मराठ्यांचा दिल्लीतील पहिला राज्यकर्ता नगरचा
नगर- मराठ्यांचा दिल्लीतील पहिला राज्यकर्ता मूळचा नगरचा होता. त्यांचे नाव सरदार अंताजी माणकेश्वर गंधे. दुर्दैवाने त्यांचे उचित स्मारक नगरमध्ये अजून उभे राहू शकले नाही. त्यांच्या वंशजांनी केलेल्या पाठपुराव्याला अद्याप यश आलेले नाही.
श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांचे दिल्लीतील मुत्सद्दी, पानिपत युद्धातील पराक्रमी मराठा सरदार अंताजी माणकेश्वर गंधे मूळचे कामरगावचे. थोरले छत्रपती शाहू महाराज हे नगर मुक्कामी औरंगजेब बादशहाच्या कैदेत असताना अंताजी या पोरसवदा मुलाची कर्तबगारी त्यांनी हेरली. कैदेतून सुटका झाल्यावर त्यांनी अंताजीस साताऱ्यात आपल्या पदरी ठेवून घेतले व त्याच्याकडे कुलकर्णीपद सोपवले. पुढे रोज व प्रत्येक मोहिमेवर निघाना अंताजी थोरल्या छत्रपतींच्या कपाळी गंध लावू लागला आणि छत्रपतींनी त्यांचे नामकरण "गंधे' असे केले.
कऱ्हेपठार प्रांतात वडीलबंधू हरी माणकेश्वर हे वतनदार म्हणून पुढे आले. अंताजी पाच वर्षांचा असतानाच पोरका झाला. दुष्काळामुळे चुलते नसोपंत लिगोजींबरोबर तो उत्तर िहंदुस्थानात उदरनिर्वाहासाठी गेला. तिकडे शास्त्राचे व शस्त्राचे शिक्षण घेऊन तो तरबेज झाला. रामचंद्रपंत भट्टांनी थोरल्या छत्रपती शाहू महाराजांना अंताजीिवषयी सांगितले. १७-१८ व्या वर्षी अंताजी छत्रपतींच्या सेवेत दाखल झाला.
उत्तर हिंदुस्थानची कनौजी भाषा, फारसीवर प्रभुत्व, तलवारबाजीत िनपुणता आणि शत्रूशी बोलण्यातून मात करण्याचे कसब या गुणांमुळे छत्रपतींनी पेशव्यांना हुकूम देऊन अंताजीची नेमणूक मराठ्यांचे दिल्लीतील मुत्सद्दी म्हणून केली. त्यासाठी त्यास सात हजार स्वारांची मनसब दिली. उत्तरेकडील राजकारणात शिंदे - होळकरांप्रमाणे सेनापती म्हणून अंताजीस मोठे महत्त्व प्राप्त झाले.
अंताजी हे व्यक्तिमत्त्व अहंमन्य, धाडसी, पराकोटीचा स्वामीभक्त. छत्रपतींच्या आदेशाशिवाय कुणालाही न जुमानणारा असा. सन १७२९ मधील महंमदखान बंगशाच्या लढाईत अंताजी आपल्या सैन्यासह लढला. बंगशाने फार उच्छाद मांडला होता. बाजीराव पेशवे व त्रिंबकराव दाभाडे यांच्यात त्यावेळी मोठा झगडा सुरू होता. बंगशा मल्हारराव होळकरांवर मंडलेश्वर येथे चालून गेला. मात्र, ते त्याला चुकवून मारवाडात जयपुरास निघून गेले. लढण्याची कामगिरी अंताजीवर अाली. निकाराची झुंज देऊनही त्यास पराभव पत्करावा लागला.
महाराष्ट्रात उपेक्षा
प्रसिद्ध इतिहास संशोधक सर जदुनाथ सरकार यांनी अंताजींच्या पराक्रमाचे, राष्ट्रसेवेचे स्मरण सतत केले पाहिजे, असे नमूद करून त्यांचा गौरव केला आहे. मात्र, मराठी सुपुत्र असूनही महाराष्ट्रात ते उपेक्षित राहिले. महेश सुरेश जोशी, पुणे.
No comments:
Post a Comment