Total Pageviews

Thursday, 5 October 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४११

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४११

धनाजी जाधव आणि त्याचा वंश:
भाग 3
रामचंद्र जाधव:
- हा चंद्रसेनाचा मुलगा. इ. स. १५५६ त हैद्राबादचा नबाब सलाबतजंग यानें रामचंद्र जाधव व रावरंभा निंबाळकर यांनां बुशीच्या पाठलागार्थ त्याच्या मागोमाग पाठविलें होतें परंतु बुशी आपलें फारसें नुकसान न होऊं देतां हैद्राबादेस जाऊन पोंचला. यानंतर बुशीनें याला आपल्याकडे वळवून घेतल्यामुळें यानें मच्छलीपट्टणाहून बुशीच्या मदतीस हैद्राबादेस जी कुमक येत होती तिला मुळींच अडथळा केला नाहीं.

स. १७५६ च्या अखेरीस बुशी आपल्या पूर्वकिनार्यावरील जहागिरीकडे निघून गेल्यावर, बुशीकडे जी कुमक आली होती, तिला अडविण्याच्या कामीं रामचंद्र जाधवानें जी हयगय केली, तिजबद्दल त्याचें पारिपत्य करण्यासाठीं, सलाबत जंगानें त्याजवर स्वारी करून, त्याची बहुतेक जहागीर त्याजकडून काढून घेतली. बाह्यत: मात्र, रामचंद्र जाधवानें कराराप्रमाणें चाकरीस ठेवावयास पाहिजे तेवढी फौज ठेविली नाहीं, असें या स्वारीचें कारण दाखविण्यांत आलें होतें. उदागीरच्या लढाईंत हा निजामाकडेच होता. स. १७६१ मध्यें निजामअल्लीनें गोदावरीतीरीं असलेल्या कायगांव टोकें नांवाच्या गांवातील हिंदु देवळें उध्वस्त केल्यावरून, रामचंद्र जाधव मोंगलांनां सोडून मराठयांच्या पक्षास मिळाला.

इ. स. १७६२ त राघोबादादानें याला सेनापतीचीं वस्त्रें दिलीं. परंतु सेनापति या नात्यानें गुजराथप्रांतहि आपल्या ताब्यांत देण्यांत येईल अशी जी यास आशा होती, ती सफळ न झाल्यानें हा लवकरच पुढें पुन्हां निजामअल्लींकडे गेला. रामचंद्र हा स. १७६९ त निजामकडून मारला गेला. त्याचा पुत्र खाशेराव ह्यास भालकीची जहागीर मिळाली होती. तो टिप्पूबरोबरच्या एका लढाईंत ठार झाल्यावर (१७९१) त्याची जहागीर खालसा झाली. सांप्रत याचा वंश निजामहींत नांदत आहे. [जाधवांची कैफियत; डफ, राजाराम व शाहु यांच्या बखरी; खाफीखान; पेशव्यांची बखर.]


No comments:

Post a Comment