Total Pageviews

Friday, 7 October 2016

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३६.२

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३६.२ 

हिंदुस्थानचा पाटील
अलिजाबहाद्दर महादजी शिंदे
भाग ३

पहिल्या इंग्रज-मराठे युध्दांतील महादजीचा कामगिरी मुत्सद्देगिरीची होती. तिचें वर्णन 'नाना फडणवीस' या लेखांत सांपडेल. सालबाईच्या तहानंतर महादजीनें ज्या रजपूत राजांनीं त्याचा मुलूख बळकविला होता त्यांचा पराभव करून आपला प्रांत परत घेतला. आतांपर्यंत इंग्रजांशीं झालेल्या लढायांत त्यांच्याकडील कवायती पलटणींचा उपयोग पाहून, महादजीनें फ्रेंचांनां चाकरीस ठेऊन तोफा ओतण्याचे व हत्त्यारें तयार करण्याचे कारखाने काढून कवायती पलटणें तयार केलीं व त्यांच्या बळावर गेल्या १० वर्षांत दिल्‍लीच्या बादशाहीवरील जें मराठयांचें वर्चस्व नाहीसें झालें होतें तें पुन्हां प्रस्थापित केलें आणि यापुढें १०।१२ वर्षे सर्व उत्तरहिंदुस्थानचीं सूत्रें आपल्या हातीं खेळविलीं. यावेळी दिल्‍लीच्या बादशाहीला हाताखालीं घालण्याचा उपक्रम शीख, इंग्रज व मराठे हे तिघे करीत होते; परंतु त्यांत अनेक कारणांनीं मराठेच पुढें आले. याच वेळीं महादजीनें पातशहाकडून पेशव्यांस वकील-इ-मुतलकचें पद व स्वतःस त्या पदाची नायबगिरी मिळवून, साऱ्या बादशाहींत गोवधाची मनाई करविली. बादशहास दरमहा ६५ हजारांची नेमणूक करून देऊन महादजीनें सारी पादशाही आपल्या हातांत घेतली (१७८५). यानंतर कांही काळ मोंगली पादशाही लुप्त होऊन साऱ्या हिंदुस्थानभर हिंदुपदपादशाही सुरू झाली

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३६.१


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३६.१ 


हिंदुस्थानचा पाटील
अलिजाबहाद्दर महादजी शिंदे
भाग २

गोहदच्या जाटावर राघोबादादानें स्वारी केली, तींत महादजीनें शिंद्याच्या दौलतीतर्फे मुख्य म्हणून पहिल्यानें भाग घेतला होता. मम्हारराव व मालेराव होळकर मेल्यावर त्यांची दौलत सरकारजमा करावी असा राघोबादादा यांचा मानस होता, परंतु यावेळी महादजीनें होळकरशाहीचा बचाव केला. यामुळें त्याचें वजन माळव्यांत चांगलेंच बसलें. यापुढें उदेपूरच्या गादीच्या तंटयांत त्यानें आपला हात साधून ६० लक्षांची खंडणी (व कांहीं प्रांत) मिळविला. नंतर राघोबाच्या फितव्याचा बंदोबस्त थोरल्या माधवरावांच्या बरोबर राहून केल्यानें, पेशव्यानीं महादजीस सर्व हुजूरपागेचा सेनापति करून जहागीरीहि दिली. पुढें पानपतचें अपयश धुऊन काढण्यास पेशव्यानीं बिनीवाले प कानडे यांनां दिल्‍लीकडे पाठविलें; त्या मोहिमेंत (१७७१) महादजी होता. या सुमारास त्यानें नजीबखानाचा प्रांत लुटून फस्त केला व शहाअलम बादशहास इंग्रजांच्या हातून सोडवून दिल्‍लीस त्याची स्थापना केली. बारभाईच्या कारस्थानांत कोणास मिळावें याबद्दल प्रथम महादजीचा निश्र्चय झाला नव्हता; परंतु नाना व बापू यांनीं शेवटीं त्याला मुलूख वगैरे देऊन आपल्या बाजूस घेऊन त्याच्याकडूनच राघोबाचा बंदोबस्त केला. मात्र या वेळेपासून महादजीच्या मनांत नाना फडणविसाबद्दल असूया उत्पन्न झाली. या सुमारासच भाऊसाहेबांच्या तोतयाच्या प्रकरणांत महादजीनें कारभाऱ्यांस मदत केली व कोल्हापुरकरांचा पराभव केला.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३५

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३५
हिंदुस्थानचा पाटील
अलिजाबहाद्दर महादजी शिंदे
भाग १

प्रसिद्ध मराठी वीर. हा राणेजीचा चिमाबाई नांवाच्या रजपूत बाईंच्या पोटीं झालेला मुलगा. याचें चरित्र म्हणजे नाना फडणविसाच्या चरित्रासारखा ३५-४० एक वर्षाचा प्रकारें हिंदुस्थानचाच इतिहास होय. राणेजीच्या पश्चात् बरेच दिवस महादजी हा खुद्द पेशव्यांच्या खाजगी पागेंत होता; तो आपल्या भावांबरोबर लहानपणापासूनच मोहिमांवर जात असे; त्यामुळें त्याला युद्धशास्त्राचें शिक्षण तेव्हांपासून मिळालें होतें, तसेंच नानासाहेब पेशव्यांच्या खाजगी पागेंत असल्यानें त्यांच्या संगतीनें मुत्सद्दीपणांतहि महादजी तरबेज झाला. महादजीनें प्रथम तळेगांव-उंबरीच्या निजामावरील लढाईंत शौर्य गाजवून नांव मिळविलें. यानंतर औरंगाबाद (१७५१), साखरखेडलें (१७५६), पंजाब (१७५९) वगैरे मोहिमांत तो हजर होता. पुढें कांहीं काळ हिंदुस्थानचें आधिपत्य जें त्याच्या हातीं आलें, त्यास कारण असलेला अभ्यास, त्यानें या पहिल्या काळांत नानासाहेब पेशवे व जयाप्पा, दत्ताजी वगैरे बंधूंच्या सहवासानें केला. पानपतावर भाऊसाहेबांबरोबर हा दक्षिणेंतून निघाला होता. पानपतांत शेवटच्या दिवशीं जेव्हां उरलेले लोक पळाले, तेव्हां हाहि परत फिरला. वाटेंत एका पठाणानें त्याला डाव्या पायावर सांग मारून जन्माचा लंगडा केला असतां, राणाखान नांवाच्या एका मराठे लष्करांतील माणसानें त्याला शेवटपर्यंत निभाऊन आणलें. त्याबद्दल खानास महादजीनें भाऊ मानून व पुष्कळ इनामें देऊन योग्यतेस चढविलें. राघोबादादांच्या घालमेलीच्या कारकीर्दीत महादजी हा, पटवर्धन, प्रतिनिधीप्रमाणें निजामाकडे जाऊन मिळण्याच्या बेतांत होता.

Thursday, 6 October 2016

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ३४


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३४

जयपूर ला मराठांच्या दरारा

जयपुर – हिंदुस्तानच्या राजकारणातील एक महत्वाचे शहर, कछवाह वंशाचे आमेर संस्थानचे राजे यांचा बालेकिल्ला.
घटना आहे १७४५ ते १७५० च्या दरम्यानची.या वेळी जयपुरवर राज्य होते इश्वरीसिन्हाचे. मीर्जा राजा जयसिंह-सवाई जयसिंह-राजा अभयसिंह असा प्रवास करत जयपुरचा ताबा आता इश्वरीसिन्हाकडे आला होता. या दरम्यान पडलेला महत्वाचा फरक म्हणजे मराठ्यांच्या वाढत्या ताकदीचा अंदाज घेउन ह्या जयपुरकरांनी आता बचावात्मक पवित्रा घेत मराठ्यांशी वरपांगी दोस्तीचे राजकारण स्वीकारले होते. नाईलाजाने आणि स्वार्थाने. इश्वारीसिन्हाला मराठ्यांची मदत हवी होती पण मिळत नव्हती. उम्मेदसिंह हाडा हा बूंदी संस्थानावरील ताबा गमावून बसलेला बूंदीचा एक वारसदार आणि स्वतःला जयपुरचा वारसदार समजणारा माधोसिंह हे इश्वारीसिन्हाच्या विरोधात उभे होते. वास्तवात माधोसिंह हा इश्वरीचा धाकटा भाऊ आणि या नात्याने ईश्वरीसिन्हाने आपल्या राज्याचा काही भाग हा माधोसिन्हाला द्यायला हवा होता पण तो मधोसिन्हाचा हक्क सरळ सरळ नाकारत होता. माधोसिन्हाने मराठ्यांची मदत घेण्याचे ठरवले आणि त्याने पेशव्यांशी एक करार केला की – जर मराठ्यांच्या मदतीने त्याला जयपुर मधील टोंक, तोडा, मालपुरा आणि बरवाडा हे चार महाल मिळाले तर तो मराठ्याना १० लाख रुपये नजर करील आणि रक्कम मिळेपर्यंत हे चार महाल उत्पन्नासह मराठ्यांच्या ताब्यात राहतील.
१ मार्च १७४७ च्या सकाळी लढाईला तोंड फुटले आणि दीड दिवस चाललेल्या या युद्धात मराठे-माधो-जगत-उम्मेद या मित्रगटाचा पराभव झाला.याला कारण होते सूरजमल जाट. ह्या म्होरक्याने ऐन वेळी केलेल्या मदतीच्या जोरावर इश्वारिसिन्हाला निसटता विजय मिळाला. ह्या विजयाच्या उन्मादात ईश्वरीसिन्हाने पेशव्यांना एक खरमरीत पत्र लिहिले -
“ … पेशवे व आम्ही मित्र होतो, माझे पिताजी आणि बाजीराव हे मित्र होते पण प्रस्तुतचा प्रश्न हा पूर्वजांच्या मालमत्तेवरील हक्काचा आहे. आम्ही राजपुरुष आहोत आणि रुढी ह्या आम्ही पाळल्याच पाहिजेत ! धाकट्या भावाबरोबर वाटणी करून आम्ही भित्रे आहोत अथवा नालायक पुत्र आहोत अशी नामुष्की आम्ही स्वतःवर का ओढून घ्यावी ? पेशवे व मल्हार ह्यांची सूचना की आम्ही माधोसिन्हाला काही मुलुख द्यावा आम्हाला अमान्य आहे. राज्ये परमेश्वर देतो आणि त्याने हे राज्य आम्हाला दिले आहे. मल्हार सोबत आम्ही पग्ड्यांची अदलाबदल करून जी मैत्री प्रस्थापित केली होती, आणाभाका केल्या होत्या त्याची कटू फळे आता आम्हाला दिसत आहेत… “

ह्या पत्राचा परिणाम असा झाला की पेशव्यांच्या हुकुमाने १७४८ च्या जुलै मध्ये मल्हारराव होळकर, पुत्र खंडेराव आणि गंगोबातात्या चंद्रचूड हे ससैन्य जयपूरवर चालून गेले. सहा दिवस चाललेल्या धुमश्चक्रीत ईश्वरीसिन्हाची पीछेहाट झाली आणि पुन्हा सुरजमल जाटाला पुढे घालून ईश्वरीसिंह पळाला आणि बगृच्या किल्ल्यात जाऊन बसला. दरम्यान जयपूरच्या आस -पास पावसाच्या सरी दाखल झाल्या आणि रक्तासोबत चीखलही माजू लागला. मराठे भर पावसात बगृला वेढून बसले. रसद आणि कुमक मिळणे कठीण झाले. मराठ्यांनी तर जयपूर सैन्यासाठी येणारी रसद पकडून ती घेऊन येणाऱ्या तांड्यातील वाहकांचे नाक आणि कान कापले. आता ईश्वरीसिन्हाने तहाचे बोलणे लावले.तहाकरिता वकील म्हणून पुढे आला केशवदास (पेशवेकालीन मुघल दरबारातील पर्शियन तज्ञ आयमल ह्याचा मुलगा). केशवदासने प्रथम गंगोबातात्याला आपल्या बाजूने करीत मल्हाररावला वश केले आणि तह झाला. तहात माधोसिन्हाला ५ महाल मिळाले, उम्मेदसिन्हाला राज्य आणि मराठ्यांना १० लाख रुपये. मराठ्यांना निरोप देत प्रधान केशवदास आपल्या धन्यासह जयपुरकडे निघाला.
ईश्वरीसिंह अत्यंत हलक्या कानाचा माणूस होता.हरगोविंद नटानी ह्या नावाचा सरदार ईश्वरीच्या राज्याचा प्रधान बनू पहात होता. त्याने एक बनावट पत्रव्यवहार तयार केला आणि केशवदासावर राजद्रोहाचा आरोप केला. योग्य चौकशी न करिता ईश्वरीसिन्हाने त्वरित केशवदासाला देहांत शिक्षा सुनावली आणि त्याला विष देऊन ठार करण्यात आले. मराठ्यांशी झालेल्या तहाचा मध्यस्थी असणारा केशवदास मृत्यू पावला. हरगोविंद प्रधान झाला आणि मराठ्यांना हप्त्यांनी येत असलेले खंडणीचे ओघ थांबले. मराठे आता पुऱ्या जोमानिशी जयपूरवर जाण्याच्या विचारात होते आणि ह्या दरम्यान मृत प्रधान केशवदासाच्या कुटुंबाने मराठ्यांकडे न्यायाची मागणी केली. मराठ्यांनी आता स्वारीबाबतचा निश्चय दृढ केला. हरगोविंदच्या नादी लागून ईश्वरीसिन्हाने आपल्या विश्वासातील अनेक जणांना सेवेतून दूर केले आणि त्याला सल्ला देणारे विश्वासातील असे दोघेच उरले, ते म्हणजे त्याचा माहूत आणि त्याचा न्हावी !
सप्टेंबर १७५० मध्ये मराठे निघाले. खंडेराव व मल्हारराव होळकर, गंगोबा तात्या, जयाप्पा शिंदे असे मातब्बर असामी ससैन्य जयपूरच्या रोखाने पुन्हा निघाले.केशवदास मल्हाररावचा चांगला मित्र होता त्यामुळे मल्हारराव चांगलाच संतप्त झाला होता. ईश्वरीसिन्हाकडून आलेल्या वकिलाला त्याने धुडकावून लावले आणि खंडणीचे १० लाख रुपये मागितले. ईश्वरीसिन्हाने हा क्रोध प्रथम ओळखलाच नाही आणि वकीलासोबत आधी २ आणि नंतर ४ लाख रुपये पाठवले, ह्या कृत्याने तर मल्हारराव जास्त संतापला आणि त्याने जयपूर खालसा करण्याची जणू प्रतीज्ञाच केली. जयपूरच्या रोखाने मल्हारराव निघाला आणि १२ डिसेंबर रोजी तो जयपूरच्या शहराबाहेर पोहोचला. ईश्वरीसिन्हाला ही खबर मिळाली त्याने आपले प्रिय सल्लागार माहूत आणि न्हावी ह्यांना पर्याय शोधायला सांगितला आणि त्यांच्या सांगण्यावरून एक छोटी कुमक मराठ्यांवर चालून गेली. संतप्त मराठ्यांनी एका प्रहरात जयपूर बाहेरील मैदानावर ह्या फौजेचा निकाल लावला आणि जयपूरच्या रोखाने निघाले.आता मात्र ईश्वरीसिंह चांगलाच घाबरला त्यानी पुन्हा आपल्या सल्लागारांना बोलावले पण तोवर सल्लागारांनी पळ काढला होता. प्रधान हरगोविंद ह्याने उरलेली तुटपुंजी फौज मराठ्यांवर पाठवून स्वतः अज्ञात झाला होता.ईश्वरीसिन्हाला आता आपल्या कृतीचा पश्चाताप झाला. मल्हाररावच्या ताकदीचा अंदाज त्याला होता,बगृच्या किल्ल्यात बसून त्याने मराठ्यांची ताकद पहिली होती आणि आता तो भयंकर घाबरला, त्याला ह्यातून काहीच मार्ग सुचेना.कुणीही सल्लागार मिळेना. मराठे जयपुरात दाखल झाल्याची एक उडती अफवा दुपारच्या शेवटी त्याला मिळाली आणि सायंकाळच्या पहिल्या तासी त्याने एक भयानक पवित्रा घेतला.
त्याने आपल्या नोकरांना बोलावले आणि आपल्याला काही औषध करण्याकरिता हवे आहे असे सांगून त्याने नोकरांकरवी सोमलखार आणि एक जहरी नाग मागवला. रात्रीचा अंमल सुरु होताच त्याने, त्याच्या ३ राण्यांनी आणि एका आवडत्या रखेलीने सोमलखार प्राशन करून व नाग दंश करवून आत्महत्या केली. एका बंद महालात घडलेली ही दुर्दैवी घटना पुढे सुमारे १८ तास गुप्त राहिली. अनाथ जयपूर स्वैर मर्जीने प्रतिकार करीत होते. प्रेते तशीच सडत कुजत पडली होती. मराठे कब्जा करीत शहरात पोहोचले आणि त्यांना ही शोकांतिका समजली. वृद्ध मंत्री विद्याधर आणि हरगोविंद हे आता महालात जमले होते आणि त्यांनी ही वार्ता मराठ्यांना सांगितली. १८ तास राजाचे कलेवर अग्निसंस्काराशिवाय पडून होते. मल्हाररावाने जरूर त्या खर्चास पैसे देवून त्या मृतदेहावर राजवाड्याच्या बागेत अंत्यसंस्कार करविले. त्या अग्नीत ईश्वरीसिंहाची एक राणी आणि आणखी २० रखेल्या सती गेल्या.राजवाड्यात मराठे पहारेकरी बसले आणि जयपूरवर मराठी अंमल
- इति -
प्रणव महाजन
संदर्भ
पेशवे दफ्तर निवडक पत्र रुमाल क्र.२७
Fall of the Mughal Empire – Vol 1 – Jadunath Sarkar
दस्तूर-उल-अमल-इ-आगही – आयमल व केशवदास.
Translation of “वीर विनोद“ & “चहार गुलजार” By Jadunath Sarkar.
राजपुताना वंशभास्कर – १८४१
—saambhar :"सेवेठायी तत्पर मराठा"

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठी साम्राज्य याचा शोध भाग ३३

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठी साम्राज्य याचा शोध
भाग ३३
घाटगे मराठा घराणे -भाग ५
सखाराम (सर्जेराव) घाटगे :-
पुढें दौलतरावानें पटवर्धनावर स्वारी केली त्यावेळीं सखारामानें कोल्हापुरकरांची मदत शिंद्यास मिळवून दिली होती (१८००). यानंतर तो उत्तर हिंदुस्थानांत जाण्यासाठीं निघाला तेव्हां त्यानें सखारामाच्या हाताखालीं पांच पलटणी व दहा हजार स्वार देऊन त्यास पुण्यास ठेवलें. परंतु सखारामानें पुण्याच्या दक्षिणेकडील मुलुखांत लुटालुटीची मोहीम सुरू केली (१८०१).
पुढें तो पुण्यास आला व पैशाकरितां बाळोजी कुंजराच्या घरांत धरणें देऊन बसला. त्यानें पेशव्यांच्या दरबारांतील एकाहि माणसाचा अपमान करण्याचें बाकी ठेविलें नव्हतें. शेवटीं बाळोजी कुंजरानें सावकारांवर वराता देण्याकरितां ह्मणून त्याला आपल्या घरीं बोलावून व त्याचा मोठा आदर सत्कार करून थोडया वेळानें कागद आणण्याचें मिष करून तो तेथून जाऊं लागला. बाळोजी तेथून उठला कीं घाट ग्यास कैद किंवा ठार करण्यांत यावें असा पूर्वी संकेत झाला होता. परंतु बाळोजीचा हेतु ओळखून सखारामानें स्वत उठून व बाळोजीचा हात धरून त्याला आपल्या बरोबर आणलें व आपण घोडयावर बसून तेथून निघून गेला. नंतर त्यानें आपल्या सर्व सैन्यासह पुणें शहर लुटून जाळून फस्त करण्याची बाजीरावास धमकी दिली. परंतु बाजीरावानें इंग्रज वकिलाच्या मध्यस्तींने तो प्रसंग टाळला.
याच सुमारास सखारामास शिंद्याचें माळव्यांत निघून येण्याविषयीं निकडीचें बोलावणें आल्यावरून तो पुण्याहून निघून दौलतरावास नर्मदापार जाऊन मिळाला. शिंद्यानें त्यांस १०,००० घोडदळ व कवाइती पायदळांच्या चौदा पलटणी देऊन इंदूर लुटण्याकरितां पाठविलें. तेव्हां यशवंतराव होळकरहि कांहीं कवायत शिकविलेल्या पलटणी, ५००० बिनकवायती पलटणी व २५००० स्वार घेऊन चालून आला. दोन्ही पक्षांत कांहीं दिवस किरकोळ चकमकी झाल्यावर शेवटीं होळकरानें शिंद्याच्या लष्करावर जोराचा हल्ला केला; तथापि त्यांत त्याचा पराजय होऊन इंदूर लुटलें गेलें. इंदूर हातीं आल्यावर सखारामानें तेथें इच्छेस येईल त्याप्रमाणें पशुतुल्य क्रुरपणाचीं व अंगावर शहारे आणण्यासारखीं कृत्यें केलीं (डफ पुस्तक ३, पृ.२०१). पुढें इंग्रजांचें यशवंतराव होळकराशी युध्द चाललें असतां शिंद्यानें होळकरास मिळावें अशी सखारामाची आरांभापासून इच्छा होती व त्याप्रमाणें (१८०४ आक्टोबर) दोलतराव हा ब-हाणपुराहून उज्जनीकडे जावयास निघाला होता. भरतपूरच्या जाटानें इंग्रजांशीं तह केल्यावर, होळकर व शिंदे एक होऊन अजमेरला आले तेव्हां सर्जेराव हाच शिंद्याचा दिवाण होता. व त्याचें मत वरीलप्रमाणें होळकराप्रमाणेंच शिंद्यानेंहि इंग्रजांशीं युध्द चालू ठेवावें असें होतें. तथापि पुढें सर्जेरावच्या जुलमी वर्तनामुळें स्वत च शिंद्यानें त्याला कामावरून दूर केलें. यानंतर शिंदे व होळकर यांनीं इंग्रजांशीं तह केला. त्यांत दोघांनींहि अत:पर सर्जेरावच्या सल्ल्यानें न चालण्याचा व त्याला आपल्या पदरीं चाकरीस न ठेवण्याचा करार केला (१८०५) परंतु पुढें लवकरच हा करार रद्द करण्यांत आला. व घाटग्यानें शिंद्याच्या कारभारांत पुन्हां वर्चस्व संपादन केलें. पुढें एकदां वाठारच्या निंबाळकर नांवाच्या एका शिलेदारास शिंद्यांच्या इच्छेविरूध्द जहागीर देण्याचें घाटग्याच्या मनांत येऊन त्या गडबडींत मानाजी फांकडयाचा मुलगा आनंदराव शिंदे यानें सखारामास जागच्याजागीं भाल्यानें भोसकून ठार केलें (१८०९-१०). डफनें याला राक्षस म्हटले आहे (पु.३.पृ.३२४). याला सर्जेराव असा किताब होता. याच्याच वंशांत कोल्हापूरचे माजी राजे शाहूछत्रपती यांचा जन्म झाला होता.
(डफ.पु.३; खरे-ऐ.ले. संग्रह पु.१० ११ १२).)
==== माहिती संकलन द्वारा -विशाल बर्गे इनामदार

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठी साम्राज्य याचा शोध भाग ३२


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठी साम्राज्य याचा शोध
भाग ३२

घाटगे मराठा घराणे -भाग ४

सखाराम (सर्जेराव) घाटगे :-

दौलतरावानें मागितलेले दोन कोट रूपये देण्यासाठीं पेशव्यांनी घाटग्यास शिंद्याची दिवाणगिरी देऊन बाळोजी कुंजराच्या मदतीनें पुण्यांतील लोकांपासून पैसे गोळा करण्याच्या कामावर त्याला नेमिले. यावेळीं पैसे गोळा करण्याकरितां घाटग्यानें जे उपाय योजले ते अत्यंत अमानुष होते (डफ) शनिवार वाडयांत जुनी कारभारी मंडळी कैदेंत होती, त्यांनां त्यानें बाहेर काढून ते आपला पैसा कोठें आहे तें सांगेपर्यंत त्यांच्या अंगावर कोरडे ओढून, त्यांच्या जवळून बलात्कारानें सर्व पैसा काढून घेतला. शहरांतील व्यापारी, सराफ वगैरे ज्या ज्या लोकांजवळ पैसा आहे असें वाटत होतें त्यासर्वांनां पकडून त्यांचा इतका छळ करण्यांत आला कीं, त्यांतील कांहीं मंडळीं त्यायोगें मरणहि पावली. गंगाधरपंत भानू यांस पैंशासाठीं तापलेल्या तोफेवर बांधलें असतां तो तेथल्या तेथेंच मरण पावला. महादजीच्या दोघा वडील बायकांनीं दौलतरावावर आपल्या धाकटया सवतींशी व्यभिचार केल्याचा आरोप केला, तेव्हां घाटग्यानें बळजबरीनें त्यांनां पकडून खूप मार दिला व त्यांची अतिशय विटंबना केली (१७९८). (डफ. पु.३.पृ.१६२). त्यामुळें बायकांच्या बाजूस असलेल्या मुजप्फरखानाची व सखारामाची दोनदां चकमक उडाली.

सखारामाच्या वर्तनास कोणाकडूनहि प्रतिरोध न झाल्यामुळें शेवटीं तो इतका बेताल झाला कीं, तो शिंद्यासहि जुमानीना. फकीरजी गाढवे याच्या साहाय्यानें लोकांपासून बळजबरीनें पैसे उकळण्याचें काम त्यानें चालविलेंच होतें. शिंद्यांच्या सैन्यांतील चार अधिका-यांस तर बायांच्या बंडांत सामील असल्याच्या केवळ संशयावरून त्यानें तोफेच्या तोंडीं दिले.शेवटीं आपला स्वत:चाच उपमर्द होऊं लागल्यानें चीड येऊन व पेशव्यांच्या आज्त्रेवरून आणि लोकांच्या शिव्यापाशास कंटाळून शिंद्यानें सखारामास पकडून कैदेंत टाकलें (१७९८). परंतु बाळोबातात्यानें रदबदली करून त्याला कैदेंतून सोडविलें (१८००). कैदेतूल सुटतांच त्यानें पुन्हां शिंद्यावर पगडा बसविला व बाळोबातात्याच्या विरूध्द एक पक्ष उपस्थित केला आणि शिंद्याचें मन वळवून बाळोबास व त्याच्या अनुयायांस कैद करवून नगरच्या तुरूंगात त्यांची रवानगी केली. बाळोबा कैदेंत लवकरच मरण पावला. त्याचा भाऊ धोंडीबा यास सखारामानें तोफेच्या तोंडीं दिलें. नारायणराव बक्षी (शिंद्याचा सेनापति) याच्या अंगास दारूचे बाण बांधून ते पेटविण्यांत आले; त्याबरोबर त्या दुर्दैवी माणसाचें शरीर आकाशांत उडून त्याच्या चिंध्या चिंध्या झाल्या. हेंहि कृत्य सखारामानें केले.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठी साम्राज्य याचा शोध भाग ३१

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठी साम्राज्य याचा शोध
भाग ३१
घाटगे मराठा घराणे -भाग ३
सखाराम (सर्जेराव) घाटगे :-
पुढें सखारामानें मायकेल फिलोज याच्याकडून विश्वासघात करवून नानांस शिंद्याच्या गोटांत आणवून नंतर फिलोज कडून त्यांनां व बरोबर आलेल्या सर्व बडया बडया मंडळींसह कैद केलें. त्यांच्या बरोबरचे स्वार व शिपाई यांना लुटून लंगडे, लुळे केले, व कांहींनां तर ठार मारलें. नंतर घाटग्यानें केवळ नानांच्याच नव्हे तर त्यांच्या अनुयायांच्याहि घराची मनस्वी लुटालूट केली. तेव्हां यांपैकीं कांहीं मंडळींनीं त्याच्या लूट मिळुविण्याकरितां आलेल्या शिपायांशी तोंडहि दिलें. एखाद्या शत्रूनें अकस्मात् हल्ला चढवावा अशी त्यावेळीं पुणें शहराची स्थिती झाली होती. सर्व रात्रभर व दिवसादेखील शहरांत गोळीबार चालत असे. सर्व बाजूंनीं रस्ते अडवून ठेविले जात व शहरांत हलकल्लोळ, लुटालूट व रक्तपात याशिवाय दुसरें कांहीं दिसत नसे. सर्व लोक घाबरून गेले होते. व रस्त्यांतून जाणारी मंडळी जमावानें व सशस्त्र जात (पुण्यांतील सर्जेरावी-नवयुग, १९२२).
पुढें (१७९८) मार्च सखारामाच्या मुलीचा दौलतराव शिंद्याशीं विवाह झाला. हीच प्रसिध्द बायजाबाई शिंदे होय.