Total Pageviews

Monday, 9 October 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४६०


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४६०
मराठेशाहीला साम्राज्यवादाची चव दाखवणारा हा पहिलाच सेनापती.
श्रीमंत बाजीराव पेशवे
भाग १३
माळव्याप्रमाणे कर्नाटकातही बाजीरावाने हात - पाय मारून पाहिले. स. १७२५ - २६ व स. १७२६ - २७ अशा लागोपाठ दोन मोहिमा त्याने शाहूच्या आज्ञेने दक्षिणेत काढल्या. परंतु, स्वतंत्र वृत्तीने काम करण्याची सवय असलेल्या बाजीरावास ' बारभाई ' पद्धतीचा कारभार पसंत नव्हता. कर्नाटक मोहिमेत प्रतिनिधी व सेनापती हि बडी धेंडं त्याच्या सोबत असून त्यांचा दर्जा बाजीरावाच्या बरोबरीचा असल्याने त्यांच्यावर बाजीरावाची हुकुमत नव्हती. सबब, या स्वाऱ्या निष्फळ ठरल्या.
परंतु, बाजीरावाच्या भाग्योदयाची वेळ आता नजीक आली होती. बाजीराव कर्नाटक स्वारीत गुंतलेला असताना स. १७२७ मध्ये निजाम - संभाजी यांनी एकत्रितपणे शाहूवर स्वारी केल्याने शाहूने बाजीरावासह आपल्या सर्व प्रमुख सरदारांना कर्नाटक मोहिमेतून मागे बोलावले. आपले लष्करी नेतृत्व व सामर्थ्य आजमवण्याची हि एक संधी चालून आली असून या संधीचे कोणत्याही परिस्थितीत सोनं केलचं पाहिजे या ईर्ष्येने बाजीरावाने निजामावरील मोहीम हाती घेतली. याकामी त्याला आपल्या भावाची - चिमाजीआपाची - बहुमोल मदत झाली. आपल्या सैन्याचे दोन भाग करून चिमाजीवर त्याने नाशिक ते सातारा - मिरजपर्यंतच्या प्रदेशचे रक्षण करण्याची जबाबदारी सोपवली व स्वतः बाजीराव आपल्या वेगवान घोडदळासह निजामाच्या प्रदेशांत शिरला. बाजीरावाचे युद्धविषयक धोरण स्पष्ट होते. आपल्याकडे तोफखाना नाही तर निजामाचा तोफखाना जय्यत तयारीत आहे. अशा स्थितीत निजामासोबत लढाई करायची तर त्याच्या तोफखान्याचा सामना करणे टाळले पाहिजे. याची पक्की खूणगाठ बाजीरावाने मनाशी बांधली. त्यानुसार निजामाच्या प्रदेशांत जाळपोळ, लुटालूट करीत बाजीराव गुजरातकडे निघून गेला. पाठोपाठ त्याचा संहार करण्यासाठी निजामही चवताळून त्याच्यामागे धावला. बाजीरावाचा पाठलाग करताना जड तोफांचा अडथळा होतो म्हणून बव्हंशी तोफखाना मागे ठेऊन निवडक तोफांसह तो बाजीरावाच्या पाठीवर जाऊ लागला. अखेर पालखेडजवळ निजामाला त्याच्या मुख्य तोफखान्यापासून वेगळे करण्यात बाजीरावास यश मिळाले व त्याचा त्याने पुरेपूर फायदा उचलला. निजामाच्या फौजेभोवती त्याने आपल्या धावत्या तुकड्यांच्या चौक्या नेमल्या. पालखेडनजीक निजामाचा मुक्काम पडला तेव्हा याच धावत्या तुकड्यांनी निजामाची रसद पूर्णतः तोडून टाकली. त्यामुळे घाबरून जाउन निजाम तहास राजी झाला. तेव्हा ६ मार्च १७२८ रोजी मुंगी शेवगांव येथे उभयतांमध्ये तह घडून आला. या तहानुसार दक्षिणच्या सहा सुभ्यांतून चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याच्या शाहूच्या हक्कांना निजामाने मान्यता दिली.

 

No comments:

Post a Comment