Total Pageviews

Saturday, 18 August 2018

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग ११९

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ११९
दौलतराव शिंदे:-
भाग
शिंदे घराण्यांतील एक संस्थानिक. महादजी शिंद्याचा सावत्र भाऊ तुकोजी म्हणून होता, तो पानिपतांत ठार झाला; त्याचा पुत्र आनंदराव, त्याचा दौलतराव. याच्या आईचें नांव मैनाबाई. महादजीस मुलगा न झाल्यानें त्यानें याला दत्तक घेण्याचें ठरविलें; परंतु तो एकाएकीं वारल्यामुळें (१७९४) दत्तविधान झालें नाहीं व त्यामुळें दौलतरावास सरदारीची वस्त्रें पेशव्यांकडून मिळालीं तेव्हां महादजीची बायको लक्ष्मीबाई हिनें हरकत घेतली होती; यावेळीं दौलतराव १४ वर्षांचा होता.
या सुमारास अनेक भानगडीचीं राजकारणें पेशवाईंत उत्पन्न झालीं. दौलतरावास अनुभव व पोक्तविचार नसल्यानें मराठी राज्यांत याच्या वागण्यानें अनेक घोटाळे उत्पन्न झाले. खडर्याच्या लढाईंत दौलतराव हजर होता (१७९५). तिकडून परत आल्यावर तो पुण्याहून उत्तरेकडे निघाला. इतक्यांत सवाईरावसाहेबानीं प्राणत्याग केला. तेव्हां अडचणीचा प्रसंग जाणून नानानें त्याला ताबडतोब परत बोलाविलें; उद्देश हा कीं त्याच्यासारख्या फौजबंद सरदारास आपल्या बाजूस ओढून यशोदाबाईच्या मांडीवर दत्तक देऊन राज्य चालवावें. पण या मसलतीस दौलतरावाचा दिवाण बाळोबातात्या प्रतिकूल होता. रावबाजीनें बाळोबास प्रथम फोडून त्याच्या करवीं दौलतरावासहि फोडलें आणि आपल्यास गादीवर बसविल्यास त्याला ४ लाखांचा मुलुख व पुण्यास असेपर्यंतचा सैन्यखर्च देण्याचें कबूल केलें. दौलतराव यावेळीं लहान, बिनअनुभवी व पैशाचा लोभी होता. या लोभीपणानें त्यानें रावबाजीच्या कारकीर्दींत पुष्‍कळ वेळां वचनें मोडून उलटसुलट बाजू घेतल्या होत्या. तसेंच नानानां कैदेंत टाकण्यासहि त्यानें कमी केलें नाहीं आणि होळकराशीं भांडून इंग्रजांस बळावूं दिलें. पुढें त्याला इंग्रजांचा कावा कळला व त्यानें त्यांच्याविरुद्ध चळवळहि केली; परंतु ती फार उशीरा केली गेली.
दौलतराव रावबाजीस गादीवर बसविणार हें कळतांच नानानेंच बाजीरावास पुण्यास आणलें. इतक्यांत दौलतराव पुण्यास आला व बाजीरावानें त्याला नानाला कैद करण्यास सांगितलें. हें समजतांच नाना महाडाकडे निघून गेला. वास्तविक बाळोबाच या कारस्थानाचा कर्ता होता. त्याच्या मनांत नानाचा कारभार आपल्या हातीं घ्यावयाचा होता; बाळोबा शेणवी असल्यानें ब्राह्मणांचा द्वेष करी.
बाजीराव गादीवर आल्यावर तो पुन्हां नानाकडे संधान बांधूं लागला व कबूल केलेला पैसा देईना म्हणून बाळोबानें परशुरामभाऊस नानांच्या विरुद्ध फोडून रावबाजीस कैद करून चिमाजीआप्पास यशोदाबाईस दत्तक देऊन राज्याचा कारभार आपल्या हातीं घेतला (मे १७९६).

No comments:

Post a Comment