Total Pageviews

Saturday, 14 March 2020

स्वराज्याचे पांडव भाग २ रामचंद्र नीलकंठ बावडेकर (अमात्य)

स्वराज्याचे पांडव

 भाग २

 रामचंद्र नीलकंठ बावडेकर (अमात्य)

राजाराम महाराजांच्या कारकिर्दीच्या सुरवातीला महाराष्ट्रातील बराचसा प्रदेश आणि किल्ले मोगलांच्या हाती पडले. ह्या कठीण समयी मोगलांच्या विरुद्ध महाराष्ट्रातल्या लढ्याचे नियोजन व नेतृत्व केले ते रामचंद्र पंत बावडेकर (अमात्य) ह्यांनी. रामचंद्र पंतांनी शिवाजी महाराजांच्या काळापासून ते थेट महाराणी ताराबाईंच्या वेळेपर्यंत स्वराज्याची अविरत सेवा केली. राजाराम महाराजांनी जिंजीला जायच्या आधी त्यांना हुकूमतपनाह (सर्वोच्च अधिकार असेलेली व्यक्ती) हा खिताब बहाल केला - ह्या गोष्टी वरूनच त्यांच्या क्षमतेची आणि कर्तृत्वाची कल्पना येते. मोगलांविरुद्धची मोहीम त्यांनी आपल्या विशाळगडाच्या तळावरून यशस्वीपणे चालू ठेवली होती. पहिल्याच मोहिमेत त्यांनी शृंगारपूर , संगमेश्वर आणि पाटण व कराड च्या आसपासचा अतिशय दुर्गम आणि डोंगराळ प्रदेश परत जिंकून घेतला. ह्यामुळे आता मराठा फौजेला कठीण समयी गरज पडल्यास एक सुरक्षित आश्रयस्थान मिळाले. राजाराम महाराजांच्या संपूर्ण कारकिर्दीच्या कालावधीत रामचंद्र पंतांनी मोगलांविरुद्ध शह आणि काटशह चालू ठेवले होते - ज्यामुळे पूर्ण महाराष्ट्र कधीच औरंगजेबाच्या हाती पडला नाही.

रामचंद्र पंतांकडे माणूस निरखून त्याला योग्य पद्धतीने हाताळण्याची कला होती. एखाद्या व्यक्तीतले कौशल्यगुण हेरून त्यांचा पुरेपूर उपयोग कसा करायचा हे त्यांना चांगलच अवगत होतं. आधी उल्लेख केलेल्या चौघांनी त्यांच्या नेतृत्वाखाली जागरूकपणे लढा चालू ठेवला. अतिशय खडतर काळात रामचंद्रपंतांनी उपलब्ध मनुष्यबळ व साधनांचा अतिशय प्रभावी उपयोग केला. शंकराजी आणि परशुराम त्रिंबक ह्यांनी मुख्यत्वे मोगलांनी महाराष्ट्रात घेतलेले किल्ले व प्रदेश परत जिंकून घेण्याचे काम केले. संताजी व धनाजी ह्यांनी सुरुवातीला महाराष्ट्रात वायुगतीने आणि विजेच्या चपळाईनी मोघल फौजे वर असंख्य हल्ले करून त्यांना परेशान करून सोडलं. नंतर रामचंद्रपंतांनी स्वराज्यच्या ह्या २ रत्नांना महाराष्ट्रा बरोबरच कर्नाटक व दक्षिण भारतात मोगलांवर हल्ले करण्याची जबाबदारी दिली होती. संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर नेतृत्वहीन मराठा फौजेला एकजूट बांधून ठेवण्यात रामचंद्र पंतांचा मोठा हातभार होता. स्वराज्याच्या बंद पडलेल्या करवसुलीच्या व्यवस्थेला पुनरुज्जीवन दिल्यामुळे स्वराज्याची महाराष्ट्रात पूर्ण विस्कटलेली घडी पुन्हा थोडी सावरली गेली. मोगलांना फितूर होणाऱ्यांच्या कुटुंबाला रामचंद्र पंत अटकेत ठेवायला लागले - ह्यामुळे फंद-फितुरीला बऱ्याच प्रमाणात आळा बसला. स्वराज्यसाठीचा हा लढा आणि प्रशासकीय कामातला हातभार रामचंद्र पंतांनी महाराणी ताराबाईंच्या कालावधीत हि असाच अखंड चालू ठेवला.

स्वराज्याचे पांडव भाग १

स्वराज्याचे पांडव

भाग १  

ह्या परिस्थितीची कल्पना करा
- स्वराज्याला मोगलांच्या अवाढव्य सेनेनी घेरलंय
- स्वराज्याच्या छत्रपतींना फितुरीने कैद करून, छळ होऊन हौतात्म्य
- स्वराज्याचे सरनोबत छत्रपतींना वाचवण्याच्या प्रयत्नात मारले जातात
- अकस्मात घडलेल्या घटनांमुळे स्वराज्याच्या फौजेत नेतृत्वा अभावी आलेला विस्कळीतपणा
- स्वराज्याच्या राजधानीला गनिमाचा विळखा
- नवअभिषिक्त छत्रपती गनिमा पासून बचाव करत पर्यायी सुरक्षित जागेकडे पळतीवर

१६८९ सालच्या मार्च महिन्यात , संभाजी महाराजांच्या दुर्दैवी मृत्यू नंतर , अगदी हाच कठीण प्रसंग महाराष्ट्र वर ओढवला होता


अशा परिस्थितीत अक्ख्या स्वराज्य आणि रयतेला गोंधळ, भीती आणि गनिमाच्या क्रूरतेचा विळखा पडण्याची शक्यता होती. स्वराज्याचे सगळे किल्ले आणि दौलत गनिमाच्या हातात सहज पडतील अशी परिस्थिती उद्भवली होती. तसे झाले असते तर शिवाजी महाराजांची विचारसरणी आणि त्यांनी सुरु केलेली ही क्रांती इथेच संपुष्टात आली असती. स्वराज्यासाठी हा अतिधोक्याचा प्रहर होता.

पण इतिहास साक्ष आहे कि स्वराज्य संपुष्टात तर आले नाहीच परंतु उलटून मोगल साम्राज्याला असा प्रतिकार केला कि १८व्या शतकात मराठा साम्राज्य शिखरा वर पोचले आणि मोगल राजवट केवळ नाममात्र तेवढी राहिली. ह्या अवघड समयी हजारो मराठी शिवाजी-भक्त आपल्या स्वराज्यासाठी असामान्य कर्तृत्व दाखवून लढले आणि त्यांच्या शौर्यामुळे हे शिवस्वराज्य टिकून राहिले. ह्या अगणित मर्द गड्यांपैकी ५ लोकं असे आहेत ज्यांना स्वराज्याचे पांडव म्हणता येईल - रामचंद्र नीलकंठ बावडेकर (अमात्य), शंकराजी नारायण गंडेकर(सचिव), परशुराम त्रिंबक कुलकर्णी (पंत प्रतिनिधी) , संताजी घोरपडे (सरनोबत) आणि धनाजी जाधव.

सांभार :आदित्य गोखले

 https://adityagokhale.wixsite.com/kingdomofsahyadrim


जानोजीराजे भोसले(प्रथम)


जानोजीराजे भोसले(प्रथम)
नागपुर कर भोसले मुळ चे कोरेगाव तालुका सातारा मधील देऊर या गाव चे आहेत
राजेरघुजी भोसले यांचे पुञ नागपुर,इ स १७५५ to १७७२ = राजेरघुजी याना ४ पुञ होते-मुधोजी, जानोजी, बिँबाजी आणि साबाजी. जानोजी व साबाजी हे धाकट्या राणीचे आणी मुधोजी व बिँबाजी हे मोठ्या राणीचे पुञ परंतू जानोजीराजे हे सर्व भावंडात मोठे असल्याने रघुजीराजे यांच्या म्रुत्युपुर्वीच "सेनासाहेब सुभा" हे पद व गादिवर बसण्याचा निर्णय दिला.परंतु जानोजीराजे व मुधोजीराजे यांच्यात गादिवरुन वैमनस्य आले त्यामुळे दरबारातील वडिलधार्या व मुत्सद्दी लोकांनी पुढाकार घेउन पेशव्याकडुन जानोजीराजेस "सेनासाहेब सुभा" ची वस्ञे देऊन गादिवर बसवले आणि मुधोजीराजेस "सेनाधुरंधर" हा किताब देऊन समेट घडवुन आणला.
रघुजीराजेनी बंगालवर स्वार्या करुन ओरिसा पर्यँत मुलुख काबीज केला त्यात जानोजीराजे यानी चांगला पराक्रम गाजवला.मराठ्यांतर्फे ओरिसा प्रांतावरील सुभेदार असलेल्या मीर हबीब यास अलवर्दिखानाने ञास दिल्यानंतर त्याचा बंदोबस्त जानोजीराजेनी केला व इ स १७५१ मध्ये भोसल्याना बलसोर बंदरापर्यँत सर्व कटक प्रांत देऊन तह केला,शिवाय बंगाल व बिहार यांच्या चौथाई बद्दल नवाबाने रघुजीराजेना दरसाल १२ लाख रु देण्याचे कबुल केले.
याप्रमाणे जानोजीराजेंच्या कर्तबगारीमुळे ओरिसाप्रांतावर नागपुरकर भोसल्यांचा अधिकार झाला.इ स १७६१ मधिल पानिपतच्या पराभवानंतर नानासाहेब पेशव्याचा २३ जुन १७६१ धक्क्याने पुण्यात म्रुत्यु झाला त्यावेळी जानोजीराजेनी बुंदेलखंडात जाऊन बंडाळ्या मोडुन मराठ्यांचा दरारा प्रस्थापीत केला, याचे श्रेय जानोजीराजेकडेच जाते. पानिपतचा पराभव व नानासाहेबाचा म्रुत्यु यामुळे निजामाने ६० हजार फौज घेऊन पुण्यावर चाल करण्यास निघाला त्यावेळी जानोजीराजेना मराठा संघराज्यातुन अलग करण्यासाठी दिवाण विठ्ठल सुंदर तर्फे सातार्याच्या गादिचे अमिष दाखवुन कटकारस्थान केले.पुढे हैदराबादचा निजाम अलिखानाने वर्हाडातिल प्रदेश जिँकण्यास सुरुवात केली.निजामअलीची व जानोजीराजेची गाठ बर्हाणपुर जवळ पडली निजामअलिने इब्राहिम खान गारदीच्या(हाच पुढे पानिपतच्या युद्धात मराठ्याकडुन लढला) तोफखान्याच्या मदतीने जानोजीराजेँचा इ स १७५७ मध्ये पराभव केला आणी एलिचपुर येथे तह झाला त्यानुसार वर्हाडातील उत्पन्नापैकी ४५% नागपुरकर भोसल्यानी तर 55% निजामाने घ्यावे असे ठरले.
राघोबादादा व माधवराव पेशवे यांच्या भांडणात जानोजीराजेनी राघोबादादाकडुन बाजु घेतल्यामुळे आणि पुण्यावर १७६३ साली केलेल्या स्वारीचा(यात जानोजी यांच्या रघुजीं कारंडे या सरदाराने मोठा पराक्रम केला होता.) वचपा म्हणून जानोजीराजेना धडा शिकवण्यासाठी माधवराव पेशव्याने इ स १७६८ मध्ये नागपुरवर स्वारी करुन शहराची धुळधाण करुन प्रचंड लुटमार केली.नंतर चंद्रपुरला वेढा दिला.परंतु जानोजीराजे बाहेर असल्याने नजरकैदेत असलेल्या राघोबादादाची सुटका करतील या भितीने वेढा उठवुन त्यांचा पाठलाग करुन तह करण्यास भाग पाडले.या तहास कनकपुरचा तह म्हणतात.
या तहानुसार जानोजीराजेकडुन पेशव्यानी मराठासंघावरील स्वत:चे सर्व अधिकार मान्य करुन घेतले.२४ एप्रिल इ स १७६९ रोजी मेहकर येथे जानोजीराजे व माधवराव पेशवे यांच्या भेटी झाल्या.याच भेटीच्या परतीच्या मार्गावर नळदुर्ग परिसरात जानोजी यांच्या खालावलेल्या प्रकृतीला प्लेगच्या काळात आजाराने येडोळा या गावी गाठले. १६ मे १७७२ साली त्यांच्या जेष्ठ बंधुनी याच गावी भडाग्नि दिला.
जानोजी भोसले (नागपुर) यांची समाधी, यडोळा, उस्मानाबाद.
संदर्भ __ Rajenaresh Jadhavrao

Monday, 21 January 2019

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २०२


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २०२

।। रयतेचा राजा शिवछत्रपती ।।
भाग ७
सांभार :www.marathidesha.com

पुरंदरचा तह

छत्रपती बसरूर मोहिम संपवून स्वराज्यात परत येत असताना त्यांना मिर्झाराजे जयसिंग याच्या आक्रमणाची बातमी समजली.स्वराज्यावर आलेल्या या मोठ्या संकटाशी सामना करण्यासाठी महाराज लगोलग राजगडावर पोहचले.शके १५८७ म्हणजेच १६६५ मध्ये मोगल सरदार मिर्झाराजे जयसिंग याच्या दिलेरखान या सेनापतीने पुरंदराला वेढा घातला.पुरंदरच्या माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले.सभासदाच्या बखरीमध्ये याचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे.

'तेव्हा पूरंधरावरी नामजाद लोकांचा सरदार राजियाचा मुरारबाजी परभू म्हणून होता.त्याजबरोबर हजार माणूस होते.याखेरीज किल्ल्याचे एक हजारे असे दोन हजारे लोक होते.त्यात निवड करून मुरारबाजी याने सातशे माणूस घेऊन ते गडाखाली दिलेरखानावरी आले.दिलेरखान तालेदार जोरावर पठान पाच हजार याखेरीज बैईल वगैरे लोक ऐशी गडास चौतरफा चढत होती.त्यात होऊन सरमिसळ जाहले.मोठे धूरंधर युद्ध जहले.मावळे लोकांनी व खासां मुरारबाजी यानी निदान करून भांडण केले.पाचशे पठाण लष्कर ठार जाहले.तसेच बहिले मारले.'

मुरारबाजी देशपांडेचे हे शौर्य पाहून दिलेरखान बोलिला,'अरे तू कौल घे.मोठा मर्दाना शिपाई तुज नावाजितो.'ऐसे बोलीता मुरारबाजी बोलिला, 'तुझा कौल म्हणजे काय? मी शिवाजी महाराजांचा शिपाई तुझा कौल घेतो की काय?'म्हणोनि नीट खानावरी चालिला.खानावरी तलवारीचा वार करावा तो खानने आपले तीन तीर मारुन पुरा केला.तो पडला,मग खानाने तोंडात आंगोळी घातली,'असा शिपाई खुदाने पैदा केला.'

मिर्झाराजे जयसिंगच्या रूपाने स्वराज्यावर आलेले मोघलांचे आक्रमण, परतावण्यासाठी छत्रपती शिवरायांनी ११ जून १६६५ रोजी मिर्झाराजे जयसिंग बरोबर इतिहास प्रसिद्ध 'पुरंदरचा तह'केला.या तहान्वये तेवीस किल्ले मोघलांना द्यावे लागले.तह करून छत्रपतींनी स्वराज्यावरील संकट परतवून लावल्यामुळे तह करून सुध्दा राजे जिंकले.

पुरंदरावरील मुरारबाजीचे शिल्प

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग २०१


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २०१

।। रयतेचा राजा शिवछत्रपती ।।
भाग ६
सांभार :www.marathidesha.com

मुघलांशी संघर्ष

इ.स.१६६३ साली मुघल साम्राज्याचा नर्मदा नदी पलीकडे विस्तार करण्यासाठी त्याचबरोबर छत्रपती शिवरायांच्या राज्यविस्ताराला वेसण घालण्यासाठी औरंगझेबाने त्याचा मामा शाहिस्तेखान याला दख्खनच्या मोहिमेवर पाठविले.हजारो सैन्य,प्रचंड मोठा लवाजमा सोबत घेऊन शाहिस्तेखान दख्खनला निघाला.दख्खनला जात असताना मध्ये वाटेत लागणार्‍या प्रत्येक गावा-गावात त्याने दहशत पसरवीत मोठा विध्वंस केला.पुण्याजवळील चाकणचा किल्ला जिंकून पुण्यातील छत्रपती शिवरायांच्या लाल महालात खानाने तळ ठोकला.

खानाचे सैन्य रोजच आजूबाजूच्या गावा-गावामध्ये जाऊन लुटालूट करत.खानाच्या रूपाने एक मोठे संकट स्वराज्यावर चालून आले होते.खानाला धडा शिकविणे गरजेचे होते.समोरासमोरच्या युध्दात मराठ्यांचा टिकाव लागणे शक्य नव्हते,अशा वेळी छत्रपतींनी लालमहालावर हल्ला करून खानाला धडा शिकविण्याचे ठरविले.राजांना लाल महाल नवा नव्हता,त्यांचे लहानपण लालमहालातच गेले होते त्यामुळे लालमहालातील कोपरा न कोपरा त्यांना माहीत होता.

लालमहालाभोवती खानाच्या शेकडो सैनिकांचा बंदोबस्त होता.अशावेळी अंधार्‍या रात्री लग्नाच्या वरातीचा आधार घेऊन राजे व काही निवडक मावळे वेशभूषा बदलून महालात घुसले .लालमहालात मराठ्यांनी कत्तल आरंभिली सगळीकडे गोंधळ चालू झाला,छत्रपती खानाच्या शामियानात शिरले .ऱाज्यांना प्रत्यक्ष समोर पाहून खानाची पाचावर धारण बसली,जीव वाचविण्यासाठी खानाने खिडकीतून उडी मारली,छत्रपतींचा चपळाईने केलेला वार हुकल्यामुळे खानाची तीन बोटे तुटली गेली.खान बचावला गेला पण शिवरायांची दशहत मनात बसल्यामुळे तो मराठी मुलूख सोडून गेला.या प्रकरणामुळे मुघलांची बेइज्जत झाली तर शिवरायांचे नाव हिंदूस्थानभर झाले.
हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध