Total Pageviews

Thursday, 5 October 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४१८

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४१८
क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे...!!!
लेखक :दिलिप वासुदेवराव रिंगणे
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात अशा अनेक व्यक्ती आहेत की, ज्यांनी मोलाची कामगिरी बजावली, परंतु ते सर्व अनामिकच राहीले. असेच एक क्रांतिकारक आहेत वीर लहूजी वस्ताद साळवे. त्यांचा जन्म १४ नोव्हेंबर १७९४ साली पुरंदर गडाच्या पायथ्याशी असलेल्या ‘पेठ’ या गावी जन्मलेल्या लहूजींच्या घराण्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त आहे.लहुजींच्या वडिलांचे नाव राघोजी साळवे (राऊत) व आईचे नाव विठाबाई होते.हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांनी लहूजी साळवेंच्या खापर पंजोबांना पुरंदर किल्ला रक्षणाची जबाबदारी दिली होती. या ऐतिहासिक घराण्यात लहूंजींचा जन्म झाला. शिवकालखंडानंतर लहूजींच्या पणजोबांना पुरंदर किल्ला सोडावा लागला. पुढे दुसर्या बाजीराव पेशव्यांच्या काळात लहूंजीचे वडील राघोजी यांनी पुरंदर परिसरात जिवंत वाघ पकडला ही बातमी दुसर्या बाजीरावांना समजली. त्यांनी लहूजींच्या वडीलांना बोलवून आपल्या शिकारखाना व शस्त्रागारप्रमूखपदी नेमले. राघोजी साळवे शस्त्रास्त्रनिपुण, शरीरयष्टीने वाघासारखे बलवान होते. लहुजींचे पूर्वज आपल्या शूरवीरतेमुळे पराक्रमी घराणे म्हणून ओळखले जात होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात लहुजींचे पूर्वज पराक्रम गाजवीत. त्यामुळे शिवरायांनी आपल्या कार्यकाळात लहुजींच्या पूर्वजांना महत्त्वाच्या जबाबदार्या सोपविल्या होत्या. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरींमुळे शिवाजी महाराजांनी लहुजींच्या पूर्वजांना ‘राऊत’ या पदवीने गौरविले होते.लहुजींचे घराणे शूरवीर, लढवय्ये असल्यामुळे राघोजींनी आपल्या लहुजीलादेखील एक वीर योद्धा बनविण्याच्या उद्देशाने लहानपणापासूनच शस्त्रांची, युद्धकलेची तालीम दिली. त्यामुळे लहुजी दांडपट्टा फिरविणे, घोड्यावर स्वारी, भालाफेक, बंदूक चालविणे, तोफगोळे फेकणे, गमिनी काव्याने शत्रूला मात देणे, शत्रूंची गुप्त माहिती मिळविणे आदी युद्धकलांत तरबेज व पारंगत होते.खडकी येथे ५ नोव्हेंबर १८१७ ला पेशव्यांचे इंग्रजांसोबत भयानक युद्ध झाले. १२ दिवस राघोजी व सळसळत्या तरुण रक्ताच्या २३ वर्षे वयाच्या लहुजी साळवेंनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन इंग्रजांविरुद्धप्रखर लढा दिला. राघोजी साळवे या स्वातंत्र्य संग्रामात इंग्रजांच्या हातून लहुजींच्या समोर शहीद झाले. पेशव्यांचा पराभव झाला. हिंदवी स्वराज्याचे निशाण शनवारवाड्यावरूनहटवून इंग्रजांचा युनियन जॅक फडकला.स्वातंत्र्यप्रेम, देशभक्ती, देशप्रेमाने लहुजींना आपल्या वडिलांच्या मृत्यूच्या दु:खातून सावरले. या पराभवाने लहुजींच्या हृदयात स्वातंत्र्यप्राप्तीची ज्वाला भडकली. भारतमातेला इंग्रजांपासून वाचविण्यासाठी राघोजी साळवे शहीद झालेल्या ठिकाणी लहुजींनी १७ नोव्हेंबर १८१७ ला आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण करीत ‘मरेन तर देशासाठी आणि जगेन तर देशासाठी’ अशी क्रांतिकारी प्रतिज्ञा करून आपल्या वडिलांची समाधी (थडगे) उभारली. ही समाधी अजूनही ‘वाकडेवाडी’येथे आहे.आपल्या शूरवीर वडिलांचा मृत्यू व इंग्रजांनी केलेला पराभव लहुजींना असह्य झाला. पराक्रमी घराण्यातील लहुजींनी इंग्रजांना शिकस्त देण्यासाठी देशाच्या स्वातंत्र्यासाठी ‘मवाळपंथी नव्हे तर जहाल क्रांतिकारक’ निर्माण करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी आपल्या अंगी असलेले युद्ध कलाकौशल्याचे शिक्षण तरुणांना देण्यासाठी १८८२ मध्ये रास्ता पेठ, पुणे येथे देशातील पहिले तालीमयुद्ध कलाकौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू केले. या प्रशिक्षण केंद्रात सर्वच समाजांतील युवक तालीमघेण्यासाठी येऊ लागले. यात प्रामुख्याने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, वासुदेव बळवंत फडके, महात्माजोतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, चापेकर बंधू, क्रांतिभाऊ खरे, क्रांतिवीर नाना दरबारे, रावबहाद्दूर, सदाशिवराव गोवंडे, नाना मोरोजी, क्रांतिवीर मोरो विठ्ठल बाळवेकर, क्रांतिवीर नाना छत्रे, उमाजी नाईक, फुले यांचे सहकारी वाळवेकर आणि परांजपे हेदेखील लहुजी साळवे यांच्या आखाड्यात शिकले.साताराचे छत्रपती प्रतापसिंह यांना १८३९ मध्ये ब्रिटीश सरकारने पदच्युत केले. यांचा वचपा काढण्यासाठी नानासाहेब पेशवे, तात्या टोपे यांनी उत्तरेत तर रंगोबापू यांनी लहूजींच्या मदतीने सातार्यात ब्रिटीशांविरुध्द बंड करण्याचे ठरविले. १२ जून १८५७ ही तारीखही बंडासाठी निश्चित करण्यात आली. मात्र हा कट उधळला गेला. लहूजींचे ३०-३५ क्रांतिकारक ब्रिटीशांनी पकडले. उरलेल्यासैनिकांनी चिडून पुरंदरच्या मामलेदाराला ठार मारले. यामुळे ४ ऑगस्ट १८५७ रोजी कनय्या मांग, धर्मा मांग यांना तोफेच्या तोंडी देण्यात आले. हे दोघेही लहूजींचे सैनिक होते. तसेच बाकीच्या साथीदारांना फाशी देण्यात आली. ब्रिटीशांना या सर्व बंडकारांना लहूजींकडूनच प्रशिक्षण मिळत असावे असा संशय आल्याने लहूजींनी पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी पुणे सोडले. लहूजी बैराग्याच्या वेशात, तर त्यांचे सैनिक पोतराज, फकीर, ज्योतिषी बनले. व पोलिस चौकीसमोर बसून हालहवाल देऊ लागले. पुण्याबाहेर पडल्यानंतर लहूजींनी कृष्णाखोरे, वारणा खोरे, पालीचा डोंगर , सातारा, पन्हाळा या दुर्गम भागात प्रशिक्षण केंद्रे उभारली. लहूजींना फिरंग्याची राजवट उलटून टाकलेली पाहायचे होते.१७ फेब्रुवारी १८८१ रोजी पुण्याच्या संगमपुराच्या परिसरात एका झोपडीवजा घरामध्ये आपल्या मायभूमीसाठी आजन्म व्रत स्वीकारलेल्या लहुजी साळवेंची प्राणज्योत मालवली व एका महाक्रांतिपर्वाचा शेवट झाला.महापुरुष, समाजसुधारकांना घडविणारे लहुजी साळवे मात्र स्वत: उपेक्षितच राहिले. एखादी महान व्यक्ती देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वत:चे सर्वस्व अर्पण करते. मात्र ती व्यक्ती प्रसिद्धीपासून वंचित राहते. अशा महान व्यक्तीची जयंती व पुण्यतिथी कधी होऊन जाते हे लक्षातही येत नाही. आपले संपूर्ण आयुष्य खर्चून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढवय्यांची संघटना लहुजींनी उभी केली होती. 1857 च्या स्वातंत्र्य लढय़ात त्यांनीच प्रशिक्षित केलेले तरुण अधिक होते.त्यांच्या या महान कार्याला तोड नाही. अशा या थोर क्रांतिगुरू वीर लहुजी वस्ताद या कट्टर राष्ट्रभक्ताला कोटी कोटी प्रणाम!
Post By...
Sandip Khatpe

No comments:

Post a Comment