दुर्गाबाई :- छत्रपती संभाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी ?
लेखन आणि संकलन :- नागेश मनोहर सावंत देसाई
छत्रपती
संभाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी महाराणी येसूबाई या सर्वाना परिचित
आहेत. परंतु काही संदर्भ साधनातून दुर्गाबाई या संभाजी महाराजांच्या
द्वितीय पत्नी असाव्यात याविषयी काही नोंदी संदर्भ साधनातून आढळून येतात.
सदर लेखात संदर्भ साधनात आढळून येणाऱ्या दुर्गाबाई यांच्याविषयीच्या काही
नोंदी आणि त्याची चिकित्सा.
- • संभाजीराजे यांचा दुसरा विवाह
मोगल
इतिहासकर भीमसेन सक्सेना इ.स. १६७५ साली पुढीलप्रमाणे नोंद करतो “ अली
आदिलशहाच्या मृत्यूनंतर त्याचे मुलुख आपल्या ताब्यात आणण्याची शिवाजीने
इच्छा केली. अकलूजच्या ठाण्यावर रणमस्तान हा मोगल ठाणेदार होता. जाधवराय
दखनी याचा पुतण्या रुस्तमराव हा रणमस्तान याजपाशी तैनात होता. शिवाजीने
रुस्तमरावाच्या मुलीशी आपला मुलगा संभाजी याचे लग्न ठरविले. जाधवराव दखनी
आणि हिलालखान हे मोगलांना सोडून त्याला ( शिवाजी महाराजांना ) मिळाले
होते.
मोगल
इतिहासकार भीमसेन सक्सेना शिवाजी महाराजांनी रुस्तमराव जाधव याच्या मुलीशी
संभाजीराजांशी विवाह ठरविला अशी नोंद करतो परंतु हा विवाह कोणत्या साली
झाल्याच्या नोंदी आपणास संदर्भ साधनातून आढळून येत नाहीत. तसेच सदर मुलीचे
नाव यात येत नाही. या विषयी अन्य कोणत्याही संदर्भ साधनात माहिती आढळून येत
नाही.
- • संभाजीराजे दिलेरखानाच्या छावणीत
१३
डिसेंबर १६७८ संभाजी महाराज रागवून व नाराज होऊन दिलेरखानास मिळाले. ९१
कलमी बखर , बसातीन – उस – सलातीन , चिटणीस बखर याच्या नोंदीनुसार
संभाजीराजे दिलेरखानाच्या भेटीस गेले तेव्हा त्यांच्यासोबत त्यांची पत्नी व
काही स्वार बरोबर होते. संभाजीराजे स्वराज्यात परत आले त्यावेळी ते
त्यांच्या पत्नीसह स्वराज्यात आल्याचे संदर्भ आढळतात .
९१
कलमी बखरीतील नोंद :- त्या उपर संभाजीराजे भेटले हे वर्तमान पतशाहास टाक (
डाके ) दाखल झाले. दिलेरखानानेही लिहून पाठवले होते . त्यावरून हुजुरची
तलब आबादी आले. जे संभाजीराजे त्याबराबर फौज देवून बळकटीने हुजूर पाठवणे .
हे तलब येताच संभाजीराजे यांजबरोबर फौज देवून रातोरात स्त्रीसह वर्तमान
पळविले.
चिटणीस बखरीतील नोंद :- संभाजीराजे अनुताप होऊन स्त्रीसहवर्तमान युक्तीने निघोन आले.
बसातीन
– उस – सलातीन :- संभाजी यांनी फुरसतीची वेळ पाहून आपले स्त्रीस पुरुषाचा
पोषाख पांघरून शुराचा वेष देवून पाच स्वारानिशी आपले स्त्रीसुद्धा
दिलेरखानाचे लष्करातून पळाला.
संभाजीराजे
दिलेरखानाच्या छावणीत गेले त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी होती असा
उल्लेख वरील उत्तरकालीन साधनातून येतो तसेच संभाजीराजे स्वराज्यात परत आले
त्यावेळी त्यादेखील स्वराज्यात परत आल्या . परंतु त्या पत्नी कोण त्याचं
नाव काय याबाबत मात्र काही माहिती आढळून येत नाही.
येसूबाई
यावेळी शृंगारपुरात होत्या त्यांना भवानी नावाची कन्या झाली. जेधे
शकावलीतील नोंदीनुसार “ ४ सेप्टेम्बर १६७८ बुधवारी रात्री २०/४४ शृंगारपुरी
भवानीबाई लेक संभाजी राजे यासी झाली.” येसूबाई स्वराज्यात शृंगारपुरास
आपल्या माहेरी असताना संभाजी महाराजांनबरोबर असलेली त्यांची दुसरी पत्नी
कोण ?
- • दिलेरखानाच्या कैदेत संभाजीराजांची बायको व बहिण असल्याच्या नोंदी :-
औरंगजेबाच्या
दरबाराच्या अखबरीतील नोंद २७ नोहेंबर १६८१ : - सीवाचा मुलगा संभा याची एक
बायको व बहिण यांना पूर्वी दिलेरखानाने कैद केले होते त्यांना या किल्यात (
अहमदनगर ) ठेवले आहे. म्हणून शत्रूचे लोक ह्या किल्याभोवती आले. त्यांचा
त्यांना किल्यातून बाहेर काढण्याचा विचार आहे .
ऑगस्ट
१६८४ मासिरे आलमगिरी मधील नोंदीनुसार “बहादूरगडाचा किल्लेदार अब्दुर रहमान
याचा शिक्का असलेली संभाच्या दोन पत्नी , एक मुलगी व तीन दासी , कैदेत
असल्याची पोचपावती बादशाह समोर ठेवली गेली.
- • दिलेरखानाच्या कैदेतून दुर्गाबाई यांची सुटका करण्याचे प्रयत्न :-
ताराबाई
कालीन कागदपत्रे खंड १ यादव घराण्यातील पत्रातील नोंदीनुसार संभाजीराजे व
गिरजोजी यादव यांनी दुर्गाबाई यांना सोडवण्याचे प्रयत्न केले.
ताराबाई
कालीन कागदपत्रे खंड १ ( पत्र १४३ दिनांक २८-११-१७०३ छत्रपती शिवाजी राजे
दुसरे यांजकडून गिरजोजी यादव यांना मिळालेली सनद ) :- मातोश्री
दुर्गाबाईसाहेब ताम्राचे निर्बंधी दौलताबादेस होती. त्यांचे वर्तमान न कळे
तेव्हा प्ररामार्श करावयास संभाजीराजे काका यांणी तुम्हास पाठवले . तेथे
तुम्ही जावून जीवाभ्य श्रम करून संकट प्रसंगात त्यांची भेटी घेऊन येऊन
वर्तमान श्रुत केले.
ताराबाई
कालीन कागदपत्रे खंड १ ( पत्र ३२२ दिनांक ०५-१०-१७१६ निवाडापत्र ) :-
गिरजोजी यादव हे मातोश्री दुर्गाबाईसाहेब राजेश्री संभाजी राजे छत्रपती
यांची राणी दौलताबादेस तांब्राचे निर्बंधी होती . तिथे धन्याच्या
आज्ञेप्रमाणे जाऊन परमसंकटे त्याची भेटी घेऊन त्यास काढून आणावयाचा येत्न
योजून येऊन वर्तमान धन्यास सांगितले.
ताराबाई
कालीन कागदपत्रे खंड १ ( पत्र ३६१ दिनांक २३-०९-१७२० कोल्हापूर छत्रपती
संभाजी महाराज दुसरे ) :- “ त्या उपरी मातोश्री दुर्गाबाई साहेब ताम्राचे
निर्बंधी दौलताबादेस होती. त्यांचे वर्तमान न कळे. त्यांचा परामर्श
करावयास राजश्री संभाजीराजे यांनी आपणास पाठविले. तेथे संकट प्रसंगात जाऊन
त्यांची भेटी घेऊन आलो. ते समयी राजश्री संभाजीराजे व कवी कलश समागमे असता
आपण येऊन दुर्गाबाई यांचे वर्तमान सांगितले. “
वरील
साधनाचा विचार करता अस्सल पत्रांच्या आधारे दिलेरखानाच्या कैदेत
संभाजीराजांच्या पत्नी कैदेत होत्या. परंतु दिलेरखान प्रकरण वगळता अन्य
कोणत्याही मार्गाने त्या मुघलांच्या कैदेत कशा सापडल्या असतील याच उत्तर
मिळत नाही.
- • छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलींचे लग्न
१६
जून १७०३ च्या बातमीपत्रात औरंगजेबाने मुगलखान राहदार यास आज्ञा केली :
नरकवासी संभा ( संभाजी राजे ) याच्या मुली बहादूरगडाच्या तळावर आहेत
त्यांना हुजुरात आणावे.
५
मार्च १७०४ च्या बातमीपत्रातील नोंद “नरकवासी संभा ( संभाजी राजे ) याची
मुलगी हिला बहादूरगडावरून आणण्यात आले होते. तिचे लग्न फकीर मुहमद शाहूर
याच्या बरोबर करण्याचे ठरवले. फकीर मुहमदला बादशहाने खिलातीची वस्त्रे
दिली.
२४
एप्रिल १७०४ च्या बातमीपत्रातील नोंद “नरकवासी संभा ( संभाजी राजे )
यांच्या मुलीचे लग्न फकीर मुहमद शाईर याच्याबरोबर ठरवण्यात आले होते. ते
बदलण्यात आले. आता तिचे लग्न सिकंदरखान मरहुम ( विजापूरचा शेवटचा बादशहा
सिकंदर आदिलशाह ) याचा मुलगा मोईयोद्दीन याजबरोबर ठरविण्यात आले. त्याला
खिलातीची वस्त्रे देण्यात आली.
८ जून १७०४ च्या बातमीपत्रातील नोंदीनुसार “ सदर लग्न औरंगजेबाच्या उपस्थित हुकुमानुसार पार पडले.
सदर मुलगी हि दुर्गाबाई यांची असावी असा तर्क करता येतो परंतु त्यास ठोस संदर्भ नाहीत.
- • दुर्गाबाईचे स्वराज्यात आगमन
छत्रपती
संभाजी महाराजांच्या क्रूर हत्तेनंतर थोरले शाहू महाराज व राजपरीवर मोगली
कैदेत होता. छत्रपती थोरले शाहू महाराज स्वराज्यात परतले. शाहू
महाराजानी १७१९ मध्ये चौथाई व सरदेशमुखीच्या सनदा आणण्यासाठी मराठा सैन्य
दिलीस पाठवले शंकराजी मल्हार , बाळाजी विश्वनाथ यांनी केलेले अकबराच्या
मुलाचे एक खोटे नाटक व दिल्लीतील राजकीय व लष्करी संघर्ष यामुळे
छत्रपतींच्या परिवाराची मोगली कैदेतून सुटका झाली. शाहू महाराजांनी
बाळाजी विश्वनाथ यांना बादशहाकडून कोणत्या सनदा घ्यावयाच्या आहेत याविषयीची
यादी दिली त्यातील एक मुख्य कलम “मातोश्री व मदनसिंग देखील व दुर्गाबाई,
जानकीबाई व सेवक लोक मागोन घेणे “
स्वराज्यात परत आल्यानंतर दुर्गाबाई यांच्या बाबतीत कोणतीही विश्वसनीय माहिती आढळून येत नाही.
- • दुर्गाबाई आणि जाधव घराणे
दुर्गाबाई या जाधव घराण्यातील होता अशी मांडणी काही इतिहास अभ्यासक करताना
दिसतात परंतु त्यास ठोस संदर्भ नाही. मोगल दरबाराच्या बातमीपत्रात सेतू
माधवराव पगडी मोगलांतर्फे लढणाऱ्या मराठा सरदारांच्या नावाची यादी देतात
त्यात एक नाव सिंद्खेडचे जाधव.
एप्रिल
मे १६९४ जगदेवराव जाधवराव यांना ३००० जात व २००० स्वार अशी मनसब मोगल
सैन्यात होती. सप्टेम्बर १७०० रोजी औरंगजेबाच्या ब्रम्हपुरी छावणीत
त्यांचा मृत्यू झाला.
जगदेवराव जाधवराव यांचा पुत्र मानसिंग जाधवराव याला ७०० जात व ६०० स्वार अशी मनसब मोगल सैन्यात होती.
जगदेवरावचा भाऊ रुस्तमराव याला पाचशे जात व शंभर स्वार अशी मनसब होती त्यात १०० जात व १०० स्वार अशी वाढवण्यात आली.
रुस्तमरावचा मुलगा बहादूरजी ( जाधव ) हा मुगलखान यांच्या फौजेत तैनात होता.
१५ जून १७०४ छत्रपती शाहू महाराजांचे लग्न बहादूरजी ( जाधव ) यांच्या मुलीशी करण्यात आले.
जाधवराव
घराणे मोगली सैन्यात सरदार होते . त्यांनी त्यांच्या घराण्यातील मुलीला
औरंगजेबाच्या कैदेतून सोडवण्यासाठी प्रयत्न केले असते. परंतु असे कोणतेही
प्रयत्न झालेले दिसून येत नाहीत.
- • निष्कर्ष आणि शक्यता
१
) भीमसेन सक्सेना शिवाजी महाराजांनी जाधवांच्या घराण्यातील मुलीशी संभाजी
महाराज्यांचा विवाह ठरवला होता अशी नोंद करतो परंतु तो विवाह संपन्न झाला
का याची नोंद आपणास कोणत्याही साधनात आढळून येत नाही. तसेच त्या मुलीचे नाव
देखील कुठे नमूद केलेले नाही.
२
) दिलेरखानाच्या छावणीत संभाजी महाराज गेले असताना त्यांच्यासोबत त्यांची
पत्नी होती व त्या परत स्वराज्यात आल्या अशी नोंद उत्तरकालीन बखरीत आढळून
येते. औरंगजेबाच्या दरबारातील नोंदीनुसार संभाजीराजांची बायको व बहीण
दिलेरखानाच्या कैदेत होती. संभाजी महाराज व दिलेरखान भेट प्रकरण वगळता
अन्य कोणत्याही मार्गाने संभाजीराजांची बायको व बहीण मुघलांच्या कैदेत कशा
सापडल्या असतील याच उत्तर मिळत नाही
३
) संभाजी महाराजांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव हे दुर्गाबाई होते हे आपणास
यादव घराण्यातील पत्रातील नोंदीत आढळते . संभाजीराजे व गिरजोजी यादव यांनी
दुर्गाबाई यांना सोडवण्याचे प्रयत्न केले.
४
) छत्रपती संभाजीराजे यांच्या एका मुलीचे लग्न विजापूरचा शेवटचा बादशहा
सिकंदर आदिलशाह याच्याशी केले परंतु ति मुलगी दुर्गाबाई यांची असावी यास
ठोस संदर्भ नाहीत.
५)
दुर्गाबाई या जाधव घराण्यातील असल्याचे कोणतेही ठोस संदर्भ आढळून नाहीत.
जाधव घराणे मोगल सैन्यात मनसबदार होते त्यामुळे त्यांनी आपल्या घराण्यातील
कैदेत असलेल्या मुलीस सोडवण्याचे प्रयत्न केले असते परंतु असे कोणतेही
प्रयत्न दिसून येत नाहीत.
६ ) ४० वर्ष मोगली कैदेत राहिल्यानंतर स्वराज्यात दुर्गाबाई परत आल्या परंतु पुढे त्यांच्याविषयी काहीही आढळून येत नाही.
७
) छत्रपती राजाराम महाराज यांच्या विवाहाच्या नोंदी आढळून येतात. मग
संभाजी महाराजांच्या दुसऱ्या विवाहाची नोंद कोणत्याही संदर्भ साधनात का
आढळून येत नाहीत. दुर्गाबाई या पत्नी असव्यात की नाटकशाळा ? याविषयी
संभ्रमावस्था आहे.
लेखन आणि संकलन :- नागेश मनोहर सावंत देसाई
संदर्भ :- मोगल आणि मराठे :- सेतू माधवराव पगडी
९१ कलमी बखर ,चिटणीस बखर
बसातीन – उस – सलातीन ( विजापूरची आदिलशाही ) :- वा.सि.बेंद्रे
मासिरे आलमगिरी
ऐतिहासिक फार्सी साहित्य खंड ६ औरंगजेबाच्या दरबाराचे अखत्यार ,
ताराबाईकालीन कागदपत्रे खंड १
मोगल दरबाराची बातमिपत्रे :- सेतू माधवराव पगडी
No comments:
Post a Comment