स्वराज्याचे पांडव
भाग ६
परशुराम त्रिंबक कुलकर्णी ह्यांच्या कारकिर्दीची सुरवात एक कारभारी म्हणून झाली - पण त्यांना खरी आवड होती तलवारीचा पराक्रम गाजवण्याची. रामचंद्रपंतांचे ते एक विश्वासू सोबती होते - कित्येक महत्वाच्या मोहिमा त्यांच्यावर सोपवण्यात आल्या होत्या. अशाच एका मोहिमेत त्यांनी व्यूहरचनात्मक दृष्टीने अतिशय महत्वाचा असा पन्हाळा किल्ला परत स्वराज्यात आणला. परशुरामपंतांचा विशेष भर असायचा तो परत मिळवलेले किल्ले आणि त्यांच्यावरच्या फौजेला बळकट करण्यावर - ह्यामुळे एकदा परत जिंकून घेतलेला किल्ला भविष्यातल्या गनिमाच्या हल्ल्यांना तोंड देण्यास सज्ज असायचा. मोगल आक्रमण परतवण्यात आणि महाराष्ट्रात स्वराज्य अबाधित ठेवण्यात परशुरामपंतांचा हातभार फार मोलाचा. त्यांचे योगदान आणि कौशल्याची नोंद घेऊन राजाराम महाराजांनी त्यांना प्रतिनिधी पदावर बढती दिली(प्रतिनिधी हे पद अष्टप्रधान मंडळाच्या पेक्षा अधिकारात वरचे होते असे वाटते). पहिले प्रतिनिधी प्रल्हाद निराजी ह्यांच्या निधनानंतर परशुराम त्रिंबक प्रतिनिधीपदी आरूढ झाले आणि महाराणी ताराबाईंच्या काळात सुद्धा हे पद त्यांच्याकडे अबाधित राहिले. परशुरामपंतांची स्वराज्य सेवा थेट पेशवे काळाच्या सुरवातीस म्हणजे १७१८ पर्यंत अखंडित चालू राहिली.
संभाजी महाराजांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर स्वराज्य गनिमाच्या हातात पडण्याची मोठी दाट शक्यता होती. पण स्वराज्यावर आलेले हे अनिष्ट टळले ते केवळ असंख्य शूर शिवाजीभक्तांमुळे. त्यांचे नेतृत्व केले ते ह्या पांडवांनी - मराठा फौजेला एकत्र बांधून ठेऊन , मोगल आक्रमण रोखून त्यांनी रयतेच्या हालापेष्टा होऊ दिल्या नाहीत. तसेच महाराष्ट्रातला लढा आपल्या अंगावर घेऊन त्यांनी राजाराम महाराजांना मोलाची सेवा दिली. राजे जिंजीला असताना त्यांनी महाराष्ट्रातले स्वराज्य लढवले. दोन्ही आघाड्यांवरची लढाईची देखरेख स्वतः सांभाळणे महाराजांना कठीण गेले असते. ह्या अतिकठीण काळात ज्यांनी स्वतःची पर्वा ना करता लढा दिला आणि स्वराज्य अबाधित राखले त्या सर्व वीरांना इतिहास नेहमीच नमन करेल - आणि ह्या सगळ्या शूरवीरांच्या अग्रभागी होते स्वराज्याचे पांडव !!