Total Pageviews

Wednesday, 31 October 2018

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १३९.१

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १३९.१ 


१४ जानेवारी १७६१, मोडल्या झुंजाची शिफारस ! - १३
संजय सोनावणे
विंचूरकर, पवार प्रभूती सरदार रोहिल्यांवर चालून गेले. मराठी घोडेस्वार वेगाने धावून येत असल्याचे पाहिल्यावर रोहिले देखील मोर्च्यातून बाहेर पडले. रोहिल्यांच्या फौजेत स्वार किती होते व पायदळ किती होते याची निश्चित आकडेवारी मिळत नाही पण, त्यांच्या सैन्यात घोडेस्वारांचे प्रमाण अधिक असल्याचे उल्लेख मिळतात. त्यांच्याकडे पायदळ होते पण त्याचे प्रमाण एकूण सैन्याच्या मानाने किती होते हे सांगता येत नाही. याशिवाय महत्त्वाची बाब म्हणजे, रोहिला पायदळ हे बंदुकधारी असल्याचे जे सांगितले जाते ते अर्धसत्य आहे ! सर्वचं रोहिला शिपायांकडे बंदुका होत्याचं असे नाही.
मराठी घोडदळ जेव्हा रोहिल्यांवर चालून गेले तेव्हा त्यांचा मुकाबला प्रथम कोणी केला असावा ? रोहिल्यांच्या घोडेस्वारांनी कि पायदळ शिपायांनी ? तेव्हाची हल्ल्याची किंवा बचावाची पद्धत कशी असावी ? शत्रूवर चालून जाताना आक्रमक सैन्य, विशेषतः घोडदळ हे एकमेकांना काहीसे बिलगून, फळी धरून जात असे. पायदळ सैन्य असेल तर काही एक अंतरापर्यंत ते शिस्तीने चालत जात असे व त्यानंतर पुढे धावून जाताना मात्र सैन्याची शिस्त बिगडून ते काहीसे विस्कळीत होत असे. बचाव करणारे सैन्य, जर घोडेस्वार असतील तर, मोर्च्याच्या बाहेर येऊन काही एक अंतरावर फळी धरून उभे राहात किंवा ते देखील शत्रूवर चालून जात. परंतु बचावाची जबाबदारी जर पायदळावर असेल व घोडदळ त्यांच्यावर चालून येत असेल तर पायदळ सैनिक आपले भाले रोखून घोडेस्वारांचा मुकाबला करत. भाल्यांची लांबी सामान्यतः सात - आठ फूट असे. त्यामुळे भालाईत सैनिक आपल्या भाल्याच्या लांबीचा फायदा घेऊन स्वार अथवा घोड्यास लक्ष्य करत असे. एकदा स्वार घोड्यावरून खाली आला कि तो सावरेपर्यंत त्याचा निकाल लावता येई अथवा सरळ स्वारास लक्ष्य करता येत असे. त्यावेळी लढाईची देखील एक विशिष्ट पद्धत असे. आक्रमण करणाऱ्या किंवा बचाव करणाऱ्या सैन्याच्या लागोपाठ अशा रांगा असत. जोवर पुढील रांगेतील सैनिक / स्वार मृत वा जखमी होऊन खाली पडत नसे तोवर मागच्या रांगेत उभे असलेल्या सैनिकाला पुढे जाता येत नसे. आघाडीच्या फळीतील सैन्य लढत असे तेव्हा मागील रांगांतील शिपाई आरोळ्या ठोकून आपल्या सैनिकांचा उत्साह वाढवीत असत. आघाडीवर ज्या ठिकाणी सैन्य लढत असे त्या ठिकाणी हातातील शस्त्रांचा पुरेपूर वापर करण्याइतपत फारशी मोकळी जागा उपलब्ध नसे. त्यामुळे कित्येकदा तलवार, भाले बाजूला राहून कट्यारी, सुरे यांचा वापर केला जात असे किंवा मग सरळ गुद्दागुद्दी सुरु होत असे. लढाईत माघारीचा जेव्हा प्रसंग येई, तेव्हा मागचे सैनिक प्रथम पळत असत व पाठोपाठ आघाडीचे सैनिक येत असत. सैन्याची माघार कधी शिस्तबद्ध अशी असे तर कधी बेशिस्तपणे ! सैन्याने कच खाऊन माघार घेतल्यास त्याला पळाचे स्वरूप येत असे. कित्येकदा सैनिक हातातील शस्त्रे टाकून पळ काढत असत. सारांश, तत्कालीन युद्धपद्धतीचे स्वरूप काहीसे असे होते

No comments:

Post a Comment