Total Pageviews

Sunday, 9 April 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २३७


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २३७
तत्त्वासाठी लढणारे मराठे
डॉ. सदानंद मोरे
भाग ८
पानिपतच्या युद्धावरून शेजवलकरांनी मराठ्यांच्या एकंदरच राजकारणाविषयी काढलेला निष्कर्षही बोधप्रद आहे. ""पानिपतच्या युद्धामुळे सिद्ध झालेली महत्त्वाची गोष्ट ही, की मराठे हिंदुस्थानचे राज्यकर्ते म्हणून वागत होते. केवळ लुटारू म्हणून दुसऱ्या लुटारूशी लढले नाहीत. हिंदुस्थानात सत्ताधीश कोणी व्हावयाचे किंवा राहावयाचे याबद्दल वाद असो, पण हे राज्य हिंदी रहिवाशांचेच असले पाहिजे व तेच येथील राज्यकर्ते राहिले पाहिजेत, या तत्त्वासाठी मराठे पानिपतास लढले. परक्या अब्दालीला येथे कोणताच नैतिक हक्क नाही असे त्यांचे आव्हान होते. पेशव्याने 1752 च्या अदृदनाम्याने---- सहा सुभ्यांच्या चौथाईच्या बदल्यात दिल्लीच्या पातशाहीचे रक्षण अब्दालीपासून करण्याचे कार्य अंगावर घेतले होते. ते कार्य त्याने यथाशक्य पुढे चालविले. अब्दालीला दिल्लीतून व पंजाबातून हुसकून एकवार तरी त्याला अटकेपार घालवून मुलतान व पंजाब येथील कारभार वर्षभर त्यांनी केला. नंतर आलमगीर बादशहाने भाऊस फर्मान पाठवून स्वतःच्या रक्षणास बोलाविले. त्याप्रमाणे भाऊ दिल्लीस येऊन त्याने अब्दालीचा हस्तक घालवून मृत बादशहाचा मुलगा बादशहा म्हणून जाहीर केला. एवढेच नव्हे, तर त्याला साफ बुडविण्यासाठी कंबर कसली. बादशहास न जुमानणाऱ्या हिंदू व मुसलमान संस्थानिकांवर त्यांनी सारखे शस्त्र धरिले. एवढे सर्व त्यांनी आपण दिलेल्या शब्दासाठी व अंगावर घेतलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी एकट्याने, दुसऱ्याच्या मदतीशिवाय केले. मोगलांच्या ताब्यातून गेलेले काबूल व कंदाहार हे अटकेपारचे दोन सुभेसुद्धा त्यांनी अब्दालीस देऊन टाकले नाहीत. मोगल साम्राज्याचा भाग म्हणून राखण्याचेच त्यांनी ठरविले व यासाठीच पानिपतचा पराभव आपणावर ओढवून घेतला. त्याच्याप्रमाणे एक लाख स्वार तयार ठेवण्याचे सामर्थ्य दुसऱ्या कोणत्याही सत्ताधीशाने त्या काळी दाखविले नाही. धार्मिक बाबतीत ते हिंदू-मुसलमान असा भेद करून वागले नाहीत किंवा त्यांनी आपल्या वागणुकीत कोठे धर्मवेडेपणाही दाखविला नाही. क्लाइव्हप्रमाणे खोटे कागद करून किंवा राजपूत मुसलमानांप्रमाणे मारेकरी घालून त्यांनी आपला हेतू साध्य केला नाही. युद्धानंतर शस्त्रे काढून घेतलेल्या कैद्यांची कत्तल त्यांनी केल्याचे ठाऊक नाही किंवा शत्रूची शिरे अकारण कापून त्यांच्या राशी घालण्याच्या वा ती भाल्यावर मिरवण्याचा रानटीपणाही त्यांनी कधी आचरिला नाही.''
शेजवलकरांच्या या विस्तृत उताऱ्यावर आणखी भाष्य करण्याची गरज नाही.

 

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २३६

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २३६
तत्त्वासाठी लढणारे मराठे
डॉ. सदानंद मोरे
भाग ७
एरवी पेशवाईचे कठोर टीकाकार असलेल्या शेजवलकरांनीही हे कबूल केले आहे, ""मराठ्यांचा दिल्लीच्या बादशहाच्या छत्राखाली हिंदू-मुसलमानांचे संयुक्त साम्राज्य चालविण्याचा प्रयत्न हाच सर्वांच्या हिताचा होता. अब्दालीस आठवण राहण्यासारखे तोंड मराठ्यांनी पानिपतास दिले. याचा परिणाम त्याने दिल्लीचे नाव कायमचे सोडून देण्यात झाला. एवढेच नव्हे, तर भाऊसाहेबाच्या बोलीप्रमाणे पंजाब मराठ्यांकडे ठेवल्यास तो जो राजी नव्हता, त्याला अखेर तो प्रांत शिखांच्या स्वाधीन करणे लवकरच भाग झाले. शीख धर्मवेडे व शूर असल्यामुळे त्यांना ते राज्य आपल्या ताब्यात आणता आले हे खरे; पण मरानी अब्दालीस याद राखण्याची तंबी पोचविली असल्यानेच शिखांचा उदय सर झाला, हे इतिहासास विसरता येत नाही.''
शिखांच्या धर्माची प्रेरणा त्यांनी संत नामदेव नावाच्या मराठी माणसाकडूनच घेतली, हे सर्वज्ञात आहे. नामदेवांची पन्नासावर कवने आपल्या पवित्र गुरुग्रंथसाहेब या ग्रंथात समाविष्ट करून व नामदेवांच्या नावाचे कितीतरी गुरुद्वारे उभारून शिखांनी त्यांच्याविषयीची आपली कृतज्ञता हातचे काहीही न राखता व्यक्त केलेली आहे; परंतु शिखांच्या राजकारणाचा उगमही मराठ्यांच्या राजकारणात आहे, या वस्तुस्थितीची नोंद गंभीरपणाने घेतली गेलेली दिसत नाही.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २३५

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २३५
तत्त्वासाठी लढणारे मराठे
डॉ. सदानंद मोरे
भाग ६
पानिपतच्या या लढाईत मराठ्यांचा पराभव झाल्याचे व त्यांना त्याचा मोठा धक्का बसल्याचे सर्वज्ञातच आहे. त्याची काही चर्चा आपण यापूर्वी केलेलीही आहे. या संदर्भात इतिहासकार त्र्यं. शं. शेजवलकर यांनी केलेले विवेचन आजही महत्त्वपूर्ण मानले जाते. शेजवलकर लिहितात ः "पानिपत येथे मराठ्यांचा पराभव झाला व तेणेकरून महाराष्ट्रावर दुःख, खेद, विषाद यांची छाया पसरली; पण ती तात्कालिकच होती. या पराभवाचे परिणाम आपणास सर्वस्वी मारक होतील, असे त्यास त्या काळी वाटलेले दिसत नाही. अखिल हिंदुस्थानच्या कल्याणाच्या दृष्टीने विचार करता काहींना हा युद्धशास्त्रदृष्ट्या झालेला पराभव नैतिकदृष्ट्या मोठा विजयच वाटला असल्याचे दिसून येते. इव्हॅन्स बेल या विचारवंत इतिहासाभ्यासकाने संशोधनकाळापूर्वीच लिहिले ः पानिपतची लढाईसुद्धा मराठ्यांना अभिमानास्पद व कीर्तिस्पद अशीच घटना समजली पाहिजे! मराठे "सर्व हिंदी लोकांसाठीच हिंदुस्थान' या ध्येयासाठी लढले! पण दिल्ली, अयोध्य व दख्खन येथील प्रबळ मुसलमान सत्ताधीश मात्र या वेळी कारस्थाने करीत, आपल्या चैनीत दंग होऊन एका बाजूस बसले आणि जरी मराठ्यांचा युद्धात पराजय झाला तरी विजयी अफगाण जे यानंतर एकदा परत गेले ते हिंदी राजकारणात ढवळाढवळ करण्यासाठी पुन्हा दिल्लीस आले नाहीत! शेजवलकर याच संदर्भात प्राचार्य रॉलिन्सन यांनी काशीराजाच्या खरीस लिहिलेल्या प्रस्तावनेतील मजकूर उद्‌धृत करतात ः ""विशिष्ट परिस्थितीचा विचार करता इतिहासातील एखादा पराजय विजयाइतकाच सन्मानदायक म्हणावा लागतो आणि मराठ्यांच्या सर्व इतिहासात त्यांच्या फौजेने राष्ट्रातील सर्व उत्तम शिलेदारांसह पानिपतच्या घनघोर रणक्षेत्रात आपल्या देशाच्या व धर्माच्या वैऱ्यांशी लढताना जे मरण पत्करले त्याहून जास्त यशदायक मरण इतिहासात क्वचितच नोंदले गेले असेल!''

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २३४


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २३४
तत्त्वासाठी लढणारे मराठे
डॉ. सदानंद मोरे
भाग ५
नजीब आणि काही स्थानिक धर्मांधांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन अहमदशहाने हिंदुस्थानवर पुन्हा एकदा आक्रमण केले. या आक्रमणाची खबर पुणे दरबारी पोचली व रक्षणासाठी त्वरा करण्याचा बादशाही खलितासुद्धा आला. मात्र या वेळी नानासाहेब पेशव्यांनी राघोबादादाऐवजी सदाशिवरावभाऊ या चिमाजीअप्पाच्या चिरंजीवाकडे सेनेचे आधिपत्य देण्याचा निर्णय घेतला. भाऊने नुकतीच उदगीरच्या लढाईत निजामाला धूळ चारली होती व राघोबाच्या मोहिमेत पेशव्यांचा काही फायदा न होता दौलतीच्या कर्जात मात्र भर पडली असल्याने भाऊची नियुक्ती स्वाभाविकच म्हणावी लागते. भाऊबरोबर नानासाहेबांचा थोरला मुलगा विश्वासरावही मोहिमेवर जाईल असे ठरले.

 

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २३३

 



हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २३३
तत्त्वासाठी लढणारे मराठे
डॉ. सदानंद मोरे
भाग ४
परंतु तेव्हाचे लहान-मोठे हिंदू सत्ताधीशसुद्धा मराठ्यांच्या म्हणजेच आपल्या धर्मबांधवांच्या मदतीला धावले नाहीत, हे येथे नमूद करायला हवे. खरे तर त्यांनाही उत्तरेच्या राजकारणात मराठ्यांचा शिरकाव नको होता. हे सारे राजेरजवाडे तेव्हा स्वस्थ बसून गंमत पाहत राहिले. अब्दालीच्या हातून मराठे परस्पर नर्मदेच्या दक्षिणेस लोटले गेले, की मग परत आपलीच सद्दी चालेल, असाच त्यांचा होरा असावा. थोडक्यात सांगायचे म्हणजे, तेव्हाचे सर्व हिंदू-मुसलमान सत्ताधारी एक तर धर्माच्या किंवा संकुचित स्वार्थाच्या आहारी गेले होते. या पार्श्वभूमीवर मराठ्यांनी केलेल्या संघर्षाचे नीट मूल्यमापन अजूनही झालेले दिसत नाही. धर्माने हिंदू असलेले मराठे धर्माने मुसलमान असलेल्या राजसत्तेचे रक्षण करण्यासाठी स्वतःस पणाला लावतात, ही घटनाच मुळी भारताच्या धर्मनिरपेक्ष धोरणाचा पाया घालणारी आहे. सदाशिवरावभाऊंनी या सर्व सत्ताधीशांना पत्रे लिहून कळविले होते, की अब्दाली हा परकीय शत्रू असून, मोगलांची सल्तनत हिंदुस्थानी म्हणजेच स्वकीय व स्वदेशी आहे. परकीय आक्रमणापासून या स्वदेशी सत्तेचे रक्षण करणे व त्यासाठी आपापसांतील किरकोळ भांडणे दूर ठेवून एकत्रितपणे परकीय सत्तेचा मुकाबला करणे, हे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे. दुर्दैवाने मराठ्यांच्या या व्यापक राष्ट्रीय व धर्मनिरपेक्ष धोरणाचे महत्त्व हिंदुस्थानातील तेव्हाच्या धर्मांध व स्वार्थांध सत्ताधीशांना समजूच शकले नाही, आणि त्यांनी मराठ्यांना एकटे पाडायचे ठरवले.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २३२

 



हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २३२
तत्त्वासाठी लढणारे मराठे
डॉ. सदानंद मोरे
भाग ३
एरव्ही अब्दाली हिंदुस्थानवर पुन्हा हमला करण्याचा उत्साह न दाखविता; परंतु याच देशातील काही मूलतत्त्ववादी कट्टरपंथीयांनी अब्दालीच्या धर्मभावनेला साद घातली. लुटीचे प्रलोभन तर पूर्वीपासूनचेच होते. त्यात प्रतिशोधाच्या इच्छेचीही भर पडली होती. आता नजीबखान रोहिला हा हिंदुस्थानातील त्याचाच जातभाई आपल्या शहा वली उल्लाह या धर्मगुरूच्या उपदेशानुसार त्याला भारतातील इस्लामचे धर्माने हिंदू असलेल्या काफीर मराठ्यांपासून रक्षण करण्यासाठी निमंत्रित करीत होता. वास्तविक पुकार असा होता, की खुद्द नजीबालाही दिल्लीचे तख्त ताब्यात घेण्याची तहान होती. त्यात वली उल्लाहने "इस्लाम खतरेमें' असल्याची आरोळी दिली. नजीबाने मग अब्दालीला सर्व प्रकारचे साह्य करण्याचे आश्वासनही दिले. दिल्लीवर वर्चस्व ठेवण्याच्या मार्गातील मराठ्यांचा अडथळा त्याला अब्दालीच्या मदतीने दूर करायचा होता. अब्दाली व नजीब हे दोघे एकाच धर्माचे व एकाच म्हणजे सुन्नी पंथाचे. नबाब सुजाउद्दौला मुसलमान असला, तरी शियापंथीय असल्यामुळे त्याची सहानुभूती मराठ्यांना होती. त्याला आपल्याकडे वळविण्यात नजीब यशस्वी झाला.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २३१

 



हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २३१
तत्त्वासाठी लढणारे मराठे
डॉ. सदानंद मोरे
भाग २
अंताजीची दूरदृष्टी
राघोबादादाच्या भरारीमुळे अहमदशहा अब्दालीच्या सर्व हस्तकांना अफगाणिस्तानकडे पळ काढावा लागला, याचा उल्लेख झालेलाच आहे. रेणको अनाजी, रायाजी सखदेव आणि गोपाळ बर्वे या वीरांकडे लाहोरचा बंदोबस्त देऊन रघुनाथराव पुण्यास परतला; परंतु उत्तरेकडील मराठा मुत्सद्द्यांनी हा बंदोबस्त कायमचा व पक्का हवा, असा आग्रह पुणे दरबाराकडे धरला होता. मराठ्यांकडून डिवचला गेलेला अब्दाली सूड घेण्यासाठी परत आल्याशिवाय राहणार नाही, याची पुरती कल्पना मराठ्यांचा दिल्ली येथील प्रतिनिधी अंताजी माणकेश्वर यास होती. त्याने मे 1758 मध्ये राघोबाला लिहिले ः "जरि स्वामीची छावणी लाहोरप्रांती झाली, तरी वजीर पातशहास घेऊन छावणीस आपल्या जवळ घेऊ येतो. जरि करिता आपण काही आपली दहा हजार फौज ठेऊन इकडे येतील तरी हे दोघे सरदार आपल्या सरदारांजवळ ठेवतील. आपण येथे खासा छावणी करतील तेथेच हे खासा वजीर छावणी आपणाजवळ करतील. आपणावेगळे कोठे खासा निराळे रहात नाहीत. परंतु वजिराने व लहान-मोठे सर्वत्र म्हणतात, खासा छावणी न जाली तर पठाण मागती लाहोर प्रांती पावसाळा येतील. उगेच लोक म्हणतात ते सेवेशी लिहिले. करणे न करणे अखत्यार खावंदाचा.''
दुर्दैवाने अंताजीने बिचकत बिचकत दिलेल्या या इशाऱ्याचे गांभीर्य पेशवे दरबारास कळले नाही व मराठ्यांचा लाहोर प्रांतीचा अंमल अल्पजीवीच ठरला.