हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४४०
गोपाळराव बर्वेंची पानिपतवर अडकलेल्या भाऊला मदत
१७६० च्या अखेरीस गोविंदपंत बुंदेला, अब्दालीची रसद मारण्यासाठी रोहिलाखंडात शिरले. पानिपत येथे मराठी सैन्याची अन्नपाण्यावाचून वाताहात झाली होती. अन्न विकत घेण्यासाठी हातात पैसा सुद्धा नव्हता, भाऊ सतत मामलेदरांकडे पैश्यासाठी तगादा लावत होते.
३० डिसेंबर १७६० रोजी उत्तरेतला अजून एक मामलेदार गोपाळराव गणेश बर्वे, दहा हजाराचे अनअनुभवी सैन्य घेऊन शूजाच्या मुलुखात घुसला. गोपाळरावांच्या मराठी शिलेदारांनी भोजपुरच्या बळकट गढीवर हल्ला चढविला. या गढीत काही उत्तम बंदुकधारी रोहिले होते पण मराठ्यांच्या पुढे त्यांचा टिकाव लागला नाही आणि ते पळून जवळच असलेल्या धरेमौ गढीच्या आश्रयास गेले. मराठ्यांनी आता या गढीला वेध घातला. उपासमार झाल्याने किल्लेदाराने पूर्ण ताकदीनिशी मराठ्यांवर प्रतिहल्ला केला पण या चकमकीत सुद्धा रोहिल्यांचा पूर्ण बिमोड झाला, त्यांचे अनेक सैनिक कापले गेले तर अनेक युद्ध बंदी झाले. मराठ्यांनी शूजाच्या मुलुखाची वाताहात केली आणि ते तसेच पुढे अलाहाबाद प्रांतात सरकले. अलाहाबाद जवळ असलेल्या नबाबगंज या समृद्ध पेठेवर मराठ्यांनी हल्ला केला आणि ही पेठ लुटून फस्त केली. मराठे तसेच फुलपुर्यास गेले आणि तिथे सुद्धा त्यांनी तोच प्रकार केला. गंगेच्या तीरावर मराठ्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता. हे करण्या मागे त्यांचे मुख्य उधिष्ठ म्हणजे, शुजा ने अद्बली आणि नजीबची साथ सोडून पुन्हा आपल्या प्रांतात यावे. पण हे सगळे करायला फार उशीर झाला होता कारण पानिपतावर मराठ्यांचा पराभव झाला होता आणि हे जेव्हा गोपाळरावांस समजले तेव्हा त्यांनी ही मोहीम सोडून सैन्यासह सुखरूप कुडाजहानबादेस परत आले.
खरे म्हणजे पानिपतावर मराठ्यांची वाताहत होत असताना गोपाळरावांन सारख्या एका सामान्य मामलेदाराने असा पराक्रम करणे म्हणजे भूषणास्पद गोष्ट आहे. पण दुर्दैवाने आज या गोपाळरावांचे साधे नाव सुद्धा कुणास माहित नाही, पण पानिपतच्या पराभवाचे खापर मात्र अनेक इतिहासकार आणि कादंबरीकार मामलेदारांवर फोडतात.
संदर्भ: त्र्यंबक शेजवलकरांनी मात्र गोपाळरावांची ही शौर्यगाथा "पानिपत १७६१" या त्यांच्या पुस्तकामध्ये नमूद केली आहे.
No comments:
Post a Comment