हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग ३१०
अटकेवर झेंडे फडकले तेव्हा...
डॉ. सदानंद मोरे
भाग ५
उत्तरेत गेले; तेव्हा त्यांचे कोणी पायघड्या घालून स्वागत केले, असे समजायचे कारण नाही. दिल्लीच्या राजकारणात त्यांचा प्रवेश नको असणाऱ्यांचाही प्रबळ गट होताच; पण त्याला पुरून उरून मराठ्यांनी आपले सामर्थ्य आपल्या तलवारीच्या जोरावर सिद्ध केले. परिणामतः मराठे हेच रोहिले व अबदाली यांच्यापासून आपला बचाव करू शकतील, अशी खात्री पटल्यामुळेच मराठ्यांना पातशाही सनदा मिळाल्या व त्यामुळे त्यांना मुलतान, पंजाब, सिंध, राजपुताना, रोहिलखंड यांच्यासह मोगल साम्राज्याच्या सर्व सुभ्यांवरील चौथाईचा हक्क प्राप्त झाला. सार्वभौम सत्तेला करारानुसार महसूल देण्यास नेहमीच टाळाटाळ करण्यास सोकावलेल्या स्थानिक सत्ताधिशांना मराठे न आवडण्याचे कारण हेच होय. बळाचा उपयोग करून वसुली करण्याचे सामर्थ्य मराठ्यांमध्ये होते, हे वेगळे सांगायला नकोच; मात्र मराठ्यांचे सामर्थ्य कितीही असले, तरी दिल्ली आणि उत्तरेतील मराठ्यांच्या फौजा इतक्या प्रबळ नव्हत्या, की दक्षिणेतून कुमक न मागवता त्यांना अबदालीसारख्याचा प्रतिकार करता यावा. पहिल्यांदा हेच घडले. अंताजी माणकेश्वरासारखा दिल्ली प्रदेशातील मराठा सरदार अबदालीपुढे काय करणार? अबदालीने दिल्ली व आसपासचा प्रदेश लुटला. बादशहा व त्याच्या कुुटंबियांची विटंबना केली. हिंदूधर्मियांची सरसकट कत्तल केली. पंजाब-लाहोर प्रांत आपल्या घशात घातले. 1755च्या सुरवातीची ही घटना आहे. अंताजीने नानासाहेब पेशव्यांस लिहिले ः ""पातशहा रात्रंदिवस म्हणे, की हे पातशहात बाळाजी रायाची आहे, त्याचे सरदारांस सत्वर बोलावून हे काम सिद्धीस नेणे.''