हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २३०
तत्त्वासाठी लढणारे मराठे
डॉ. सदानंद मोरे
भाग १
मराठे हिंदुस्थानचे राज्यकर्ते म्हणून वागत होते. . हिंदुस्थानात सत्ताधीश कोणी व्हायचे किंवा राहावयाचे याबद्दल वाद असो, पण राज्य हिंदी रहिवाशांचेच असले पाहिजे व तेच राज्यकर्ते राहिले पाहिजेत, या तत्त्वासाठी मराठे पानिपतात लढले.
मराठ्यांनी उत्तरेकडील राजकारण हाती घेतल्यामुळे अफगाणिस्तान-इराणकडून येणाऱ्या धार्मिक, मूलतत्त्ववादी सत्तांच्या संकटातून हिंदुस्थानचा बचाव झाला. या संकटाबरोबरच दुसऱ्याही एका परकीय सत्तेचे सावट तेव्हा या देशावर पडत होते. कलकत्ता येथील इंग्रज दिवसेंदिवस प्रबळ होत होते. आपल्या फ्रेंचादी पाश्चात्त्य प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकून त्यांनी हिंदुस्थानातील आपला पाया बळकट केला होता. बंगालमधील सिराजउद्दौला या मोगल सुभेदाराचा प्लासीच्या लढाईत पराभव करून इंग्रजांनी दिल्लीच्या मोगल बादशहाकडून बंगालची दिवाणी प्राप्त केली होती. या मोबदल्यात त्यांनीही दिल्लीच्या बादशहाच्या रक्षणाची हमी घेतली होती. हा बादशहा ज्याच्या ताब्यात त्याचा हिंदुस्थानवर अंमल, असे समीकरण होते; परंतु या बादशहाला ताब्यात घेण्यात मराठ्यांनी यश संपादन केले व इंग्रजांचा अंमल निदान अर्धे शतक तरी पुढे ढकलला गेला. याचेही श्रेय मराठ्यांनाच द्यायला हवे. थोडक्यात, दोन प्रबळ परकीय सत्तांपासून भारताचे रक्षण करणाऱ्या आणि नंतरही इंग्रजी सत्तेच्या अमलाखाली गेल्यावर भारताला परत स्वतंत्र करण्यात महाराष्ट्र आघाडीवरच होता, एवढे सांगितले म्हणजे पुरे.
पानिपतच्या गर्दीत जीव वाचवून सुखरूप परत आलेल्या मराठ्यांमध्ये महादजी शिंदे आणि नाना फडणीस या दोन कर्तबगार पुरुषांचा समावेश होता. मराठी दौलतीचे नंतर जे काही बरेवाईट झाले त्याचे बरेचसे श्रेय या दोघांना द्यावे लागते. तेव्हा परत एकदा पानिपतच्या युद्धाकडे वळावे लागते
No comments:
Post a Comment