हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १७७
ठाणे-साष्टी मुक्तीचा इतिहास
लेखक : -पांडुरंग बलकवडे
भाग १७७
ठाणे-साष्टी मुक्तीचा इतिहास
लेखक : -पांडुरंग बलकवडे
२७ मार्च हा दिवस ठाणे शहराच्या दृष्टीने अतिशय पवित्र असतो. कारण २७९
पूर्वी म्हणजेच २७ मार्च १७३७ रोजी सव्वादोनशे वर्षांच्या पोर्तुगीजांच्या
अन्यायकारी गुलामीतून ठाण्याची मुक्तता झाली होती. त्या संघर्षाचा इतिहास
अतिशय प्रेरणादायी आहे. इसवी सन १५००च्या सुमारास व्यापाराचे निमित्त करून
आलेल्या पोर्तुगीजांनी हळूहळू सत्ता प्राप्त करून प्रजेला गुलाम केले.
संपत्ती आणि धर्मांतरासाठी अतोनात अत्याचार केले. छत्रपती शिवराय आणि
त्यांच्यानंतर संभाजीराजांनी त्यांच्या दुष्कृत्यांना पायबंद घालण्याचा
यशस्वी प्रयत्न केला. संभाजी राजांच्या पश्चात औरंगजेबाच्या आक्रमणाचा
फायदा उठवून पोर्तुगीजांनी पुन्हा थैमान घातले होते. त्यांच्या अत्याचाराला
कंटाळलेली प्रजा शाहू छत्रपती आणि
पेशव्यांकडे सतत गार्हाणी घालत होती. बाजीराव पेशव्यांनी आपले धाकटे बंधू
चिमाजी आप्पा यांच्यावर पोर्तुगीजांच्या ताब्यातील ठाणे-वसई भागाला मुक्त
करण्याची जबाबदारी सोपविली. गुढी पाडव्याचा सण साजरा करून मराठी फौज
मोहिमेवर निघाली. चिमाजी आप्पांनी मराठी सैन्याचे दोन भाग केले होते. शंकररावजी केशव फडक्यांच्या नेतृत्वाखाली एक सैन्यदल वसई जिंकावयास तर सुभेदार बलकवडे आणि
सुभेदार खंडोजी माणकर यांच्या नेतृत्वाखाली ठाणे-साष्टी जिंकावयास दुसरे
सैन्य निघाले होते. पोर्तुगीजांच्या अत्याचाराला कंटाळलेला ठाणे-वसई
परिसरातील सर्व समाज मराठ्यांच्या फौजेला सर्व प्रकारचे सहकार्य करावयास
सिद्ध झाला होता. त्यांचे नेतृत्व मालाडचे अंताजी कावळे तसेच अणजूर गावचे
गंगाजी, मुर्हारजी, बुबाजी, शिवाजी, नारायण नाईक, अंजूरकर बंधू करीत होते.
पोर्तुगीजांचा ठाणे प्रांताचा सुभेदार होता लुई बहेलो. याच्याच
मार्गदर्शनाखाली इंजिनीअर अँद्रो रिबेरो कुतिन्हु याने इ. स. १७३४ च्या
सारास ठाणे शहराला भक्कम तटबंदीने बंदिस्त केले होते व त्यात सुसज्ज
बालेकिल्ल्याची उभारणी केली होती. यामुळे मराठी सैन्यासमोर मोठे आव्हान
होते. २६ मार्च १७३७ च्या रात्री खाडीच्या बाजूकडील पाणबुरूज आणि
तटबंदीवर शिड्या लावून अचानक हल्ला केला. स्थानिक रहिवासी लक्ष्मण राऊत,
हंसा कोळी, बुबाजी नाईक अणजुरकर यांच्या सहाय्याने खाडीच्या बाजूने
किल्ल्यात प्रवेश मिळविला. होनाजी बलकवड्यांनी आपल्या सैन्यासह ठाण्याच्या
जमिनीकडील बाजूने हल्ला केला. त्यांच्या बरोबर इतर अणजूरकरबंधू रामाजी
महादेव, रामचंद्र हरी होते. तुकनाक, धोंडनाक, गणनाक, फकीर महंद ही स्थानिक
मंडळी मोलाची मदत करीत होती. मराठ्यांच्या या अचानक झालेल्या हल्ल्याने
माघार घेऊन लुई बहेलो याने सर्व फौजेसह कुटूंबकबिल्यासह पलायन केले.
रणवाद्ये वाजवीत मराठ्यांनी ठाण्यात प्रवेश केला. अशा पद्धतीने आपल्या
पराक्रमाची शर्थ करून सव्वा दोनशे वर्षांच्या पारतंत्र्यातून महाराष्ट्राची
सांस्कृतिक नगरी ठाणे-साष्टीवर शिवरायांचा भगवा फडकला. या कामगिरीबद्दल
चिमाजी आप्पा पेशव्यांनी सर्व पराक्रमी योद्ध्यांचा यथोचित सन्मान केला.
कोणाला सोन्याची कडी, कोणाला सोन्याच्या मोहरा, तर विशेष कामगिरी
करणार्यांना वतने जमिनी इनाम दिल्या. अशा पद्धतीने मराठ्यांनी एका
पाश्चात्त्य आधुनिक पोर्तुगीज सत्तेच्या जोखडातून ठाणे-साष्टी मुक्त करून
देदीप्यमान इतिहास घडविला. त्याचे स्मरणे करणे यथोचित आहे.
(लेखक इतिहास संशोधक आहेत.)
(लेखक इतिहास संशोधक आहेत.)
No comments:
Post a Comment