Total Pageviews

Wednesday, 17 October 2018

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १२८

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १२८
१४ जानेवारी १७६१, मोडल्या झुंजाची शिफारस ! - १
संजय सोनावणे
(दिनांक १४ जानेवारी रोजी, पानिपत येथे सूर्योदय सकाळी ७ वाजता होतो व सूर्यास्त संध्याकाळी, ५ वाजून २० मिनिटांनी होतो अशी, शेजवलकरांची नोंद आहे. याविषयी अधिक माहिती मिळत नसल्याने, पानिपत युद्धाच्या विवेचानासाठी मी, शेजवलकरांच्या नोंदीचा आधार घेतलेला आहे.)
उभय सैन्याची दृष्टादृष्ट :- १४ जानेवारी १७६१ रोजी, सूर्योदयापूर्वी मराठी सैन्य, पानिपत गाव सोडून पूर्वेला असलेल्या यमुना नदीच्या दिशेने जाऊ लागले. खंदक पार करून फौज जसजशी पुढे मोकळ्या मैदानात जाऊ लागली, तसतशी लष्कराची गोलाची रचना बनत गेली. तत्कालीन रिवाजानुसार, लष्कराचे कूच होत असताना किंवा फौज प्रवासाला निघण्यापूर्वीचं सूचक अशी वाद्ये वाजवली जात. परंतु, आज शत्रू सैन्याच्या नकळत जमेल तितके अंतर वेगाने कापायचे असल्याने, अशी वाद्ये वाजवली गेली नाहीत. अर्थात, याचा अर्थ असा कोणी घेऊ नये कि, मराठी सैन्यावर भीतीचे सावट पसरले होते अथवा औदासिन्याची छाया पसरली होती ! मराठ्यांनी आपल्या बाजूने कितीही काळजी घेतली तरी त्या दिवशी निसर्ग देखील काहीसा शत्रूला अनुकूल असाच होता. नोव्हेंबर ते जानेवारी हे तीन महिने, उत्तर भारतात विलक्षण थंडीचे असतात. विशेषतः दिल्लीच्या उत्तरेकडील भागात तर कल्पनातीत थंडी असते. त्यातही जानेवारी महिन्यात थंडी व धुके यांचा प्रभाव विशेष असा असतो कि, सकाळी दहा - अकरानंतर देखील धुक्याचा पडदा फारसा विरळ होत नाही, तर कधी - कधी धुके फारसे पडतचं नाही ! जानेवारी महिन्यात पडणाऱ्या दाट धुक्याचा भाऊला बराच अनुभव आला असावा. या दाट धुक्याचा फायदा घेऊन, भल्या पहाटे जर आपण छावणी सोडून निघालो, तर दुपारपर्यंत, शत्रूच्या नकळत कमीतकमी दोन कोस अंतर तरी पार करून जाऊ असा त्याचा विचार असावा. किंवा असेही असू शकते कि, नैसर्गिक परिस्थितीचा अशा प्रकारे फायदा घेण्याचा सल्ला त्याला सरदारांनी दिला असावा. ते काहीही असले तरी, जानेवारी महिन्यात पडत असलेल्या दाट धुक्याचा फायदा घेण्याचे मराठी लष्कराने ठरवले नव्हतेचं असे म्हणणे धाडसाचे ठरेल ! पानिपत ते यमुना नदीचा किनारा यादरम्यान जवळपास ५ कोसांचे अंतर आहे. त्यातील दोन - सव्वा दोन कोसांचे अंतर जर शत्रूच्या नकळत पार करता आले तर मोठीच मजल मारल्यासारखे होणार होते. त्यानुसार भाऊने १४ जानेवारी रोजी सुर्योदयापूर्वी, बहुतेक पाच ते सहाच्या दरम्यान केव्हातरी पानिपतहून आपला मुक्काम हलवला. भाऊचे दुदैव म्हणा किंवा निसर्गाचा लहरीपणा म्हणा, त्या दिवशी धुक्याने अब्दालीला साथ दिली ! नेहमीपेक्षा, त्या दिवशी धुके फार कमी पडले व सूर्योदय होतांच, मराठी सैन्याप्रमाणे त्यानेही आपला मुक्काम गुंडाळण्यास आरंभ केला !!
सूर्योदय झाल्यावर, भाऊच्या लक्षात वस्तुस्थिती आली असावी. मराठी सैन्य, छावणीतून बाहेर पडल्याची बातमी शत्रूला समजून, तो कधीही चालून येण्याची शक्यता होती. एकूण, शत्रूच्या नकळत जास्तीत जास्त अंतर कापून पुढे निघून जाण्याचा बेत आता फार काळ गुप्त राहाण्याची शक्यता नव्हती. असे असले तरी भाऊवर किंवा मराठी सैन्यावर त्याचा फारसा विपरीत परिणाम झाला नाही. यामागे काही कारणे आहेत. पहिले म्हणजे, मराठी लष्कराने अफगाण सैन्याची अजिबात दहशत खाल्लेली नव्हती. दुसरे म्हणजे, पानिपत सोडण्याचे निश्चित झाले होते. धुके असो वा नसो, पण पानिपत सोडून जायचे हा मराठ्यांचा बेत पक्का होता. पहाटे पडणाऱ्या धुक्याचा फायदा घेऊन, शत्रू सैन्यापासून त्यांना काही काळ आपले अस्तित्व लपवायचे होते. या काळात शक्य तितक्या वेगाने त्यांना पानिपतपासून लांब व यमुनेच्या जवळ जाऊन पोहोचायचे होते. परंतु, धुक्याचा पडदा जवळपास अदृश्य झाल्याने, बहुतेक लवकरचं आपणांस शत्रू सैन्याच्या हल्ल्यांना तोंड द्यावे लागेल याची जाणीव मराठी लष्कराच्या सेनापतीला व त्याच्या सरदारांना झाली असावी.
भाऊची कैफियत, बखर सांगते त्यानुसार सूर्योदयानंतर सकाळी सहा / सात- आठ घटका उलटून गेल्यावर, हत्तीवर निशाणे देऊन नौबत व चौघडा सुरु केला. यावेळपर्यंत मराठी सैन्य पानिपतपासून दीड कोस पुढे निघून आले होते. शेजवलकर यांच्या मते, १४ जानेवारी रोजी पानिपत येथे सूर्योदय सकाळी ७ वाजता होतो. कैफियत व बखर सांगते कि सुर्योदयानंतर सुमारे सहा ते आठ घटका उलटून गेल्यावर लष्करातील नौबत व चौघडा वाजू लागले. १ घटका म्हणजे २४ मिनिटे हे प्रमाण गृहीत धरले असता ६ घटका म्हणजे १४४ मिनिटे किंवा ८ घटका म्हणजे १९२ मिनिटे. याचा अर्थ असा कि, सूर्योदय झाल्यावर साडे नऊ ते सव्वा दहाच्या सुमारास मराठी सैन्यात नौबत, चौघडा वाजू लागले. लष्करात नौबत, चौघडा वाजल्याची नेमकी वेळ शोधून काढण्याच्या प्रयत्नामागील मुख्य कारण म्हणजे, अफगाण सैन्य दृष्टीक्षेपात आल्यावर लष्कराला युद्धाच्या तयारीने सज्ज राहण्याचा इशारा देण्यासाठी नौबत, चौघडा वाजवण्यात आला. हत्तींवर निशाणे देण्यात आली. या ठिकाणी हत्तींवर निशाणे देणे किंवा नौबत व चौघडा वाजवण्यामागील कारण काय असावे हे समजून घेणे आवश्यक आहे. पूर्वीच्या काळी हजारो - लाखोंच्या संख्येने लोकं लढायांमध्ये सहभागी होत. एवढ्या मोठ्या जनसमुदायास किंवा दूर अंतरावर उभ्या असलेल्या आपल्या सेनाधिकाऱ्यांना व्यक्तीशः आज्ञा देणे मुख्य सेनापतीला शक्य नसे. तसेच, आजच्या काळी उपलब्ध असलेली संपर्कसाधने देखील त्यावेळी अस्तित्वात आलेली नव्हती. अशा स्थितीत लष्कराला आदेश कशा प्रकारे दिला जात असेल ? शांततेच्या वेळी, म्हणजे युद्धापूर्वी किंवा मुक्कामाहून कूच करतानाच्या वेळी लष्कराला मार्गदर्शन करण्यास भरपूर वेळ उपलब्ध असतो पण प्रत्यक्ष युद्धाच्या प्रसंगी हे कार्य कसे केले जात असावे ?

No comments:

Post a Comment