हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १७६
चिमणाजीआप्पा, (धाकटे) —
भाग २
भाग १७६
चिमणाजीआप्पा, (धाकटे) —
भाग २
इकडे नाना फडणीस शिंद्यांच्या भयानें (ज्यावेळीं शिंदे पुण्यास आले
तेव्हांच) सातार्याकडे निघून गेले होते. तेथून ते मेणवलीस गेल्यानंतर
चिमाजीआप्पाचें दत्तविधान झालें (मे २६) व सातारकर महाराजांकडून त्यांनां
पेशवाईची वस्त्रेंहि मिळालीं (२ जून); परंतु नानानीं निजाम, इंग्रज, होळकर,
भोसले वगैरे मंडळींशीं राजकारण करून चिमाजीआप्पाचें उच्चाटन घडवून आणलें.
त्यांनीं आपल्या मुत्सद्देगिरीनें खुद्द दौलतराव शिंद्यांसहि फोडले व
त्याच्या तर्फे रावबाजीशीं सूत्र लावून त्यास गादीवर बसविण्याचें (बाजीराव
रघुनाथ म्हणून) ठरविलें. या वेळीं रावबाजी जांबगावीं होते. या वर्षी
दसर्याचा समारंभ फार थाटाचा झाला. चिमाजीआप्पाची स्वारी मोठ्या समारंभानें
निघाली होती. पण हें आपलें वैभव १५-२० दिवसांतच नष्ट होणार हे
श्रीमंतांच्या ध्यानांतहि आलें नाहीं. शेवटीं २६ ऑक्टोबरच्या रात्रीं या
(चिमाजीस गादीवर बसविण्याच्या) सर्व कारस्थानाचा उत्पादक बाळोबातात्या
पागनीस व त्याचे साथीदार यांनां दौलतरावांने कैद केलें. पहाटे होळकर व
निजामाची फौज शनिवारवाड्यावर चालून आली. तत्पूर्वी रात्रींच एक चूकी
झाल्यानें भाऊ व चिमाजीआप्पा निसटले. परशुरामभाऊस पकडण्याची चिठ्ठी
परशुरामवैद्य यास जावयाची असतां, चुकून जासुदानें ती भाऊजवळच नेऊन दिली.
तेव्हां भाऊ तात्काळ हजार पांचशें स्वार घेऊन व चिमाजीआप्पास आपल्या
घोड्यावर घेऊन जुन्नरकडे पळालें. परंतु हजुरातीनें त्यांनां तेथें पकडून
भाऊस मांडवगणच्या किल्ल्यांत व चिमाजीआप्पास शिवनेरीस कैदेंत ठेविलें. नंतर
ठरल्याप्रमाणें नाना पुण्यास आले व रावबाजी गादीवर बसले (४ दिसेंबर). हें
सर्व कारस्थान नानांचेच होतें. पुढें चिमाजी आप्पास शिवनेरीहून पुण्यास
आणलें व ते शनीवारवाड्यांतच राहू लागले. तेव्हा रावबाजीनें पुण्यांतील
पंडितांनां विचारून त्यांनी
सांगितल्यावरून (अशास्त्रीय दत्तविधान झाल्यामुळें) चिमाजीआप्पास सक्षौर
प्रायश्चित देवविलें (१७९७ नोव्हेंबर). शिंद्याच्या गृहकलहानें पुण्यास
भानगडी चालू झाल्या, त्या सुमारास रावबाजीनें चिमाजीचें लग्न केले (८ जून
१७९८). मुलगी आप्पाजीपंत दामले यांची नात होती; तिचें नांव सीताबाई होतें.
दुसरी बायको सत्यभामाबाई नांवाची, मंगळवेढेकर मेहेंदळ्यांचीं मुलगी होती;
हिचें लग्न १८१२ सालीं झालें. आप्पांचा राज्यकारभारांत फारसा प्रवेश
झाल्याचें आढळून येत नाहीं. फक्त स. १७९७ च्या सुमारास गुजराथचा सुभा
पेशव्यांनीं यांच्या नांवचा करून दिला होता व यांची मुतालिकी आवा शेलुकरास
सांगितली होती. एवढाच उल्लेख आढळतो. पेशवाई नष्ट झाल्यानंतर यांनां
इंग्रजानें पेन्शन देऊन काशीस ठेविलें व ते तेथें ९ जून १८३० रोजीं वारलें.
यांची पुढील हकीकत आढळत नाहीं. [खरे-खंड, ७, ९, १०; डफ-पु.३;
राजवाडे-खंड,४].
No comments:
Post a Comment