Total Pageviews

Thursday, 5 October 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४१०

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४१०

धनाजी जाधव आणि त्याचा वंश:
भाग 2

चंद्रसेन जाधव:-
हा धनाजीचा मुलगा. धनाजी आजारी असतांना बाळाजी विश्वनाथ हा त्याचा कुल कारभार पाहूं लागला, तेव्हां त्याच्या मनांत बाळाजीविषयीं मत्सर उत्पन्न झाला. वास्तविक चंद्रसेनाचा ओढा ताराबाईकडे होता व तो आंतून तिला (शाहूच्या विरुद्ध) फितूरहि झाला होता.

धनाजीच्या मरणानंतर चंद्रसेनाकडे सेनापतित्व आलें. इ. स. १७१३ मध्यें मोगलाईंतून चौथ, सरदेशमुखी व घांसदाणा हे हक्क वसूल करण्याकरितां चंद्रसेनाची योजना झाली होती. या प्रसंगीं वरील हक्कांपैकीं सरदेशमुखी गोळा करण्याकरितां चंद्रसेनाबरोबर बाळाजी विश्वनाथाची नेमणूक झाली असल्यामुळें बाळाजीविषयीं चंद्रसेनाचा द्वेषाग्नि अधिकच भडकला. त्यानें क्षुल्लक कारणावरून (हरणाचा तंटा) कुरापत काढून बाळाजीचा पाठलाग केला व (शाहूच्या आज्ञेवरून) त्यास पांडवगडामघ्घें आश्रय मिळाला असतां चंद्रसेनानें त्या किल्ल्यास वेढा दिला, व बाळाजीस आपल्या हवालीं करण्याविषयीं शाहूजवळ उर्मटपणानें मागणी केली. शाहूनें हैबतराव निंबाळकरास जाधवाचें पारिपत्य करण्यास पाठविलें. निंबाळकरानें जेऊरजवळ चंद्रसेनाचा पराभव केला; तेव्हां तो उघडपणें कोल्हापूरकर संभाजीकडे गेला; परंतु पुढें लवकरच दक्षिणेंत निजामउल्मुल्क आल्यावर त्यानें निजामाच्या पदरीं चाकरी धरली व शाहूचा पाडाव करण्याची खटपट चालविली. बेदरच्या पूर्वेस २५ मैलांवर भालकी येथें बरीच मोठी जहागीर निजामानें जाधवास देऊन त्यास आपल्या पदरीं ठेविलें. मराठेशाहीस निजाम यापुढें त्रास देई तो याच्याच बळावर. चंद्रसेनास शाहूनें वळवून घेतलें असतें तर निजामाच्या कायमचा त्रास मिटला असता. इ. स. १७१६ मध्यें सय्यदबंधु हुसेन अल्लीखान याचा दिवाण महकबसिंग व खंडेराव दाभाडे यांच्या दरम्यान अहमदनगराजवळ जी लढाई झाली तींत चंद्रसेन मोंगलांकडून लढत होता.

इ. स. १७२० मध्यें निजामउल्मुल्क हा मोंगल बादशहापासून स्वतंत्र होण्याच्या उद्देशानें दक्षिणेंत आला तेव्हां चंद्रसेन जाधव त्याच्या सैन्यास जाऊन मिळाला. बाळापुरच्या लढाईंतहि चंद्रसेन निजामाकडून लढला. स. १७२५ त तर चंद्रसेनानेंच निजामास शाहूविरुद्ध उठविलें होतें.

इ. स. १७२७-२८ मध्यें निजाम व बाजीराव यांच्यामध्यें जें युद्ध झालें, त्यांत चंद्रसेन लढत होता. त्यानेंच संभाजीस शाहूकडे राज्याचा हिस्सा मागण्यास चिथविलें होतें. त्यानें १७३९ सालीं संभाजीचा पक्ष घेऊन बीडकडे धुमाकूळ घातला. हा १७५१ सालीं मरण पावला.

No comments:

Post a Comment