Total Pageviews

Monday, 9 October 2023

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४६१

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४६१
मराठेशाहीला साम्राज्यवादाची चव दाखवणारा हा पहिलाच सेनापती.
श्रीमंत बाजीराव पेशवे
भाग १४
पालखेडची मोहीम म्हणजे बाजीरावाच्या कारकिर्दीतील व आयुष्यातील एक महत्त्वाची घटना आहे. या स्वारीनंतर त्याचा आपल्या लष्करी नेतृत्वक्षमतेवरील विश्वास वाढीस लागला आणि या मोहिमेनंतर त्याने मागे वळून कधी पाहिले नाही. हे जरी खरे असले तरी पालखेडच्या विजयाचे सर्व श्रेय एकट्या बाजीरावास देणे अयोग्य ठरेल. त्याला चिमाजी आपाची जशी बहुमुल्य साथ लाभली. त्याचप्रमाणे शिंदे, होळकर, जाधव, पवार इ. सरदारांनीही बरीच मदत घेतली. याबाबतीत पिलाजी जाधव, मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे हे बाजीरावाचे गुरुचं समजले पाहिजेत. या सर्व अनुभवी योद्ध्यांमुळेचं २७ - २८ वर्षीय बाजीरावास हे यश प्राप्त झाले.
पालखेड येथे बाजीरावाने निजामाला शरण येण्यास भाग पाडले, त्याचवर्षी होळकर, उदाजी पवार, कंठाजी कदम बांडे इ. च्या साथीने चिमाजी आपाने दयाबहादूर व गिरिधर बहादूर या दोन बलवान मोगल सुभेदारांना युद्धात ठार करून माळवा प्रांत एकदाचा ताब्यात घेतला. चिमाजीच्या विजयाची बातमी मिळतांच स्वतः बाजीराव बुंदेलखंडात छत्रसाल राजाच्या मदतीस धावून गेला. महंमदखान बंगशच्या विरोधात बुंदेलखंडचा राजा छत्रसाल याने बाजीरावाची मदत मागितली होती. त्यावेळी चिमाजी माळव्याच्या प्रकरणात अडकल्याने बाजीरावास तातडीने बुंदेलखंडात जाता आले नाही. परंतु दया बहादूर व गिरिधर बहादूरचा बंदोबस्त होताच बाजीरावाने बुंदेलखंड प्रकरण हाती घेतले. यावेळी चिमाजी उज्जैनला वेढा घालून बसला होता व त्याची बातमी महंमदखान बंगशला होती. पण देवगडावरून गढामंडळमार्गे बाजीराव येत असल्याची कल्पना बंगशला नव्हती. परिणामी जैतपुरावर महंमदखान बंगश मराठी व बुंदेल्यांच्या फौजांच्या चिमट्यात कोंडला गेला. त्याने दिल्लीहून कुमक मागवली. मुलगा काईमखान यांस तातडीने मदतीस बोलावले. बापाच्या मदतीला मुलगा धावला खरा पण जैतपूरच्या अलीकडे सुपे येथे मराठी सैन्याने गाठून लुटून घेतले. केवळ १०० स्वारांनिशी काईमखान जीव घेऊन पळत सुटला. सुटकेचे सर्व मार्ग बंद झाल्याचे पाहून स. १७२९ च्या मे महिन्यात बंगश शरण आला. पावसाळा तोंडावर आल्याने बाजीरावास परत फिरणे भाग होते. तेव्हा त्यानेही फारसे ताणून न धरता बंगशला सोडून दिले. छत्रसालने बाजीरावास या मदतीच्या बदल्यात पाच लाखांची जहागीर नेमून दिली. या जहागिरीच्या मोबदल्यात मोगलांच्या आक्रमणापासून छत्रसालच्या राज्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी बाजीरावाने उचलली. अशा प्रकारे माळवा - बुंदेलखंडातील विजय संपादून चिमाजी - बाजीराव पुण्यास परतले.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४६०


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४६०
मराठेशाहीला साम्राज्यवादाची चव दाखवणारा हा पहिलाच सेनापती.
श्रीमंत बाजीराव पेशवे
भाग १३
माळव्याप्रमाणे कर्नाटकातही बाजीरावाने हात - पाय मारून पाहिले. स. १७२५ - २६ व स. १७२६ - २७ अशा लागोपाठ दोन मोहिमा त्याने शाहूच्या आज्ञेने दक्षिणेत काढल्या. परंतु, स्वतंत्र वृत्तीने काम करण्याची सवय असलेल्या बाजीरावास ' बारभाई ' पद्धतीचा कारभार पसंत नव्हता. कर्नाटक मोहिमेत प्रतिनिधी व सेनापती हि बडी धेंडं त्याच्या सोबत असून त्यांचा दर्जा बाजीरावाच्या बरोबरीचा असल्याने त्यांच्यावर बाजीरावाची हुकुमत नव्हती. सबब, या स्वाऱ्या निष्फळ ठरल्या.
परंतु, बाजीरावाच्या भाग्योदयाची वेळ आता नजीक आली होती. बाजीराव कर्नाटक स्वारीत गुंतलेला असताना स. १७२७ मध्ये निजाम - संभाजी यांनी एकत्रितपणे शाहूवर स्वारी केल्याने शाहूने बाजीरावासह आपल्या सर्व प्रमुख सरदारांना कर्नाटक मोहिमेतून मागे बोलावले. आपले लष्करी नेतृत्व व सामर्थ्य आजमवण्याची हि एक संधी चालून आली असून या संधीचे कोणत्याही परिस्थितीत सोनं केलचं पाहिजे या ईर्ष्येने बाजीरावाने निजामावरील मोहीम हाती घेतली. याकामी त्याला आपल्या भावाची - चिमाजीआपाची - बहुमोल मदत झाली. आपल्या सैन्याचे दोन भाग करून चिमाजीवर त्याने नाशिक ते सातारा - मिरजपर्यंतच्या प्रदेशचे रक्षण करण्याची जबाबदारी सोपवली व स्वतः बाजीराव आपल्या वेगवान घोडदळासह निजामाच्या प्रदेशांत शिरला. बाजीरावाचे युद्धविषयक धोरण स्पष्ट होते. आपल्याकडे तोफखाना नाही तर निजामाचा तोफखाना जय्यत तयारीत आहे. अशा स्थितीत निजामासोबत लढाई करायची तर त्याच्या तोफखान्याचा सामना करणे टाळले पाहिजे. याची पक्की खूणगाठ बाजीरावाने मनाशी बांधली. त्यानुसार निजामाच्या प्रदेशांत जाळपोळ, लुटालूट करीत बाजीराव गुजरातकडे निघून गेला. पाठोपाठ त्याचा संहार करण्यासाठी निजामही चवताळून त्याच्यामागे धावला. बाजीरावाचा पाठलाग करताना जड तोफांचा अडथळा होतो म्हणून बव्हंशी तोफखाना मागे ठेऊन निवडक तोफांसह तो बाजीरावाच्या पाठीवर जाऊ लागला. अखेर पालखेडजवळ निजामाला त्याच्या मुख्य तोफखान्यापासून वेगळे करण्यात बाजीरावास यश मिळाले व त्याचा त्याने पुरेपूर फायदा उचलला. निजामाच्या फौजेभोवती त्याने आपल्या धावत्या तुकड्यांच्या चौक्या नेमल्या. पालखेडनजीक निजामाचा मुक्काम पडला तेव्हा याच धावत्या तुकड्यांनी निजामाची रसद पूर्णतः तोडून टाकली. त्यामुळे घाबरून जाउन निजाम तहास राजी झाला. तेव्हा ६ मार्च १७२८ रोजी मुंगी शेवगांव येथे उभयतांमध्ये तह घडून आला. या तहानुसार दक्षिणच्या सहा सुभ्यांतून चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याच्या शाहूच्या हक्कांना निजामाने मान्यता दिली.

 

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४५९

 



हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४५९
मराठेशाहीला साम्राज्यवादाची चव दाखवणारा हा पहिलाच सेनापती.
श्रीमंत बाजीराव पेशवे
भाग १२
बाजीरावाच्या कारकिर्दीचे सामान्यतः दोन भाग पडतात. स. १७२० ते २७ व स. १७२८ ते ४०. पैकी पहिल्या सात - आठ वर्षांचा काळ हा तसा चाचपडण्यातचं गेला. स. १७१९ मध्ये प्राप्त झालेल्या स्वराज्याच्या सनदांच्या आधारे प्रांतात आपला अंमल बसवण्याचे कार्य स. १७२० ते २७ पर्यंत बाजीरावाने केले. त्याशिवाय माळव्याच्या स्वारीचा पाया देखील त्याच सनदांनी घातलेला असल्याने अधूनमधून त्याने माळव्याकडेही काही फेऱ्या मारल्या. परंतु, आरंभी तरी त्यास म्हणावे तसे यश काही लाभले नाही. माळव्यात शिरण्यास त्यास मोठा अडथळा मल्हारराव होळकराचा झाला.
बढवाणीचा संस्थानिक पेशव्याला अनुकूल नसल्याने त्याचा बंदोबस्त केल्याखेरीज बाजीरावास पुढे जाता येईना व बढवाणीच्या बचावासाठी मल्हारराव होळकर उभा होते . वास्तविक, मल्हारराव हे तसे एकांडा शिलेदार असून स्वतंत्र वृत्तीने मोहिम करणारा सरदार होते . बाळाजी विश्वनाथच्या दिल्ली स्वारीत देखील तो सहभागी असून त्या मोहिमेच्या दरम्यान बाजीरावाशी त्याचा खटका उडून त्याने पेशव्याच्या मुलाला ढेकळं फेकून मारली होती. अशा या बाणेदार गृहस्थासोबत तंटा वाढवण्यापेक्षा त्यास आपल्या लगामी लावून माळव्याचे कार्य त्याच्याचं मार्फत उरकून घेण्याचे बाजीरावाने ठरवले व त्याने होळकराशी समेट केला. ( स. १७२१ ) यानंतर बाजीरावाच्या प्रत्येक स्वारीत होळकर सहभागी होऊ लागले . माळव्यावर अल्पावधीत ताबा बसवणे, होळकरामुळेच पेशव्यांना शक्य झाले असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४५८

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४५८
मराठेशाहीला साम्राज्यवादाची चव दाखवणारा हा पहिलाच सेनापती.
श्रीमंत बाजीराव पेशवे
भाग ११
छ. शिवाजी महाराजांना स्वराज्य संस्थापक म्हटले जाते तर या स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर करण्याचे श्रेय विसाजीपंतास (बाजीराव ) दिले जाते. कोकणस्थ चित्पावन ब्राम्हण जातीतील भट घराण्यात १८ ऑगस्ट १७०० रोजी जन्मलेल्या विसाजी उर्फ बाजीरावाने आपल्या उण्यापुऱ्या ३९ - ४० वर्षांच्या हयातीमधील १८ - २० वर्षांच्या कारकिर्दीत जी काही कर्तबगारी दाखवली, त्यामुळे भट घराणे विख्यात होऊन सातारकर छत्रपतींची पेशवाई कायमस्वरूपी त्या घराण्यास मिळाली. बाजीरावाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे पेशवा म्हणून कार्यरत असताना देखील त्याची वृत्ती ' विसाजीपंताची ' न राहता ' बाजीराव ' थाटाची राहिली.
ता. २ एप्रिल १७२० रोजी बाळाजी विश्वनाथाचे निधन झाल्याने रिक्त झालेले पेशवेपद छ. शाहूने बाळाजीच्या मोठ्या मुलास, बाजीरावास दिले. यावेळी बाजीराव केवळ १८ - १९ वर्षांचा असून त्याचा स्वभाव देखील वयाला साजेसा असा उद्दाम आणि बंडखोर प्रवृत्तीचा होता. लहानपणापासून बापासोबत स्वाऱ्या - शिकाऱ्यांमध्ये सहभाग घेतल्याने त्याचा कल फडावरील बैठ्या राजकारणापेक्षा शिपाईगिरीकडे अधिक होता. पुढे जसजसे वय आणि अनुभव वाढत गेले तसतसे त्याचे उद्दाम वर्तन मावळत गेले. लहानपणापासून लष्करी मोहिमांमध्ये व विविध राजकीय घडामोडींमध्ये सहभाग घेतल्याने बाजीरावाची आपल्या बापापेक्षाही वेगळी अशी विशिष्ट विचारसरणी बनली होती. त्याच्या वंशजांनी आपल्या पराक्रमी पूर्वजाची विचारपरंपरा जशीच्या तशी न स्वीकारता आपापल्या स्वभाव मर्यादांनुसार त्यावर संस्कार करून राबवण्याचा प्रयत्न केला. परिणामी ज्या वेगाने मराठी राज्य साम्राज्यावस्थेपर्यंत पोहोचले त्याच वेगाने त्याचा ऱ्हास घडून आला.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४५७

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४५७
मराठेशाहीला साम्राज्यवादाची चव दाखवणारा हा पहिलाच सेनापती.
श्रीमंत बाजीराव पेशवे
भाग १०
बाजीरावाच्या आयुष्यातील ठळक घटना.
१७०० ऑगस्ट १८ - (भाद्र. शु. १५) बाजीरावाचा जन्म.
१७१८ जुलै १ - बाळाजी विश्वनाथाबरोबर दिल्लीस निघाला.
१७१९ फेब्रु २८ - दिल्लीस मुक्काम.
१७२० मार्च २० - कोल्हापूर युद्ध.
एप्रिल २ - बाळाजी विश्वनाथ यांचा मृत्यू.
एप्रिल १७ - मसूर येथे बाजीरावास पेशवे पदाची वस्त्रे मिळाली.
१७२१ जानेवारी ४ - चिखलठाण येथे निजामाची भेट.
मार्च ७ - सुरतेवर स्वारी.
१७२२ डिसेंबर ५ - ऐवजखानाची भेट.
१७२३ फेब्रु. १३ - बदकशा येथे निजाम भेट.
मार्च - भोपाळच्या दोस्त महमदाचा पराभव. त्याचा हत्ती घेतला.
१७२४ मार्च १४ - लांबकानीचे युद्ध.
१७२४ ऑक्टोबर - साखरखेडल्याचे युद्ध.
१७२८ फेब्रु. २५ - पालखेडच्या युद्धात निजामाचा पराभव.
मार्च ३१ - स्वारीहून परत.
१७२९ मार्च १३ - धामोरा येथे छत्रसालाची भेट.
एप्रिल - बंगषाला वेढा आणि पराभव.
एप्रिल २८ - सुपे (बुंदेलखंड येथे कायमखानाचे लष्कर लुटले.
१७३१ एप्रिल १ - डभई (गुजरात) त्रिंबकराव दाभाडय़ास मारले.
एप्रिल - बाजीरावाच्या सैन्याशी निजामाची चकमक.
१७३२ फेब्रु. १२ - सेखोजी आंग्रे भेट.
१७३३ एप्रिल ६ - जंजिऱ्यावर स्वारी.
मे २५ - मंडणगड किल्ला घेतला.
१७३४ मे - खानदेशकडील स्वारी.
१७३५ फेब्रु ४ - मानाजी आंग्रे यांच्या मदतीसाठी कुलाब्यास प्रयाण.
जुलै ६ - मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे राजपुतान्यात विजयी होऊन पुण्यास आले तेव्हा बाजीराव घोरपडीपावेतो सामोरा गेला.
१७३६ फेब्रु ४ - उदेपूर येथील जलमंदिरास भेट.
फेब्रु. १५ - किशनगड नजीक सवाई जयसिंगाची भेट.
१७३७ मार्च २९ - दिल्लीचा पुरा जाळला.
१७३८ जाने. - भोपाळचे युद्ध व तह.
१७३९ फेब्रु. ११ - नादिरशहाच्या वर्तमानावरून पुण्याहून उत्तरेकडे स्वारी.
मे २२ - जेनाबाद येथे नादिरशहा परतल्याची बातमी कळली.
सप्टें. ३ - चिमाजी वसई घेऊन पुण्यास आला तेव्हा बाजीराव औंधापावेतो सामोरा गेला.
नोव्हें. १ - नासिरजंगाच्या स्वारीस प्रयाण.
१७४० मार्च ३ - नासिरजंगाची भेट व तह.
मार्च ७ - उत्तरेकडे प्रयाण.
एप्रिल ५ - रावेर प्रांत खरगोण येथे मुक्काम.
एप्रिल २८ - मृत्यू.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४५६

 
















हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४५६
मराठेशाहीला साम्राज्यवादाची चव दाखवणारा हा पहिलाच सेनापती.
श्रीमंत बाजीराव पेशवे
भाग
रावेरखेडीस जायचं कसं?
रावेरखेडी येथील बाजीराव समाधीस्थळी जायचं असल्यास विविध मार्ग आहे. खांडवा-इंदौर या रेल्वे मार्गावर सनावद नावाचे रेल्वेस्टेशन आहे. येथे उतरल्यावर वाहन घेऊन खरगोण मार्गावर बेडिया नावाचे गाव लागते. बेडिया येथून भोगावाँ येथे उजव्या हाताने जावे. तेथून उजव्या हाताला एक कच्चा रस्ता रावेरखेडीला जातो. रावेरखेडी गावाच्या पुढे नदीतटावर बाजीराव समाधीस्थळ आहे.
जर स्वत:च्या वाहनाने महाराष्ट्रातून जायचे असल्यास धुळ्याहून इंदौरकडे जाऊन सैंधवाच्या पुढे जुलवानियाँनंतर उजवीकडे जाणारा खरगोण रस्ता पकडता येतो. खरगोणच्या पुढे सनावद मार्गावर बेडिया येते.
हा रस्ता थोडा लांबचा वाटल्यास धुळ्याहून भुसावळ रस्ता पकडावा. हा रस्ता मोठा आहे. भुसावळच्या आधी डावीकडे रावेरसाठी (महाराष्ट्रातील) रस्ता जातो. रावेर, बऱ्हाणपूर ते सनावद सरळ मोठा रस्ता आहे.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ४५५

 


हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ४५५
मराठेशाहीला साम्राज्यवादाची चव दाखवणारा हा पहिलाच सेनापती.
श्रीमंत बाजीराव पेशवे
भाग
बाजीरावकालीन दौडीचा वेग
बाजीरावाचे प्रमुख बलस्थान होते त्याचे घोडदळ. त्या काळात मुघल सैन्य दिवसाला ५ ते ६ मैल या वेगाने प्रवास करत असत. मात्र बाजीरावाने आपल्या घोडदळाचा वेग विक्रमी ठेवला होता.
चिमाजी आप्पा १७३३ मध्ये ग्वाल्हेरच्या स्वारीहून परत आला तेव्हा बुंदेलखंडातील राजगडापासून पुण्यापर्यंतचे मुक्काम, रोज किती कोस चालत याच्या आकडय़ासह पेशवे दप्तरात पृ. १२२५-६ वर दिलेले आहेत. त्यावरून (कोस म्हणजे २ मैल धरून) राजगड (सिप्री नजीक) पासून बऱ्हाणपुरापर्यंत ३३४ मैलांचा प्रवास चिमाजीच्या सैन्याने २४ दिवसांत केला. याचा अर्थ एक दिवसांत सरासरी १४ मैलांची मजर हे सैन्य मारत असे. पुढे बऱ्हाणपुरापासून पुण्यापर्यंतचा ३०६ मैलांचा प्रवास त्याच सैन्याने २१ दिवसात केला. म्हणजे सरासरी दिवसास १५ मैल हे मान पडते. या ४५ दिवसात कमीतकमी प्रवास एखाद्या दिवशी ४ मैल तर एखाद्या दिवशी जास्तीत जास्त २० मैल असा केलेला आढळतो.
बाजीरावाचे वडील बाळाजी विश्वनाथ यांच्या सैन्याने ११ मैलाने प्रवास केल्याची नोंद आहे. मात्र १७३८मध्ये बाजीरावाने आगऱ्यापासून दिल्लीपर्यंतचा १२५ मैलांचा प्रवास शत्रूस चाहूल लागू न देता आडवाटेने अवघ्या १० दिवसात केला होता. म्हणजे दिवसाला १२ मैलाहूनही अधिक वेगाने. मात्र दिल्लीहून जयपुरापर्यंत शत्रूच्या तावडीतून निसटण्यासाठी तो झपाटय़ाने प्रवास करत होता. तेव्हा १८० मैल ८ दिवसात म्हणजे दिवसाला २५ मैल हा बाजीरावाचा वेग होता. तो त्या काळातला जास्तीत जास्त होता.
आणिक कोन्ही दिसत नाही. - जयसिंगाचा वकिल दीपसिंगाचा अभिप्राय
मग.. (नवाब निजाम-उल-मुल्क) घडी घडी पुसो लागले की सातारा महाराजापासी मातबर, मनसुबेबाज, राजा ज्यास मानीतो यैसा तुमचे नजरेस कोण आला?
त्यांनी (दीपसिंगांनी) जाब दिल्हा की महाराजा जैसिंगजींनी (जयपूरपाले) मजला याच कामाबद्दल बहुतकरून पाठविले जे, बाजीराअु पंडीत प्रधान याचे नाव मुलकात मरदुमीचे फार आहे. परंतु गिरंदारी व मुतसतगिरी व मान आदर राज्यांत व बोलोन चालोन पोख्त कारबारी मनास आणून येणें म्हणोन पाठविले होते, ते आपण मनास आणिले.
मग नबाब पुसो लागले की कोन्हास तुम्ही मातबर व पोख्तकार व साहेबतरतुद व राजामेहेरबान गिरंदार कोन्हांस वलखिले?
दीपसिंगजींनी अुत्तर दिल्हे जे सिवाये बाजीराअूजी आणिक कोन्ही सत्यवचनी अगर प्रामाणिक अगर पोख्तकारी अगर चलनसाहेबफौज दुसरा दिसत नाही.
- पेशवे दप्तर, भाग १० ले. ६६.