Total Pageviews

Monday, 18 June 2018

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १०३

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १०३
रामचंद्र गणेश कानडे -
उत्तरपेशवाईंतील एक प्रसिद्ध सेनापति व मुत्सद्दी. शाहूनें याला इनाम दिलें होतें. नाना, साहेब व थोरले माधवराव यांच्या कारकीर्दीत कर्नाटक उत्तरहिंदुस्थान वगेरे हिंदुस्थानच्या सर्व भागांत यानें अनेक मोहिमा व कामगिर्‍या केल्या. याचें लढाईचें शिक्षण सदाशिवरावभाऊसाहेब यांच्या हाताखालीं झालें होतें. जानोजी भोंसल्यावरील थोरल्या माधवरावांच्या स्वारींत रामचंद्रपंतावर श्रीमंतांचा मुख्य भरंवसा होता. त्यानंतर लागलीच जी उत्तरेत स्वारी झाली तिचा सर्व अखत्यार पंताकडेच दिलेला होता. पानपतामुळें रजपूत, जाठ, राहिले व वजीर (सुजा उद्दौला) वगैरे लोक मराठयांच्या विरुद्ध उठले होते, त्यांची खोड मोडण्याचें काम पंताकडे सोंपविलें होतें, तें त्यानीं शिंदेहोळकरांच्या मदतीनें उत्तम तर्‍हेनें पार पाडलें. शहा अलम बादशहास इंग्रजांच्या व सुजाच्या ताब्यांतून काढून मराठयांच्या ताब्यांत आणण्याचें व दिल्लीची पातशाही पेशवाईच्या पंखाखालीं घालण्याचें अवघड काम पंतानें केलें (१७७१). बिनीवाले व कानडे यांच्यांत तंटा उपस्थित झाला तेव्हां पेशव्यानीं पंतास दक्षिणेंत परत बोलाविलें (१७७२). ही मानखंडना त्या शूर पुरुषास सहन न झाल्यानें त्यानें संन्यास घेण्याचा बेत केला, पण श्रीमंतानीं त्याची समजूत केली. यानंतर बारभाईच्या पक्षांत बरींच वर्षे पंतानें कामगिरी केली. शेवटीं खंडाळ्याच्या लढाईंत इंग्रजांशी लढत असतां पंतानें धारातीर्थी देह ठेविला (ता. १२-१२-१७८०). त्यांच पुत्र माधवराव यानेंहि मराठेशाहींत बरीच कामगिरी केली. पंताचा वाडा पुण्यास शनिवारवाडयाच्या उत्तरेस नदीच्या कांठीं होता. हा वाडा व त्याचें नक्षीकाम अतिशय प्रेक्षणीय होतें. १९२४ सालीं शनवारवाडयापुढें नवा पूल झाला तेव्हां हा वाडा पाडण्यांत आला. [पेशवेबखर; खरे. भा. ७; अहवाल १८३७;म. रि.भा. ४.]

No comments:

Post a Comment