हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १७३
चिमणाजीआप्पा —
भाग २
भाग १७३
चिमणाजीआप्पा —
भाग २
फिरंग्यांच्या धार्मिक जुलुमानें कंटाळलेली अंताजी रघुनाथ व अणजूरकर नाईक
वगैरे प्रांतस्थ प्रमुख मंडळी मराठ्यांस अनुकूल झाली होती. फिरंग्यांचें
आरमार व सैन्य सुसज्जित असतांहि मराठ्यांनीं चिकाटीनें व शौयानें वसईसह
त्यांचा वरील सर्व प्रदेश काबीज केला. पुढें (१७३८) फिरंग्यांनीं त्या
प्रांतीं असलेल्या शंकराजी केशव, रामचंद्र हरि वगैरे सरदारांवर जय्यत
तयारीनिशी मोहिम केली. परंतु या सुमारास मराठे
भोपाळच्या मोहिमेंत गुंतल्यानें वसईभागांत त्यांनां फारशी हालचाल करतां
आली नाहीं. त्यानंतर १७३८ च्या नोव्हेंबरांत आप्पा वसईच्या स्वारीवर
निघाले. सहा महिने या स्वारीचा हंगाम चालू होता. दमण ते दीवपर्यंतचा सर्व
किनारा त्यांनीं हस्तगत केला. या भागांत सर्वत्र चकमकी सुरू होत्या व आप्पा
या सर्व किनार्यावर एकसारखे लढत होते. त्यांनीं प्रथम माहीम सर केले
(डिसेंबर). येथें शंभर गलबतें भरून इंग्रज व हबशी यांची मदत फिरंग्यास झाली
असतांहि मराठ्यांनीं माहीम काबीज केलें. नंतर केळवें, शिरगांव, डहाणू,
अशेरी वगैरे ठाणीं घेतलीं. (जानेवारी १८३९). या सर्वांत तारापूरचें ठाणें
मजबूत असल्यानें तेथें शिताफीचा रणसंग्राम झाला. पण अखेर तारापुरचा किल्ला
मराठ्यांनीं घेतला. मात्र येथें बाजी भिवराव हा नामांकित सरदार ठार झाला
(जाने.). नंतर आप्पानीं वसईवर हल्ला केला. हा वेढा तीन महिने चालू होता.
मराठ्यांनी अत्यंत चिकाटीनें युद्ध चालवून हा किल्ला अखेर १३ मे रोजीं
फिरंग्यांपासून काबीज केला (वसई पहा). दुसरीकडे वांदरा, वेसावे, धारावी
वगैरे ठाणीं आप्पांच्या सरदारांनीं काबीज केलींच होतीं (फेब्रु). वसईच्या
मोहिमेचीं खास अप्पानीं ब्रम्हेंद्रस्वामीस लिहिलेलीं पत्रें वाचण्यालायक
आहेत. (राजवाडे खं. ३ ले. २७; काव्येतिहास सं. पत्रें यादी ले. ४३९).
सारांश या मोहिमेंत फिरंग्यांचा सुमारें पाऊणशें मैल लांबीचा (३४० गावें
असलेला) प्रदेश आप्पानीं काबीज केला. त्याशिवाय ८ शहरें, २० किल्ले, २५ लाख
किंमतीचा दारूगोळा व जहाजें, तोफा इतकें सामान आप्पानीं हस्तगत केलें.
यावेळीं आप्पानें अगर पेशव्यानें वसईस मराठी आरमाराचा एक सुभा स्थापून
इंग्रजास पायबंद घालावयास पाहिजे होता, परंतु हें त्या दोघांच्याहि
लक्ष्यांत आलें नाहीं. पुढें पेशव्यांचें निजामाशीं युद्ध झालें त्यांत
आप्पाहि सामील होतें (१७४०). त्यावेळी मुंगीपैठणचा तह होऊन आप्पा परतले.
इतक्यांत आंग्र्यांच्या घरांत कलह माजला व मानाजीनें मदतीस बोलाविल्यावरून
आप्पा कोंकणांत गेले व त्यांनीं तेथें संभाजी आंग्र्यांचा पराभव करून
त्याला सुवर्णदुर्गास परतविलें (१७४०). इतक्यांत थोरले बाजीराव वारल्यानें
आप्पा बरोबर नानासाहेबांस घेऊन, पुण्यास व तेथून सातार्यास गेले व
त्यांनीं नानासाहेबास पेशवाईचीं वस्त्रें मिळवून दिलीं. (आगष्ट १७४०).
No comments:
Post a Comment