Total Pageviews

Wednesday, 17 October 2018

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १२९

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १२९
१४ जानेवारी १७६१, मोडल्या झुंजाची शिफारस ! - २
संजय सोनावणे
तुम्ही कधी लष्कराची किंवा पोलिसांची परेड पाहिली आहे का ? Marching Band च्या तालावर, पावले उचलत जाणाऱ्या लष्करी पथकाची किंवा पोलिसांची सर्व हालचाल हि त्या Band च्या सुरावर, तालावर होत असते. अर्थात, परेड प्रसंगी ऑर्डर देणारा अधिकारी आघाडीवर असतो, नाही असे नाही, पण परेड करणाऱ्या लोकांना त्याचा आवाज ऐकू नाही आला तर निदान Band चा आवाज तरी ऐकू येतोच कि, त्यामुळे परेड करताना जरी त्यांना तुकडी प्रमुखाचा आवाज ऐकू नाही आला तरी Band च्या सुरावटीवर त्यांना आपल्या हालचालींत बदल करता येतात ! सध्याच्या काळात Marching Band चा वापर परेड प्रसंगी होत असला तरी, त्यावेळी मात्र त्याचा उपयोग हा लष्करी तुकड्यांना आदेश देण्यासाठी होत असे. आजच्या काळात, परेड प्रसंगी लष्कराच्या प्रत्येक विभागाची किंवा पथकाची वाद्यांची एक विशिष्ट सुरावट ठरलेले असते. त्याकाळात देखील घोडदळ, पायदळ, धनुर्धारी इ. पथकांसाठी विशिष्ट अशी एक वाद्यांची सुरावट ठरलेली असे. त्याचप्रमाणे, आजच्या काळात जसे लष्कराच्या विविध विभागांना एक विशिष्ट निशाण दिलेले असते, त्याचप्रमाणे तेव्हाही लष्करातील विविध पथकांना त्यांची निशाणे ठरवून दिलेली असत. लढाईप्रसंगी वाद्ये व निशाणे या दोन्हींचा वापर केला जात असे. मुख्य सेनापतीने आदेश दिल्यावर जवळ जे निशाणाचे हत्ती असत, त्यांवर विशिष्ट आज्ञेचे निशाण फडकवले जाई. दूर अंतरावरील जे लष्करी अधिकारी असत, त्यांचे किंवा त्यांच्या हस्त्कांचे त्या निशाणाकडे लक्ष असे. निशाण घेऊन बसलेली व्यक्ती, त्या निशाणाची, सेनापतीच्या आज्ञेनुसार, पूर्वसंकेतानुसार निश्चित केलेली सांकेतिक हालचाल करीत असे. दूर अंतरावरील लष्करी अधिकारी त्या सांकेतिक हालचालीनुसार आपापल्या पथकांना हल्ल्याच्या किंवा माघारीच्या सूचना देत. या सेनाधिकाऱ्यांच्या हाताखाली विविध पथकांतील असे हजारो सैनिक असत. या पथकांचे प्रमुख, त्या सैन्याधिकाऱ्याच्या आसपास उभे असत. युद्ध प्रसंगी ज्या वेळी, ज्या पथकाची गरज असेल, त्यावेळी त्या पथकाच्या प्रमुखास तशी आज्ञा दिली जात असे. लगेच तो आपल्या पथकाजवळ जात असे. त्या पथकाला एक विशिष्ट निशाण असे. ते निशाण घेतलेली व्यक्ती हत्ती अथवा घोड्यावर बसलेली असे किंवा जमिनीवर उभी असे. पथक प्रमुखाचा आदेश मिळताच ती व्यक्ती निशाणाची पूर्व संकेतानुसार हालचाल करत असे. त्या अनुरोधाने, या विशिष्ट पथकातील सैनिक एकत्र येत असत. प्रत्येक पथकाला जसे निशाण असे त्याचप्रमाणे वाजंत्री पथक देखील असे. या वाजंत्री पथकाचे काम म्हणजे, लष्कराचे नीतिधैर्य, उत्साह वाढवणे व लष्कराला मार्गदर्शन करणे ! युद्धातील प्रत्येक हालचालीसाठी ज्या प्रमाणे निशाणाची सांकेतिक हालचाल केली जाई, त्याचप्रमाणे त्या निशाणाच्या अनुरोधाने वाद्ये देखील वाजवली जात असत. दरवेळी सैनिक, निशाण ज्या ठिकाणी फडकावले जात आहे त्या ठिकाणी पाहू शकत नाहीत, पण वाद्यांचे आवाज तरी ऐकू शकतात ना ! एकूण, तत्कालीन युद्धपद्धती आपण समजतो तशी मागास किंवा गोंधळाची नसून, ती अतिशय विचारपूर्वक व नियोजनबद्ध असलेली दिसून येते. अर्थात, याविषयीचे माझे विवेचन काहीसे अपुरे आहे हे मला मान्य आहे. याचे कारण म्हणजे मी काही यातील तज्ञ नाही. ऐतिहासिक घटनांचे विश्लेषण करणे हे माझे काम आहे व हे कार्य पार पाडत असताना, इतिहास संशोधकांनी किंवा अभ्यासकांनी आजवर ज्या ज्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केले ते मुद्दे प्रकाशात आणणे मला गरजेचे वाटते.( तत्कालीन लष्करांत होणारा वाद्यांचा व निशाणांचा उपयोग, याविषयीचा थोडा तपशीलवार उल्लेख ना. वि. बापट यांच्या ' पानपतची मोहीम ' या कादंबरीत आलेला आहे. )
क्रमश:...

No comments:

Post a Comment