इतिहासकार यदुनाथ सरकार यांनी पूर्वी एकदा काही कागदांचे चुकीचे वाचन केल्यामुळे गैरसमज होऊन मराठ्यांचे सैन्य चिनाब नदी ओलांडून पुढे गेलेच नव्हते, असे विधान केले होते. त्यावर विसंबून रियासतकार गो. स. सरदेसाई यांनी जून 1943मध्ये पुण्यात भरलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या एका संमेलनाचे उद्घाटन करताना यदुनाथांची री ओढली. तेव्हा इतिहाससंशोधक ग. ह. तथा तात्यासाहेब खरे यांनी "केसरी' व "सह्याद्री'मध्ये लेख लिहून त्याचा प्रतिवाद केला व मराठ्यांच्या पराक्रमाचे यथार्थ दर्शन घडविले. खऱ्यांनी अस्सल कागदपत्रांच्या आधारे दाखवून दिले, की मराठ्यांच्या काही तुकड्या अटकेजवळ सिंधूचे पात्र ओलांडून गेल्या व त्यांनी पेशावर येथे काही काळ मुक्कामही केला. 5 सप्टेंबर 1758 च्या एका पत्रातील उल्लेखानुसार ""पूर्वीच्या मुलुकाखेरीज लाहोरचा सुभा अटकपावेतो दो करोडाचा मुलूक या साली महाराजाचा जाला. आता पश्चमेस मुलतान-काबूल व पूर्वेस बंगाल-अयोध्या प्रयाग राहिली.'' यावरून मराठ्यांची राजकीय कार्यक्रमपत्रिका स्पष्ट होते.
यांच्या या राज्यविस्ताराची मीमांसा काही प्रमाणात याअगोदरही आपण केलेली आहे. शाहू महाराजांच्या काळात पहिला बाजीराव आणि श्रीपतराव प्रतिनिधी यांच्यात भर दरबारात झालेल्या वादाचा उल्लेखही झालेला आहे. प्रतिनिधींच्या मते मराठ्यांनी आधी दक्षिण दिशा सुरक्षित करावी व मगच उत्तरेच्या राजकारणात हात घालावा, तर उलट बाजीराव दक्षिणेचा मामला घरचा व म्हणून सोपा आहे; सबब उत्तरेच्या राजकारणास प्राधान्य द्यावे, या मताचा होता. शाहू महाराजांनी बाजीरावास अनुकूल कौल दिला व त्यानुसार मराठे उत्तराभिमुख झाले. पेशव्यांच्या या उत्तरायणावर राजारामशास्त्री भागवत व शेजवलकर यांनी तीव्र आक्षेप घेऊन प्रतिनिधींची बाजू उचलून धरल्याचे जाणकारांना ठाऊक आहेच. या धोरणामुळे निजाम बळावला हे त्यांचे निरीक्षण यथार्थच आहे; परंतु, मराठे जर उत्तरेत गेले नसते, तर संपूर्ण उत्तर हिंदुस्थान नादिरशहा किंवा अबदाली अशा धर्मवेड्या प्रवृत्तींच्या हाती गेला असता, हे ते विसरतात.
No comments:
Post a Comment