Total Pageviews

Wednesday, 17 October 2018

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १२५

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १२५
शूरवीर मराठा सरदार दमाजी गायकवाड
भाग ५
आपण पेशव्यांचे अंकित आहोंत हें फत्तेसिंग कबूल करी, परंतु त्यांच्या संमतीवांचून आपणांस आपला मुलुख दुस-यास देतां येत नाहीं हें मात्र त्यास मान्य नव्हतें. आपण मुलूख परत द्यावा हें त्याचें देखील इंग्रजांपाशी मागणे होतें. परंतु याचें कारण तो असें सांगे कीं, ज्याकरितां हा मुलूख इंग्रजांस दिला तें कार्य राघोबादादा हे साध्य करूं शकले नाहींत. म्हणून तो प्रांत इंग्रजांनां देण्याचें आतां कांही प्रयोजनच राहिलें नाहीं. पुढें (१७७८) त्यानें पेशव्यांनां मागील सर्व बाकी, साडे दहा लक्ष रूपये खंडणी व ५ लक्ष रूपये नजर देऊन सेनाखासखेलीचीं वस्त्रें मिळविलीं. त्यामुळें गोविंदरावाचा हक्क कायमचा नष्ट झाला.
फत्तेसिंगानें गॉडर्ड याशीं तह करून, पेशव्यांशीं चाललेल्या तत्कालीन युद्धांत त्याच्या मदतीस ३००० फौज देण्याचें कबूल (२६ जाने. १७८०) केलें. तथापि युध्द चाललें असतांहि गायकवाडानें आपली शिरस्त्याची खंडणी
Insert Image
पेशव्यांस देण्याचें बंद करूं नये अशीहि एक अट होती. यावेळीं इंग्रजानें त्याला महीच्या उत्तरेकडील प्रांत देण्याचें कबूल केलें व त्याबद्दल त्यानें इंग्रजांनां सुरत व भडोच प्रांत दिले; आणि वर सांगितल्याप्रमाणें फत्तेसिंग हा इंग्रजांचा हस्तक बनला. पुढें इंग्रजांनीं पेशव्यांशीं तह केला (१७८१), त्यांत फत्तेसिंगाजवळ असलेला मुलुख तसाच असावा, त्यानें पेशव्यांनां नेहमींप्रमाणें खंडणी द्यावी असें ठरलें. यापुढें मरेपर्यंत फत्तेसिंगानें राज्य सुरळीतपणें चालविलें.
शेवटीं (१७८९ डिसेंबर २१) फत्तेसिंग आपल्या वाड्याच्या वरच्या मजल्यावरून खाली पडून मरण पावला. मरेपर्यंत फत्तेसिंग हा सायजीचा मुतालिकच होता. त्याच्या मरणाच्या वेळीं त्याचा धाकटा भाऊ मानाजी हा बडोद्यासच होता. त्यानें लागलीच सयाजीस आपल्या ताब्यांत घेऊन जहागिरीचा अधिकार बळकाविला. या वेळीं गोविंदराव हा पुण्याजवळ अज्ञातवासांत रहात होता. त्यानें संस्थानचा अधिकार आपणांस मिळावा अशी नाना फडणविसास विनंति केली. परंतु मानाजीनें पुणें दरबारास ३३,१३,००१ रूपये नजर करून व फत्तेसिंग गायकवाडाकडे राहिलेल्या ३६ लाखांची मागील बाकीची भरपाई करण्याचें अभिवचन देऊन आपला अधिकार कायम करविला. हें पाहून महादजी शिंद्यांनीं गोविंदरावाची बाजू घेऊन मानाजीची नेमणूक पेशव्यांकडून रद्द करविली. तेव्हां मानाजी इंग्रजांकडे गेला व गॉडर्ड व फत्तेसिंग यांच्या तहाच्या आधारावर त्यांनीं आपणांस मदत करावी असें म्हणूं लागला; परंतु सालबाईच्या तहानें मागचा तह रद्द झाला असें सांगून इंग्रजांनीं ह्या वादांत पडण्याचें नाकारलें. नान फडणवीस तडजोड करण्यास तयार होते; पण गोविंदरावाच्या हट्टामुळें तडजोड झाली नाहीं. इतक्यांत एकाएकीं (१ ऑगष्ट १७९३) मानाजीचें देहावसान झालें. मानाजी मेला तरी गोविंदरावास बडोद्यास जाण्याची परवानगी मिळाली नाहीं. पुण्यांतील कारभारीमंडळ गोविंदरावास म्हणूं लागले कीं तुम्ही पूर्वीच्या सर्व अटी कबूल करून शिवाय सन १७८० सालीं इंग्रजांनां देऊं केलेला तापीचा दक्षिणेकडील स्वतःचा प्रदेश व सुरतच्या वसूलांतील आपला वांटा सरकारांत द्या. इंग्रजांनीं यावर हरकत घेतली कीं, सालबाईच्या तहान्वयें गायकवाडाचें कोणतेंहि काम न केल्यामुळें त्यांचा मुलूख घेण्याचा पेशव्यांस अधिकार नाहीं. पुढें गोविंदराव बडोद्यास गेला. तेथें त्याला खंडेरावाचा मुलगा मल्हारराव याच्याशीं लढाई करावी लागली; तींत मल्हारराव पराभव पावला व गोविंदराव सयाजीचा मुतालिक म्हणून राज्यकारभार पाहूं लागला.

No comments:

Post a Comment