Total Pageviews

Saturday, 18 August 2018

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १२०

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १२०
दौलतराव शिंदे:
भाग २
नानानें कारस्थान करून रावबाजी व दौलतराव यांनां बाळोबाविरुद्ध आपल्याकडे वळवून घेतलें; दौलतरावास बरीचशी रक्कम कबूल केली व रावबाजीस गादीवर बसविण्याचें ठरविलें. तेव्हां दौलतरावानें बाळोबास कैद केलें. मात्र चिमाजी आप्पा व परशुरामभाऊ हे पळून गेले. पुन्हां रावबाजी गादीवर आला. याच वेळीं नानाला न समजतां रावबाजीनें दौलतरावाशीं एक गुप्त तह केला होता कीं, नानांपासून आमचें रक्षण सतत करावें, त्याबद्दल आम्ही दोन कोट रु. देऊं आणि सर्जेराव घाटग्याची मुलगी (ही दौलतरावाच्या मनांत फार भरली होती) तुम्हांस करून देऊं. त्याप्रमाणें हें लग्न होऊन सर्जेरावास दौलतरावाची दिवाणगिरीहि मिळाली.
या सुमारास् तुकोजी होळकर मेला व त्याच्या मुलांमध्यें सरदारीबद्दल तंटा लागला. तेव्हां शिंद्यानें काशीरावाचा पक्ष घेऊन त्याचा शूर भाऊ मल्हारराव याच्यावर एकाएकीं छापा घालून त्यास ठार मारून त्याच्या अल्पवयस्क मुलास (खंडेराव) आपल्यापाशीं ठेवून त्याच्या नांवें होळकरी संस्थान चालविलें. त्यामुळें त्यांच्यांत व यशवंतरावांत वैर माजलें. आतां शिंदे हा नानांजवळ कबूल केलेली रक्कम व नगरचा किल्ला आणि १० लाखांचा मुलूख मागूं लागला. नानानें बरीच रक्कम भरून उत्तरेकडे कूच केल्यास किल्ला देण्याचें कबूल केलें. कारण क्षणैकबुद्धि रावबाजी त्याच्या साहाय्यानें नानास अपाय करण्यास टपला होता. परंतु शिंदा जाईना. यावेळीं अनेक मसलती झाल्या. अखेर वचन देऊन शिंद्यानें नानांस आपल्या गोटांत आणवून विश्वासघातानें (रावबाजीच्या सांगण्यावरून) त्यानां कैद करून नगरास पाठविलें (३१ डिसेंबर १७९७).
लग्नांत खर्च झाल्यानें व फौजेचा पगार तुंबल्यामुळें आणि कबूल केलेलें काम (नानास कैद) पार पाडल्यामुळें शिंद्यानें पेशव्याजवळ दोन कोट रकमेची मागणी केली. खजिन्यांत इतका पैका नव्हता; व तो कसा वसूल करावा ही नानाची कर्तबगारीहि पेशव्यांत नव्हती. तेव्हां त्यानें सर्जेरावाकडून पुण्याच्या लोकांपासून परभारें पैका वसूल करण्यास शिंद्यास परवानगी दिली. या सर्जेरावानें अत्यंत छळ करून पुणें धुवून काढलें. त्यानें खुद्द शनवारवाडयांतहि धुमाकूळ घातला. हा अति दुष्‍ट मनुष्‍य होता. (ज्ञा. को. वि. १३ घाटगे-सर्जेराव घाटगे-पहा.).
या जुलुमामुळें दौलतरावास कैद करण्याचें पेशव्यानें ठरविलें. परंतु आयत्यावेळीं त्याचा धीर झाला नाहीं. मात्र या दोघांत वांकडें येऊन परक्या राजांकडे दोघांनींहि मदत मागितली होती. शेवटीं पेशव्यास शह देण्यास शिंद्यानें नानास सोडलें.
मध्यंतरीं महादजीच्या स्त्रियांचा व दौलतरावाचा बेबनाव होऊन त्या बायांनीं ५।६ वर्षें फौजेच्या बळावर स्वराज्यांत धुमाकूळ घालून व कोल्हापुरकरांची मदत घेऊन लुटालूट केली. शेवटीं बाळोबानें बायांचा व दौलतरावाचा समेट करून दिला. इंग्रजांनींहि कारस्थानें करून बायांनां चिथावलें. कारण शिंदा हा मराठी राज्यांत फौजबंद सरदार होता व तोच त्यांच्या इच्छेच्या आड येण्यासारखा होता. म्हणून नेहमीं त्याची शक्ति कशी कमी होईल इकडेच त्यांचें लक्ष्य असे व त्यासाठीं ते मुद्दाम भानगडीहि उत्पन्न करीत.
नाना वारल्यावर (१८००) त्यांच्या संपत्तीवर शिंदे व पेशवे दोघांनींहि हात मारला. पुढें पेशव्यांकडून ४७ लाखांच्या वराता उत्तरेकडील सरदारांवर घेऊन एकदांचा शिंदा तिकडे वळला. वाटेंत त्याचा यशवंतराव होळकरानें पराभव केला (१८०१). यावेळेपासून दौलतरावाचें लक्ष्य युद्धशास्त्राकडे जास्त लागलें. तरी पण तो उतावळा असल्यानें उत्तम सेनापति बनला नाहीं, म्हणून अखेर त्याचा इंग्रजांनीं पराभव केला. यावेळीं शिंदे-होळकरांनीं परस्परांच्या राजधान्या जाळल्या; होळकरानें तर पुणेंहि जाळलें. त्यावेळीं रावबाजी पळून इंग्रजाकडे गेला आणि वसईस त्यानें मराठी राज्याच्या बेदाव्याचा तह लिहून दिला (१८०३).
या तहामुळें सर्व मराठयांचे डोळे उघडले. दौलतरावानें होळकरास व भोंसल्यास मिळवून इंग्रजांस हांकलून लावण्याचा प्रयत्‍न चालविला. परंतु एकमेकांचीं मनें शुद्ध नसल्यानें व इंग्रजांची युद्धसामुग्री उत्तम दर्जाची असल्यानें मराठयांचा सर्वत्र पराभव होत गेला. अलीगड, दिल्ली, आसई, आग्रा, लासवाडी व अडगांव येथील लढायांत शिंदा नामोहरम झाला (१८०३). त्याच्या सैन्यावरील अधिकारी इंग्रज व फ्रेंच होते; त्यांनीं आयत्या वेळीं फितुरी केल्यानें अर्थातच दौलतरावाचा नाश झाला. सुर्जी-अंजनगांवचा नामुष्‍कीचा तह होऊन त्यांत त्‍याचा अर्ध्यापेक्षां जास्त मुलुख इंग्रजांनां मिळाला.
इतक्यांत होळकरानें इंग्रजांचा पराभव केल्यानें दौलतराव त्यास जाऊन मिळाला (१८०४); परंतु पुन्हां आपसांतलें जुनें वैर निघून त्यानें होळकरास सोडलें. त्यावेळीं कार्नवालीसनें नवीन तह करून ग्वालेर किल्ला दौलतरावास देऊन त्याला व त्याच्या कुटुंबाला जहागिरी वगैरे दिल्या (१८०५). पुढें बारा वर्षें दौलतरावानें गडबड केली नाहीं. नंतर पेंढार्‍यांनां मिळून पुन्हां इंग्रजांविरुद्ध काहूर उठविण्याची खटपट त्यानें केली, परंतु ती इंग्रजांच्या चातुर्यामुळें साधली नाहीं (१८१७). मात्र यावेळीं झालेल्या तहानें दौलतराव नाखुषीनें इंग्रजांचा मांडलिक बनला. रावबाजीच्या शेवटच्या कारस्थानांतहि दौलतरावानें भाग घेतला होता, पण त्याचा कांहीं उपयोग झाला नाहीं (१८१८); उलट त्याचा मुलुख व सत्ता जास्त संपुष्‍टांत आली.
पेशवाई गेल्यावर नऊ वर्षें दौलतराव जिवंत होता. त्या कालांत त्यानें गडबड केली नाहीं. हा त्याच्या सारखा मुत्सद्दी व सेनापति नसल्यानें महादजीचे बेत याच्या हातून सिद्धिस गेले नाहींत. दौलतराव २१ मार्च १८२७ रोजीं मरण पावला. त्यावेळीं त्याचें राज्य दीड कोटीचें होतें. त्याची बायको बायजाबाई; त्याला पुत्र नसल्यानें दत्तक घेऊन बाईनें बरेंच दिवस राज्य चालविलें. [मॅलेसन - नेटिव्ह स्टेटस्; गोडबोले-एतद्देशीय संस्थानें; खरे-भाग ९।१०।११।१२; पेशव्यांची बखर; पेशवाईची अखेर.]

No comments:

Post a Comment