Total Pageviews

Wednesday, 17 October 2018

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १२७

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १२७
शूरवीर मराठा सरदार दमाजी गायकवाड
भाग ७
वास्तविक सर्व काठेवाडावर गायकवाडाचा हक्क होता. रावजी मेल्यानंतर दिवाणपदाच्या बाबतींत त्याचा भाऊ बाबाजी व पुत्र सीताराम यांत भांडणतंटे सुरू झाले. (इ. स. १८०७). बाबजीस इंग्रजांची मदत होती. यानंतर आबा शेलूकरास सोडून देऊन मेजर वॉकर यानें काठेवाड आपल्या ताब्यांत घेण्यासाठीं तिकडे स्वारी केली. बाह्यतः काठेवाडांतील गायकवाडांच्या मांडलिक संस्थानिकांनीं त्यांना द्यावयाच्या खंडणीची सुव्यवस्था लावण्यासाठीं ही स्वारी आहे असें सांगण्यात आलें. त्याप्रमाणें झालवाड, मुचकुंद, हलर, बरडा, गोहिलवाड वगैरे संस्थानिकांच्या खंडणीची कायमची व्यवस्था त्यानें लाविली. यानंतर आनंदरावानें उखामंडळांतील बंडाळी मोडली. या सुमारास सीतारामानें इंग्रज व रावजी आप्पाजी यांच्या गुप्त तहाच्या आधारावर आपल्याला दिवाणगिरी मिळविण्याबद्दल खटपट केली; परंतु वॉकरनें तहाचें भाषांतर चुकले आहे असें कारण दाखवून सीतारामाचा दावा काढून टाकला. कान्होजी हा यावेळीं बडोद्यास आला, तेव्हां त्याला कांहीं नेमणूक ठरवून पाद्गा येथें ठेविलें (सन १८०८). त्याचप्रमाणें मुकंदराव (गोविंदरावाचा दासीपुत्र) व मुरारराव (गोविंदरावाचा औरस पुत्र) यांनांहि नेमणूका ठरवून दिल्या. वॉकरनें सन १८१८ तील आपल्या खलित्यांत स्पष्ट म्हटले होतें कीं, आपण कधीं कधीं गायकवाडांच्या खासगी गोष्टींतहि हात घातलेला होता. नवानगरच्या जामनें इंग्रजांविरूध्द राजकारण केल्यानें इंग्रजांनी गायकवाडाची मदत घेऊन त्याच्यावर स्वारी केली (सन १८१२) व पोरबंदर आणि उखामंडळ यांतील बंडाळीहि मोडली. या सुमारास सीताराम यास पगाराबद्दल फौजेनें अडविलें असतां ती रक्कम इंग्रजांनीं देऊन त्याची मुक्तता केली. आणि या उपकाराची फेड सीतारामानें आनंदराव व इंग्रज यांच्यांत झालेल्या पूर्वीच्या सर्व तहाचे अस्सल कागद इंग्रजांना परत देऊन केली. कान्होजीनें पुन्हां उचल केल्यावरून त्यास पकडून मद्रासेस पाठविलें. या वेळच्या रेसिडेंटच्या खलित्यावरून इंग्रजांचें गायकवाडाकडे असलेलें कर्ज फिटल्याचें समजतें; परंतु गायकवाडींतून इंग्रज अधिकारी काढून घेण्याचा प्रसंग आला तेव्हां त्यास रेसिडंटानें कंपनींस कळविलें कीं, सन १८१६ पर्यंत कर्ज फिटणार नाहीं. या वेळींच गंगाधरशास्त्री पटवर्धन हा दिवाण होता. त्याची या रेसिडेंटानें फार तारीफ केली आहे. पुढें पालनपूर, राघनपूर, ध्रांगध्रा, जुरिया येथील संस्थानिकांनी गायकवाडाशीं नवीन तह केले. यानंतर पेशवे व गायकवाड यांच्यांत तेढ आली. गुजराथच्या इजा-याचा करार संपल्यानें तो पुन्हां करून घेण्यास गंगाधरशास्त्री पुण्यास गेला. पेशवे व गायकवाड या प्रत्येकांनीं परस्परावर (१ कोटी) कर्ज काढलें. अहमदाबाद गायकवाडास पुन्हां देण्याची पेशव्यांची इच्छा नव्हती म्हणून प्रकरण चिघळत चाललें व शेवटी गंगाधरशास्त्री यांचा खून झाला. सीतारामाचें व शास्त्र्यांचें फार वांकडे होतें त्यामुळें कांहीं लोकांचे म्हणणें असें कीं, सीतारामाच्या पक्षाकडून शास्त्र्यांचा खून झाला असावा. यावेळीं सीतारामानें धार येथें सैन्याची जमवाजमवहि केली होती. पेशव्यांनां शास्त्र्याचा खून करण्यांत मुळींच फायदा नव्हता. कारण यामुळें गुजराथ हातची जाण्याचा संभव होता. उलट त्यास बक्षीस देऊन आपलासा करण्यांत फायदा होता असें कर्नल वॉलिस म्हणतो. सीतारामास लागलीच इंग्रज शिपायांच्या देखरेखीखालीं ठेवण्यांत आल्यावरून वरील म्हणण्यास पुष्टी मिळते. इंग्रजांचें कर्ज या सुमारास फिटल्यानें कंपनीनें आपाल संबंध कमी करण्याबद्दल कार्नाक यास कळविलें, पण तें त्यानें जुमानलें नाहीं. गंगाधरशास्त्र्याचा दाब फत्तेसिंगावर फार होता; आतां फत्तेसिंग स्वतंत्रपणें वागूं लागला व त्यास आपल्यावरील इंग्रजांची सत्ता खपेना. त्यानें पसंत केलला दिवाण न नेमतां कार्नाकनें आपण ठरवलेला प्रधान त्याच्यावर लादला, त्यामुळें फत्तेसिंगाचें मन फार खट्टू झालें. पुन्हां उखामंडळांत बंड उद्भवलें, तेव्हां गायकवाडास त्या प्रांतांत सतत शांतता ठेवतां येत नाहीं या सबबीवर इंग्रजांनीं (द्वारकेशिवाय सर्व) उखामंडळ स्वतः खालसा केलें. व काठेवाडांतील सर्व संस्थानिकांच्या खंडणीवसूलाच्या कामांहि त्यांनीं आपला अधिकार यापुढें गाजविण्यास प्रारंभ केला. पुन्हां (सन १८१७) गायकवाडाशी तह करून इंग्रजांनी त्यांच्याकडून तैनाती फौजेच्या वाढीबद्दल बराचसा मुलूख हस्तगत केला. याचवेळी गायकवाडी फौजेनें इंग्रजांस पेंढार्‍यांविरूध्द सैन्याची मदत केली. पुढें (सन १८१८) फत्तेसिंग व आनंदराव (सन १८१९) दोघेहि मरण पावले. नंतर सायजीराव वारस ठरून तो गादीवर बसला. फत्तेसिंग हा शेवटपर्यंत कारभारीच होता. सयाजी हुषार होता. यानें इंग्रजांकडे आपलें सैन्य, त्यांनी माळव्याच्या लढायांत वापरल्याबद्दल रकमेची मागणी केली. तेव्हां इंग्रजांनीं उत्तर केलें कीं तुमच्या सैन्यानें आम्ही देशांत शांतता राखली, यांत तुमचाच फायदा झाला असल्यानें मोबदला कसला मागता? उलट आपलें सैन्य आम्हापाशीं माळव्यांत ठेवावें, कारण तुम्हाला त्यावरील खर्च कोठेंहि करावाच लागणार. मध्यंतरी आनंदरावाच्या राणीनें व सयाजीच्या दोन सावत्र आयांनीं आपापल्या मुलांबद्दल खटपट चालविली होती. पेशव्यांनीं इंग्रजांकडे काठेवाडांतील जमाबंदीवसुली दिली होती. त्याचा फायदा घेऊन गायकवाडांचा तो हक्क इंग्रजांनीं एकीकडे ठेवला. एवढेंच नाहीं तर खास गायकवाडांची जी मांडलिक संस्थानें होतीं त्यांतहि त्यांनी ढवळाढवळ सुरू केली. राजपिंपळा संस्थानांत वारसाच्या तंट्याचा फायदा घेऊन इंग्रजांनीं तेथची सारी व्यवस्था आपल्या तांब्यांत घेतली व फक्त दरसालची खंडणी गायकवाडांनीं घ्यावी असें ठरविलें. तसेंच गायकवाडास या संस्थानांच्या बाबतींत कठीण प्रसंगीं मदत न देतां इंग्रजांनीं आपला मात्र फायदा साधून घेण्याचा क्रम आरंभिला. पुढें एलफिन्स्टनची व सयाजीची जी भेट झाली (१८२०-२१) त्यावेळीं त्यानें सयाजीस (१) कर्जफेड करणें, (२) इंग्रजांशीं खुला व्यापार व व्यवहार ठेवणें; आणि (३) परराष्ट्रांशीं इंग्रजांच्या संमत्तीशिवाय व्यवहार न करणें, या तीन अटी सांगितल्या व या पाळल्यास गायकवाडींतील अंतर्गत कारभारांत आपण हात घालणार नाहीं असें सांगितलें. सयाजीनें हें सर्व कबूल केलें. दौलतीस यावेळीं जवळ जवळ एक कोटींचे कर्ज होतें. या सुमारास सीतारामानें पुन्हां दिवाणगिरीची खटपट इंग्रजांजवळ चालविली. परंतु ती त्यांनीं फेंटाळून लाविली. महिकांठ्यामधील गायकवाडाची जमाबंदी वसूल करण्याचें काम इंग्रजांनीं काठेवाडाप्रमाणेंच सयाजीची पर्वा न करतां आपल्या हातीं घेतलें. एवढेंच नव्हें तर महिकांठ्यांमध्यें असलेलें गायकवाडी सैन्य काढून टाकण्याचा तगादा त्यांनीं त्याच्या मागें लावला. काठेवाडालगत व महिकांठ्यांशेजारी आपली हद्द असल्यानें व तुमच्या प्रांतांत नेहमीं बंडें उत्पन्न होतात त्यामुळें ही व्यवस्था करणें आम्हास भाग आहे असें इंग्रज म्हणत. या वेळीं फत्तेसिंगाच्या बायकोनें आपल्या दत्तक पुत्राबद्दल खटपट चालविली, परंतु ती इंग्रजांनीं हाणून पाडिली. या सुमारास बडोद्याच्या रेसिडेंटास जो वरीष्ठ सरकाराचा हुकूम आला होता त्यांत सयाजीवर नजर ठेवावी व त्यानें दिलेल्या सर्व वचनांवर लक्ष्य ठेवावें, मात्र आपलें वर्चस्व उघडपणें दाखवूं नये असा मजकूर होता. पुढें (१८२१) एलफिन्स्टननें गायकवाडावर पुन्हां वीस लाखांचें कर्ज काढलें. खंबायतच्या नबाबानें वार्षिक पंचवीस हजारांची खंडणी द्यावी असें गायकवाड म्हणत व तो नाकारीत असे; शेवटीं इंग्रजांनीं मध्यस्थी करून ही रक्कम साडेचार हजार ठरविली. पुढें सायाजीरावाचें व बडोद्याच्या रेसिडेंटाचें भांडण झाले. दौलतीला जें कर्ज होतें त्या कर्जाबद्दल सावकारांनां इंग्रज हे जिम्मेदार राहिले होते. कर्ज फिटेना म्हणून रेसिडेंटानें तें सयाजीरावानें आपल्या खानगींतून द्यावें अगर सावकारांनां राज्यांतील महाल सात वर्षांच्या मक्त्यानें कर्जफेडीस लावून द्यावे असें ठरविलें. याबद्दल सयाजीनें थेट वरपर्यंत भांडण नेलें, परंतु त्याचा कांही उपयोग झाला नाहीं. उलट ही व्यवस्था अंमलांत न आणल्यास आम्हाला सर्व राज्याचा वसूल करण्याचें काम जबरदस्तीनें हातांत घ्यावें लागेल असा एलफिन्स्टननें सयाजीस दम भरला. पुढें इंग्रजांनीच नऊ महाल (पांच वर्षांपुरतें) आपल्या ताब्यांत घेऊन ही कर्जाची खटपट वारली (१८२८). ह्याशिवाय (१८२९ त) तैनाती फौजेच्या खर्चाकरितां आणखीहि कांही महाल इंग्रजांनीं आपल्या ताब्यांत घेतले. इंग्रजांचें व सयाजीरावांचें जास्त फाटत चालल्यानें खुद्द बडोद्यास सयाजीराव यांनां पदच्युत करून त्याचा मुलगा गणपतराव यास गादीवर बसविण्याचा एक कट झाला (१८३१) होता. परंतु तो उघडकीस येऊन त्याचा बीमोड करण्यांत आला. याच सुमारास मालकम हा जाऊन त्याच्या जागेवर लॉर्ड क्लेअर हा गव्हर्नर होऊन आला व त्यानें पूर्वीचें धोरण सोडून नवें सलोख्याचें धोरण स्वीकारलें. त्यावर लागलीच सयाजीरावानेंहि तडजोड करून व आपल्या खानगींतून २५ लाखांची भरती घालून कर्जदारांची फेड केली. त्यामुळें क्लेअर यानें नऊ परगणे (जे पूर्वी कर्जफेडीकरितां तारण घेतले होते) गायकवाडास परत दिले (१८३२ एप्रील). पोलिटिकल कमीशनर याच्या मनांत पांच वर्षांची मुदत भरली तरीहि ते परगणे आणीच पांच वर्षे ठेवण्याची इच्छा होतीच; पण क्लेअरनें तें ऐकलें नाहीं. तैनाती फौजेच्या खर्चाबद्दल सयाजीरावांनीं दहा लाख रू. इंग्रजांच्या स्वाधीन अगाऊच करून ठेवले (१८३३) होते. या वेळीं पुन्हां इंग्रज व सयाजीराव यांच्यांत खटके उडावयास लागले. वल्लभदास नांवाच्या अफुविक्याचा पक्ष घेऊन मुंबईचा गव्हर्नर ग्रांट यानें सयाजीरावांनां कांही जबरीच्या मागण्या केल्या होत्या. इंग्रजांच्या जिम्मेदारी माणसांनां त्रास दिल्याच्या आरोपावरून गायकवाडाच्या अंतर्गत कारभारांत ग्रांट हा वाटेल तसा हात घालूं लागला व सयाजीरावासहि नाइलाजानें त्याचें म्हणणें ऐकावें लागलें. पुढें कार्नाक हा गव्हर्नर झाला. त्यानें हिंदुस्थान सरकारच्या संमतीनें सयाजीरावांना कळविलें कीं, तुम्ही आमच्या हक्कांस व मागण्यास नाकबूल झाल्यास तुम्हांस पदच्युत करून तुमच्या मुलास गादीवर बसवूं. असें सांगूनहि इंग्रजांनीं गायकवाडाचा पेटलाद प्रांत आपल्या कबजांत घेतला (१८३८). आणि तैनाती फौजेपैकीं गुजराथ घोडदळ (सयाजीराव यांस शिक्षा म्हणून) वाढविण्यांत येऊन त्याचा सालीना तीन लाखांचा बोजा गायकवाडावर लादला (१८३९). याबद्दल सयाजीरावांनीं पुष्कळ तक्रार केली पण इंग्रजांनीं ती ऐकिली नाहीं. सयाजीरावांनीं १८४० त सतीची चाल बंद करून पुढें गुलाम विकण्याची पध्दत बंद केली (१८४७). इंग्रजांनीं अखेरीस (१८४०-४१) आपल्या अठ्ठावीस मागण्या गायकवाडांकडून कबूल करविल्या व ही बहांदारी (इंग्रजांनीं गायकवाडी प्रजेपैकीं कांहीची घेतलेली जिम्मेदारी) पध्दत एकदाची बंद केली. (१८४५ सुमार). या पध्दतीमुळें इंग्रजांनां अनायासें व वाटेल तसा आपला हात संस्थानी कारभारांत शिरकवितां येत असे. या वेळीं तत्कालीन इंग्रज अधिकारी लांच घेत. यामुळें गुजराथेंत असें लोकमत झालें होतें की, प्रत्येक इंग्रज लांचखाऊ असतो (रूलर्स ऑफ बडोदा. पृ. २२७). या लांबलुचपतीस त्यावेळीं 'खटपट' असें दरबारी नांव मिळालें होते. हा प्रकार सर जे. औटरम यास बंद करण्यास फार त्रास पडला. त्याच्या आड त्याचेच मित्र व वरिष्ठ अधिकारीहि आले होते (कित्ता). यानंतर थोड्याच दिवसांत सयाजीराव मरण पावले (दिसेंबर १८४७).

No comments:

Post a Comment