हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग २२५
अंताजी माणकेश्वर -
भाग ३
हिंगण्याचा बंदोबस्त राघोबानें केला, तसा अंताजी माणकेश्वराचा इ. स. १७५८ त केला. पुढें अंताजीस पकडून दक्षिणेंत पाठविलें कीं काय तें समजत नाहीं. इ. स. १७५९ च्या अखेरीस तो पुण्यांत असून सदाशिवराव त्याचे हिशेब तपासीत होता (३.२३३). मेरट वगैरे महाल अंताजीकडे होते. ते दूर करून सात लक्ष रुपये सरकारांत देण्याच्या करारावर डिसेंबर १७५८ त ते बापूजी महादेवाकडे देण्यांत आले (६.४७१). एकंदरींत अव्यवस्थेची कमाल झाली होती, ती सर्व सदाशिवरावानें तोडिली. त्यानें हिंगणे व अंताजी माणकेश्वर यांच्या प्रकरणांचा तपास करून निकाल लावून दिला (३.२३३) आणि लगेच पुढें स. १७६० च्या आरंभीं अंताजीपंत आपल्या कामावर रुजू झाला. सदाशिवराव दिल्लीस असतां हे सर्व सरदार रेशमासारखे मऊ येऊन त्याच्या केवळ भजनीं होते.
पानपताच्या लढाईनंतर अंताजी माणकेश्वर, बाजी हरि, नाना पुरंदरे व मल्हारराव होळकर असे रात्रौ दिल्लीचे सुमारें चालले असतां दांडग्यांच्या हुल्लडींत फरुखाबादच्या जमीनदाराच्या हातून अंताजी माणकेश्वर व बाजी हरि ठार झाले.
अंताजीच्या मुलाचे नांव बहिरोपंत. अंताजीपंताचे वंशज हल्लीं उत्तरहिंदुस्थानांत भेलशें येथें रहात आहेत. त्यांनीं आपलें आडनांव 'मांडके' असें लाविलें आहे (भा. इ. सं. मं त्रैमासिक वर्ष ३ अंक २-३-४)
No comments:
Post a Comment