निजामाचा कायमचा निकाल पेशव्यांना लावता आला नाही, हे खरे आहे; पण त्याला एका मर्यादेत रोखून धरण्यात त्यांना यश आले, हेही तितकेच खरे आहे. उत्तरेत मात्र मराठ्यांच्या अभावी उत्पन्न झालेल्या निर्नायकीचा फायदा चुकीच्या शक्तींनी घेऊन हिंदुस्थानचा राजकीय नकाशाच बदलून टाकला असता. बंगालची दिवाणी घेताना इंग्रजांनी दिल्लीचे रक्षण करण्याचे कबूल केले असूनही अबदालीच्या आक्रमणाच्या वेळी ते स्वस्थ व पर्यायाने सुरक्षित राहिले. उलट मराठ्यांनी लाहोर-मुलतानच्या भानगडीत पडून व पानिपतवर धाव घेऊन नुकसान करून घेतले, असा हिशेब मांडणारे शेजवलकर, जेव्हा मराठे जेथपर्यंतच पोहचले नाहीत, तेथपर्यंत पाकिस्तानच्या सीमारेषा भिडल्या आहेत, असे सांगतात; तेव्हा त्यांच्यातील विसंगती आपली आपोआपच दृश्यमान होते.
या व्यवहाराकडे पाहण्याची मराठ्यांची वृत्ती व्यापारी फायद्यातोट्याची नसून, देश व धर्म यांच्या राहण्याची होती. त्यांच्या या कृतीला आततायी मूर्खपणा न मानता आत्मबलिदानच मानायला हवे. या बलिदानातूनच भारताचे भवितव्य घडले हे विसरता कामा नये.
No comments:
Post a Comment