मुरारराव घोरपडे
संताजी घोरपड्यांचा नातू मुरारराव घोरपडे यास सेनापती पद देऊन माधवराव पेशव्यांनी घोरपड्यांच्या राष्ट्रसेवेची कदर केली.
स. १७७६ च्या आरंभी तुंगभद्रेच्या दक्षिणेस फक्त मुरारराव घोरपड्यांचे गुत्ती संस्थान तेवढे हेदराचे कबजांत गेले नव्हते. मुराररावास आता पुण्याकडून मदत येणे शक्य नाही असा अंदाज बांधून हेदर गुत्तीवर चालून गेला ह्या प्रसंगी मुराररावाने बाणेदार वर्तन करून शत्रू पुढे शूर पुरुषास शोभण्या सारखा आपला शेवट करून घेतला. तो कितीही हृदयद्रावक असला तरी मराठी राष्ट्राच्या कीर्तीस सदैव उज्वलता आणणारा आहे या पूर्वी अनेकवार मुराररावावर हेदराने चढाई केली होती. आणि तितक्यांदा हिमतीने त्याने हेदराशी टक्कर देऊन त्यास दूर ठेविले. मुरारराव म्हणजे कर्नाटकातील मराठशाहीचा मूर्तिमंत इतिहास होय. त्यांचा जन्म इ. स. १७०४ च्या सुमाराचा असून हल्ली ते वृद्धवस्थेत पोहचलेले होते. मुराररावास साह्य करण्यास जवळ मराठ्यांच्या दुसऱ्या फोजा नाहीत असे पाहून हेदराने गुत्तीचे जवळ येऊन त्यास सांगून पाठवले की " तू शरण येऊन खंडणी देण्याचे कबूल कर व आमचे लष्करात फोजेसहित हजर होऊन ताबेदार हो असे न केल्यास तुझे संस्थान सर्व काबीज करितो. त्यावर मुराररावाने उत्तर पाठविले की, तू कालचा पाच प्याद्यांवरचा नाईक आणि आज मी कमी दिसलो तरी मराठी साम्राज्याचा सेनापती आहे. तुजपुढे मी मान वाकविणार नाही. तुझ्याशी दोन हात करण्यास मी तयार आहे. असे उत्तर येताच हेदरने गुत्तीवर स्वारी केली. तेव्हा मुराररावाने काही फोज व कुटुंबाची माणसे चुलत पुतण्या शिवराव घोरपडे याज बरोबर मडकशिऱ्यावर पाठवून आपण स्वतः तीन चार हजार निवडक लोकांसह किल्ला लढविण्याच्या इराद्याने ठासून बसला. चार सहा महीने पावेतो त्याने हेदरास दाद दिली. महिना पंधरा दिवसात पेशव्यांची व पटवर्धनाची मदत येईल अशी त्याची अटकळ होती. परंतु याच वेळी बारभाईंनी इंग्रज वकीलांशी पुरंदरावर तहाची वाटाघाट चालून हरिपंत व पटवर्धन गुजरातेत दादाच्या शहावर होते. करवीरकर छत्रपती पटवर्धनांवर उठले. अशा अनेक अकल्पित कारणांनी मुराररावांचे मदतीस पुण्याकडून कोणीच जाऊ शकले नाही मुराररावाने तीन महिने पराकाष्टा करून किल्ला झुंजविला पुढे नाईलाज होऊन त्याने हेदराशी सल्ला करण्याचा घाट घातला, तो साधला नाही एवढ्यात गुत्तीच्या किल्ल्यात पाण्याची टंचाई झाल्यामुळे मुराररावास शत्रूच्या स्वाधीन व्हावे लागले. हेदरानेही कमालीचा नीचपणा करून सत्तर वर्षाच्या या वृद्ध व शूर पुरुषास कपालदुर्गाच्या तुरुंगात बेडी ठोकून व हाल करून मुलामाणसांसह ठार मारले.
मुराररावांचे बाणेदार वर्तन अद्यापि त्या राज्यात ताजे असून तत्कालीन लेखात मनोरम बनले आहे मुराररावा सारख्या सुप्रसिद्ध राष्ट्रपुरुषाची अंतकाळची तपशीलवार हकीकत मिळत नाही. मुराररावांच्या दोन मुलांची नावे व्यंकटराव व नरसिंगराव अशी आढळतात त्यांचा भाऊ दौलतराव व पुतण्या शिवराम हे पुढे हेदराशी लढतच होते. शिवराम पुढे मुराररावाचा दत्तक होऊन सोंडूरचा मालक झाला. मुराररावाचा भाऊ दौलतराव यास गजेंद्रगडची नवीन जहागीर पेशव्यांनी दिली.
संधर्भ : मराठी रियासत - गोविंद सखाराम सरदेसाई.
- विकास नगरे.
No comments:
Post a Comment