No comments:
Post a Comment