Total Pageviews

Saturday, 14 March 2020

स्वराज्याचे पांडव भाग २ रामचंद्र नीलकंठ बावडेकर (अमात्य)

स्वराज्याचे पांडव

 भाग २

 रामचंद्र नीलकंठ बावडेकर (अमात्य)

राजाराम महाराजांच्या कारकिर्दीच्या सुरवातीला महाराष्ट्रातील बराचसा प्रदेश आणि किल्ले मोगलांच्या हाती पडले. ह्या कठीण समयी मोगलांच्या विरुद्ध महाराष्ट्रातल्या लढ्याचे नियोजन व नेतृत्व केले ते रामचंद्र पंत बावडेकर (अमात्य) ह्यांनी. रामचंद्र पंतांनी शिवाजी महाराजांच्या काळापासून ते थेट महाराणी ताराबाईंच्या वेळेपर्यंत स्वराज्याची अविरत सेवा केली. राजाराम महाराजांनी जिंजीला जायच्या आधी त्यांना हुकूमतपनाह (सर्वोच्च अधिकार असेलेली व्यक्ती) हा खिताब बहाल केला - ह्या गोष्टी वरूनच त्यांच्या क्षमतेची आणि कर्तृत्वाची कल्पना येते. मोगलांविरुद्धची मोहीम त्यांनी आपल्या विशाळगडाच्या तळावरून यशस्वीपणे चालू ठेवली होती. पहिल्याच मोहिमेत त्यांनी शृंगारपूर , संगमेश्वर आणि पाटण व कराड च्या आसपासचा अतिशय दुर्गम आणि डोंगराळ प्रदेश परत जिंकून घेतला. ह्यामुळे आता मराठा फौजेला कठीण समयी गरज पडल्यास एक सुरक्षित आश्रयस्थान मिळाले. राजाराम महाराजांच्या संपूर्ण कारकिर्दीच्या कालावधीत रामचंद्र पंतांनी मोगलांविरुद्ध शह आणि काटशह चालू ठेवले होते - ज्यामुळे पूर्ण महाराष्ट्र कधीच औरंगजेबाच्या हाती पडला नाही.

रामचंद्र पंतांकडे माणूस निरखून त्याला योग्य पद्धतीने हाताळण्याची कला होती. एखाद्या व्यक्तीतले कौशल्यगुण हेरून त्यांचा पुरेपूर उपयोग कसा करायचा हे त्यांना चांगलच अवगत होतं. आधी उल्लेख केलेल्या चौघांनी त्यांच्या नेतृत्वाखाली जागरूकपणे लढा चालू ठेवला. अतिशय खडतर काळात रामचंद्रपंतांनी उपलब्ध मनुष्यबळ व साधनांचा अतिशय प्रभावी उपयोग केला. शंकराजी आणि परशुराम त्रिंबक ह्यांनी मुख्यत्वे मोगलांनी महाराष्ट्रात घेतलेले किल्ले व प्रदेश परत जिंकून घेण्याचे काम केले. संताजी व धनाजी ह्यांनी सुरुवातीला महाराष्ट्रात वायुगतीने आणि विजेच्या चपळाईनी मोघल फौजे वर असंख्य हल्ले करून त्यांना परेशान करून सोडलं. नंतर रामचंद्रपंतांनी स्वराज्यच्या ह्या २ रत्नांना महाराष्ट्रा बरोबरच कर्नाटक व दक्षिण भारतात मोगलांवर हल्ले करण्याची जबाबदारी दिली होती. संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर नेतृत्वहीन मराठा फौजेला एकजूट बांधून ठेवण्यात रामचंद्र पंतांचा मोठा हातभार होता. स्वराज्याच्या बंद पडलेल्या करवसुलीच्या व्यवस्थेला पुनरुज्जीवन दिल्यामुळे स्वराज्याची महाराष्ट्रात पूर्ण विस्कटलेली घडी पुन्हा थोडी सावरली गेली. मोगलांना फितूर होणाऱ्यांच्या कुटुंबाला रामचंद्र पंत अटकेत ठेवायला लागले - ह्यामुळे फंद-फितुरीला बऱ्याच प्रमाणात आळा बसला. स्वराज्यसाठीचा हा लढा आणि प्रशासकीय कामातला हातभार रामचंद्र पंतांनी महाराणी ताराबाईंच्या कालावधीत हि असाच अखंड चालू ठेवला.

1 comment:

  1. खूप छान माहिती दिली आहे आपण

    ReplyDelete