हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १३९.२
१४ जानेवारी १७६१, मोडल्या झुंजाची शिफारस ! - १४
संजय सोनावणे
मराठी घोडेस्वार जेव्हा रोहिल्यांच्या मोर्च्यावर चालून गेले तेव्हा
त्यांचा सामना करण्यासाठी रोहिला घोडेस्वार पुढे सरसावले. आरंभी रोहिला
स्वारांनी नेटाने झुंज दिली खरी पण लवकरचं त्यांना माघार घ्यावी लागेल अशी
चिन्हे दिसू लागली. अशा स्थितीत रोहिल्यांचे पायदळ, आपल्या स्वारांच्या
मदतीला धावून आले. रोहिला स्वारांना नवीन कुमक आल्यामुळे त्यांचा जोर
वाढला. तुलनेने मराठी सैन्याची संख्या कमी असल्याने त्यांना माघार घेणे
क्रमप्राप्त होते. मुळात, या मराठी सैन्याची संख्या साधारणतः पाच - सहा
हजारांच्या आसपास असावी. समशेरबहाद्दर, अंताजी माणकेश्वर या हल्ल्यात
सहभागी होते कि नव्हते याची माहिती मिळत नाही. हे जर अशा हल्ल्यात सहभागी
असतील तर मराठी सैन्याची संख्या सुमारे दहा हजारांच्या आसपास जाते. परंतु
यांचा सहभाग असल्याबद्दल निश्चित माहिती मिळत नसल्याने हे यावेळी गोलात उभे
होते असेच गृहीत धरावे लागते. असो, सुमारे पाच - सहा हजार मराठी
स्वारांनी, अठरा ते वीस हजार रोहिल्यांवर चाल करून आरंभी जरी थोडेफार यश
मिळवले असले तरी, शत्रूचे संख्याबळ अधिक असल्याने त्यांना माघार घेणे
एकप्रकारे भाग पडले. रोहिला पायदळ सैन्याने, मराठी स्वारांवर बंदुकींचा
मारा केल्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली असे जे सांगितले जाते त्यात
फारसे तथ्य नाही. याचे कारण म्हणजे, रोहिल्यांपैकी फक्त नजीबाकडे अशा
तऱ्हेचे बंदुकधारी पायदळ असल्याचा उल्लेख मिळतो. इतर रोहिला सरदारांकडे अशा
धर्तीची बंदुकधारी पलटणे असल्याचा उल्लेख आढळत नाही. अर्थात, ज्या रोहिला
पायदळ सैनिकांकडे बंदुका होत्या त्यांनी, मराठी स्वारांवर गोळीबार केलाच
नसेल असे म्हणता येत नाही पण, रोहिल्यांच्या गोळीबारामुळे मराठी घोडेस्वार
मागे फिरले असे म्हणणे धाडसाचे ठरेल ! त्याचप्रमाणे, मराठी घोडेस्वार माघार
घेऊन आपल्या गोलाकडे निघाले तेव्हा रोहिला सैन्याने त्याचा पाठलाग करत थेट
गारदी पलटणींवर चाल केली असे म्हणता येत नाही ! वस्तुस्थिती लक्षात न घेता
आपल्या इतिहासकारांनी या घटनेचे बरेच अतिरंजित वर्णन केले आहे. समजा, काही
क्षण असे गृहीत धरू कि, मराठी स्वार माघार घेऊन आपल्या गोलात परत निघाले
असताना रोहिला सैन्य त्यांच्या पाठी लागले व गारदी पलटणींवर तुटून पडले.
आता अशा प्रकारचे वर्णन लिहिण्यास फक्त कल्पनाशक्तीची गरज आहे, पण असे काही
वास्तवात घडू शकते का ? पाच ते सहा हजार मराठी स्वारांशी आरंभी आठ - दहा
हजार रोहिला घोडेस्वार लढत होते. नंतर जवळपास तीन - चार हजार पायदळ शिपाई
त्यांच्या मदतीस आल्याने मराठी घोडदळ मागे फिरले. याचा अर्थ असा कि,
रोहिल्यांचे पायदळ व घोडदळ एकमेकांत मिसळून गेले असल्याने एकाचवेळी, मराठी
स्वारांवर शत्रूच्या घोडेस्वाराशी व पायदळ सैनिकाशी झुंज देण्याचा प्रसंग
ओढवला. अशा स्थितीत माघार घेण्याशिवाय त्यांच्यासमोर इतर पर्याय नसल्याने
त्यांनी काढता पाय घेतला. मराठी स्वार माघार घेऊन आपल्या गोलाच्या दिशेने
परत जात आहेत हे पाहिल्यावर, लगेचचं रोहिल्यांचे घोडेस्वार आणि पायदळ,
सरमिसळ झालेल्या स्थितीत, एकप्रकारे धावत त्यांच्या पाठी लागून गेले असे
म्हणायचे तर रोहिला शिपाई आपल्या स्वारांच्या बरोबरीने धावत गेले असे गृहीत
धरावे लागेल. त्याशिवाय, ज्या सैनिकांना आपल्या स्वारांच्या सोबत धावायला
जमले नाही अथवा जे धावता - धावता तोल जाऊन किंवा ठेच लागून पडले त्यांना
मागच्या बाजूने येणाऱ्या पायदळ सैनिकांनी / स्वारांनी तुडवले असेही मग
गृहीत धरावे लागेल. याचा अर्थ असा होतो कि, अशा घाई - गडबडीच्या स्थितीत
रोहिल्यांचे सर्वसाधारण हजार - दोन हजार शिपाई तरी निकामी झाले असावेत. आता
प्रश्न असा निर्माण होतो कि, त्यावेळचे रोहिला सरदार किंवा त्यांचे
अधिकारी काय मूर्ख होते ? आपल्या सैन्याला असे स्वतःच्या लष्कराच्या व
जनावरांच्या पायाखाली तुडवून मारण्याची त्यांना हौस होती ? लढायांची
काल्पनिक वर्णने देताना कमीतकमी वस्तुस्थितीची जाणीव ठेवण्याचे भान, निदान
इतिहास लेखकांनी तरी बाळगण्याची गरज आहे ! वस्तुतः, मराठी सैन्याचा
निर्णायक पराभव झाला नसून त्यांनी फक्त माघार घेतली होती. त्यांचे मुख्य
लष्कर अजून कायम होते. मराठी स्वारांच्या माघारीला पळाचे स्वरूप आले
नव्हते. या कारणांमुळे रोहिला सैन्य, मराठी स्वारांचा पाठलाग करत थेट गारदी
पलटणींवर चालून गेले नाही. उलट, मराठी लष्कर मागे फिरताच, रोहिल्यांनी
प्रथम आपल्या सैन्याची शिस्त बांधली. पायदळ - घोडदळ जे एकत्र झाले होते, ते
वेगवेगळे होऊन उभे राहू लागले. दरम्यान रोहिला सरदार व अफगाण सरदार
अमीरबेग, बरकुरदारखान यांच्यात चढाई विषयी चर्चा किंवा सल्ला मसलत घडून
आली. त्यानुसार रोहिल्यांनी, गारदी पलटणींवर समोरून हल्ला करायचा तर अफगाण
सरदारांनी, गारद्यांच्या डाव्या बगलेवर चालून जायचे असे ठरवण्यात आले.
अमीरबेग व बरकुरदार सोबत साधारणतः चार - पाच हजार स्वार असावेत. या
सैन्याजवळ तोफखाना बहुतेक नसावा, आणि असल्यास त्या तोफा फारतर लहान व
वजनाला हलक्या अशा असाव्यात. त्यामुळेचं या सैन्याला अल्पावधीत,
गारद्यांच्या डाव्या अंगावर चालून जाता आले.