Total Pageviews

Monday, 26 November 2018

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १७८

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १७८
तुळाजी आंग्रे-:
इतिहासातील अद्वितीय पराक्रमी योद्धा …
भाग १
. लेखक श. श्री. पुराणिक लिहितात की, "तुळाजीची कोठेही समाधी नाही पण, सारा विजयदुर्ग हीच तुळाजीची समाधी आहे." तुळाजी आंग्रे- तुळाजी हा कान्होजी आंग्रयाचा रक्षापुत्र (राजवाडे खं. ६ ले. ४५३). त्याच्या आईचें नांव गहिनाबाई. स. १७३४ त हा आपला सावत्र बंधु संभाजी याजबरोबर हबशापासून अंजनवेल काबीज करण्यास गेला. संभाजी दौलतीवर असतां हा त्याचा कारभारी होता. मन १७४० त हिराकोटाजवळ संभाजीच्या व पेशव्यांच्या लोकांत जी झटपट झाली तींत हा जखमी होऊन पेशव्यांचा हातीं सांपडला. पुढें (१७४१ डिसेंबर) संभाजी मरण पावल्यावर याचें व पेशव्याचें सडकून वैर जुंपलें. यानें यमाजी शिवदेवाच्या वशिल्यानें मानाजीविरुद्ध शाहूकडे कारस्थान चालविलें. तेव्हां जो अंजनवेल घेईल त्यास सरखेलीचें पद देऊं अशी शाहूनें अट घातली, त्याप्रमाणें तुळाजीनें स. १७४२ त अंजनवेलचा किल्ला घेतला. त्यावर आंग्रे घराण्यांतील तंटा मिटविण्याकरितां शाहूनें मानाजीस वजारतमाब हा किताब देऊन त्यास कुलाब्याचा अधिकार दिला व तुळाजीस सरखले ही पदवी देऊन सुवर्णदुर्गापासून थेट दक्षिण कोंकणपर्यंतची हद्द वाटून दिली. ही तडजोड तुळाजीस पसंत पडली नाहीं. त्यानें मानाजीचे कबिले अडकवून ठेविल्यामुळें ब्रह्मेंद्रस्वामीनें ते सोडून देण्याविषयीं त्यास एक पत्र लिहिलें. शाहूच्या पश्चात् तर तुळाजीनें वर्तन अनावर झालें.रयतेस छाडाछेड केली. तो सरकारांत नेमणुकीप्रमाणें ऐवज न भरतां उद्दामपणें वागूं लागल व पेशव्यांस मुळींच जुमानीनासा झाला. ताराबाईचा व पेशव्यांचा तंटा जोरांत असतां तुळाजीनें उचल घेतली; आरमाराच्या जोरानें पेशव्याविरुद्ध वावरणार्‍या तुळाजीसक नुसत्या फौजेच्या बळावर जिंकणें पेशव्यांस शक्य नव्हतें. या कारणास्तव आरमारास प्रतिआरमार आणून तुळाजीशीं युद्ध करण्याचा व्यूह रचला. तुळाजीचा नाश करण्यास इंग्रज टपलेलेच होते. यामुळें पेशव्यांनीं इंगर्जांची मदत मागतांच त्यांनीं ती मोठ्या खुषीनें देऊं केली. यावेळीं रत्‍नागिरी किल्ला बावडेकर अमात्यांचा असून तो तुळाजीनें हस्तगत केला होता, तो व सुवर्णदुर्ग असे दोन किल्ले तुळाजीजवळ पेशव्यानें मागितले. तुळाजी म्हणाला कीं सुईच्या आग्राइतकी मृत्तिका देणार नाहीं. तेव्हां पेशव्यानें ''रामाजी महादेव यांस सांगून, इंग्रज अनुकूल करुन तुळाजीवर मसलतीचा योग मांडिला. सुवर्णदुर्गांत व विजयदुर्गांत वगैरे फितुरांची संधीनें रामाजी महादेव खेळूं लागले.'' तुळाजीविरुद्ध पेशव्यांनीं करवीरकरांशींहि कारस्थान आरंभिलें तेव्हां करवीरकर यांनीं तुळाजीकडून अंमल दूर करुन सरकारांत दिला (१८ फेब्रुवारी १७५५) . रामाजी महादेवामार्फत इंग्रज व पेशवे यांच्या दरम्यान करार होऊन (१९ मार्च १७५५) इंग्रजांचें आरमार मुंबई बंदर सोडून निघालें (२२ मार्च). दुसर्‍या दिवशीं कमांडर जेम्स यानें राजापुरी बंदराबाहेर आंगर्‍यांच्या १८ जहाजांचा पाठलाग करुन त्यांनां पळवून लाविलें. पुढें पेशव्यांचीं ७ तारवें, १ बातेला व ६० गलबतें इंग्रजांस मिळालीं (ता. २५), ता. २९ ला इंग्रजांचा व आंगर्‍यांचा सामना होऊन, इंग्रज आंगर्‍यांचा पाठलाग करीत जयगडपावेतों जाऊन दुसर्‍या दिवशीं सुवर्णदुर्गास परत आले. त्याच वेळीं रामाजीपंत हा किल्ल्यावर मारा करीत होता. त्यास इंग्रजांनीं मदत केली. किल्ल्यांतील लोकांचाहि मारा कांहीं कमी नव्हता. ता. ३ एप्रिल रोजीं किल्ल्यांतील दारुखाना आग लागून उडाला व यामुळे किल्ल्यांतील लोक सैरावैरा पळूं लागले. दुसर्‍या दिवशीं संध्याकाळीं तहाचें बोलणें लावण्यास किल्ल्यांतील लोक रामाजीपंताकडे आले. परंतु ते बोलाचालींत वेळ काढून बाहेरच्या मदतीची वाट पहात आहेत अशी शंका येऊन रामाजीपंतानें ता. १२ रोजीं तोफांचा मारा करुन किल्ला घेतला.

No comments:

Post a Comment