Total Pageviews

Monday, 26 November 2018

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १७४

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १७४
चिमणाजीआप्पा —
भाग
बाजीरावाचें व आप्पाचें शेवटी शेवटीं बिनसलें असावें. ''श्रीमंत (मस्तानीमुळें) विषयलंपट झाले, यामुळें आप्पाशीं अंतर पडून नर्मदातीरीं गेले.'' आप्पानीं १७४० च्या जानेवारींत फिरंग्याचें रेवदंडा नांवाचें (गोवें व दमण या मधील) राहिलेलें एकच ठाणें काबीज केलें. येथून परत आल्यावर आप्पांची प्रकृति वाख्यानें ढासळली. आप्पांची पहिली बायको रखमाबाई, ही त्रिंबकरावमामा पेठेची बहीण होती. हिचाच पुत्र सदाशिवराव भाऊ. भाऊचा जन्म झाल्यानंतर २८ दिवसांनींच ही वारली (३१-८-१७३०) त्यानंतर आप्पानीं अन्नपूर्णाबाई नांवाची दुसरी स्त्री केली (डिसें. १७३१). हिला बयाबाई नांवाची एक मुलगी झाली (नोव्हें. १७४०). आप्पांची प्रकृति एकदां बिघडली ती न सुधारतां अखेर पुणें येथें त्यांचें देहावसान झालें (डिसें. १७४०) त्यावेळीं अन्नपूर्णाबाई ही सती गेली. या और्ध्वदेहिकास ११७५ रु. खर्च झाला. बयाबाई ही गंगाधर नाईक यास दिली (१४ एप्रिल १७४५); ती पुढें १७५९ त वारली. आप्पा हे थोरल्या बाजीरावापेक्षां कांहीं बाबतींत श्रेष्ठ होतें. त्यानीं बाजीरावास त्याच्या दोषांवर पांघरूण घालून शेवटपर्यंत पाठपुरावा केला. बाजीरावास पेशवाई मिळाली तेव्हांच आप्पांस त्यांची मुतालिकी मिळाली होती. आप्पा विचारी, धोरणी, मनमिळाऊ, शूर व नीतिमान होते. वसईच्या किल्ल्यांत सांपडलेल्या फिरंगी सरदाराच्या सुस्वरूप मुलीस त्यांनी सन्मानानें परत पाठविलें ही गोष्ट प्रख्यातच आहे. शाहू व इतर सरदार मंडळी बाजीरावाकडील काम आप्पांच्या मध्यस्तींनें उरकून घेत. बाजीरावाचीं मुलें बहुधा आप्पाजवळच असत. त्यांनां शिक्षणहि आप्पांनींच दिलें होतें. कौटुंबिक व्यवस्थाहि तेच पहात असत. बाजीरावानें उत्पन्न केलेल्या अनेक प्रकरणांचा निकाल आप्पाच लावीत. नानासाहेबांच्या अंगी जो अष्टपैलु मुत्सद्दीपणा आला होता त्यांचे श्रेय आप्पांसच होतें. आप्पानां गुजराथी लोक चिमणराजा म्हणत असत. डफ म्हणतो कीं पोर्तुगीजांवर मिळविलेल्या अनेक विजयांमुळें आप्पांची कीर्ति महाराष्ट्रांत अजरामर झाली. पाश्चात्य राष्ट्रांशीं लढण्याचे वारंवार प्रसंग आल्यानें त्यांचें असें ठाम मत झालें होतें की तोफखाना व कवायती पायदळाशिवाय पाश्चात्यांबरोबर टिकाऊ जय मिळणें नाहीं. [डप. पु.१, २; मराठी रिसायत, मध्यविभाग; नानासाहेब रोजनिशी; पत्रें यादी वगैरें; ब्रह्मेंद्र स्वामीचरित्र: राजवाडे खं. २, ३; शाहू म. ची बखर; पंतप्रधान शकावली, पृ.७].

No comments:

Post a Comment