Total Pageviews

Monday, 18 June 2018

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १०८

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १०८
शिंदे घराणे - राणोजी शिंदे :
राणोजी शिंद्यांनी १८ व्या शतकाच्या सुरुवातीस ग्वाल्हेरला शिंदेशाहीचे अधिष्ठान असणारे शिंद्यांचे संस्थान स्थापन केले. हे शिंदे म्हणजे मुळचे सातारा जिल्ह्यातल्या कण्हेरखेडच्या मराठी मातीतले, ही रयतेवर प्रेम करणारी अन मुघली सत्तेविरुद्ध अहोरात्र लढण्यास सज्ज असलेली ही रणमर्द माणसे ! राणोजी शिंदे हे बाळाजी बाजीराव पेशव्याचे निष्ठावंत सेवक होते. महापराक्रमी महादजी शिंदे हे राणोजी शिंद्यांचे सर्वात कनिष्ठ चिरंजीव होते. राणोजींनी उज्जैन हे आपले मुख्य ठाणे बनवले होते. तर आपले लष्कर ग्वाल्हेर इथे ठेवले होते. पश्चिम मध्य भारतातील विंध्याचलाच्या रांगेतला समृद्ध पठारी अन पर्वतीय प्रदेश असणारा माळवा राणोजींनी आधी कब्जे केला. त्यानंतर त्यांनी चौथाई वसुलीसाठी सुलभ ठिकाण म्हणून उज्जैन निवडले. मैनाबाई व चिमाबाई ही राणोजींच्या पत्नींची नावे. पहिल्या पत्नीपासून जयाप्पा, दत्ताजी अन ज्योतिबा ही मुले झाली तर दुसरया पत्नीपासून तुकोजी अन महादजी ही मुले झाली.
१७३७ ते १८८० मध्ये उज्जैनवर शिंदे घराण्याचे एकछत्र राज्य होते. त्या काळात उज्जैनचा खुप विकास झाला.उज्जैन ही शिंदे राज्यकर्त्यांची राजधानी होती. महाराज राणोजी शिंदे यांनी महांकालेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला, शिंदे घराण्याचे संस्थापक राज्यकर्ते राणोजी शिंदे यांचे मंत्री रामचंद्र शेणवी यांनी उज्जैन मध्ये असलेले महाकाल मंदिर बांधले. १८१० मध्ये शिंदे घरण्याची राजधानी ग्वाल्हेर मध्ये आली. शिंदे हे सातारा जिल्ह्यातील कण्हेरखेडचे पाटील होते, या घराण्यातील राणोजी शिंदे हा बाळाजी बाजीरावच्या वेळी नावलौकिकास आला. त्याने १७२६ मध्ये माळव्यात चौथाई आणि सरदेशमुखीच्या वसुलीला प्रथम सुरुवात केली १७२७-२८ पासून राणोजी शिंदेचा कार्यकाळ सुरु होतो. माळवा प्रांतातून, चौथ व सरदेशमुखी वसूल करण्यासाठी मल्हारराव होळकर यांच्या जोडीला राणोजी शिंदे यांची नेमणूक होती. माळवा प्रांताचा मोगल सुभेदार गिरीधर बहाद्दर याचा जो निर्णायक पराभव मराठ्यांनी केला त्यात उदाजी पवार, मल्हारराव होळकर यांच्या जोडीला राणोजी शिंदे देखील आपल्या पथकासोबत उपस्थित होते. १७३५ पासून राणोजी शिंदे यांनी आपले लष्करी मुख्यालय उज्जैन येथेच ठेवले. जुलै १७३६ च्या दरम्यान महादेव भट्ट हिंगणे यास पाठविलेल्या एका पत्राद्वारे राणोजी शिंदे यांची स्वराज्यनिष्ठा आणि स्वाभिमानी व्यक्तिमत्व विशेष खुलून दिसते. असे हे राणोजी शिंदे १७३५ ते १७४५ मराठ्यांचे बस्तान बसविण्याच्या कामगिरीत सतत आघाडीवरचं होते. जयपूरचा शासक सवाई जयसिंह याच्या मृत्यूनंतर त्याच्या गादीवरुन चाललेल्या वारसाहक्कात राणोजी शिंदे यांना ईश्वरसिंहाने विशेष पत्र लिहून मदतीस बोलाविले यावरून त्यांचे त्याकाळचा दरारा देखील लक्षात येतो. या केलेल्या मदतीखातर ६६ लाख रुपये राणोजी शिंदेंना मिळाले. १९ जुलै १७४५ला राणोजी शिंद्यांचे निधन झाले.

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १०७

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १०७
शिंदेशाहीचा दैदिप्यमान इतिहास -
शिवकालानंतर मराठ्यांच्या इतिहासातली रणांगणावरची सर्वोच्च पराक्रमाची शर्थ म्हणून पानिपताकडे पाहिले जाते. या सर्व धामधुमीच्या कालखंडात ज्या मराठा सरदारांनी आपल्या शौर्याची शिकस्त केली त्यात शिंदे घराणे अग्रस्थानी होते आणि पानिपतात गेलेली पत परत आणण्याचे महत्कार्य करणारे शिंदे होळकर यांचा इतिहास हा भव्य आणि उत्तुंग आहे. यातही शिंदे घराण्यातल्या महादजी शिंद्यांनी दाखवलेली मुत्सद्देगिरी व पराक्रम अलौकिक असा आहे. महादजी शिंद्यांनी उत्तर हिंदुस्थान आपल्या कब्जात घेतला होता. मध्यंतरी ज्या गोवध हत्या बंदीवरून आपल्या देशात गदारोळ माजला होता ती बंदी महादजींनी १७८५ मध्ये शहाआलम या मुघल बादशहाला आपली कठपुतळी बनवून अंमलात आणली होती. मुघल बादशहा सत्तेत असूनही हा फतवा त्यांनी अमलात आणला होता यावरून महादजींचे दिल्लीवरील वर्चस्व लक्षात यावे. उत्तर भारताचा प्राण असणारा मध्य - पूर्वेचा भाग आपल्या टापाखाली ठेवणारे धोरणी राणोजी, सर्वांग जखमांनी भरलेले असतानाही बचेंगे तो और लढेंगे असं म्हणण्याची जिगर ठेवणारे दत्ताजी, वयाच्या १६ व्या वर्षी नजिबाच्या गुरुचे कुतुबशहाचे मुंडके जमदाडाच्या एका वारात तोडणारे अन पुढे पानिपतावर हौतात्म्य पत्करणारे जनकोजी, काळाची पावले ओळखून आपला विकास साधून घेणारे जयाजी व माधवराव, स्वातंत्रोत्तर काळात राजकारणात आपली पत राखणारया विजयाराजे अन त्यांचे पुत्र माधवराव, अन आताच्या काँग्रेसमधील एक आशास्थान असलेले ज्योतिरादित्य शिंदे असा यांचा छोटेखानी परिचय देता येईल. ग्वाल्हेरचे संस्थानिक म्हणून ओळखले जात असलेल्या शिंदे घराण्याचा इतिहास सुरु होतो राणोजी शिंदयांपासून.....

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १०६

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १०६
बायजाबाई शिंदे -
एक ग्वाल्हेरची महाराणी. हिचा जन्म इ.स.१७८४ मध्ये झाला. हिच्या वडिलांचे नाव सखाराम घाटगे सर्जेराव. ही लहानपणी फार बाळसेदार व देखणी होती व घोडयावर बसण्यांत पटाईत अशी निपजली होती. बायजाबाई शिंदे हीस कित्येक इतिहासकारांनी 'दक्षिणची सौंदर्यलतिका' अशी संज्ञा दिली आहे. राजस्तानांतील कृष्णकुमारी इत्यादि लोकप्रसिध्द लावण्यवतींच्या लग्नाचे प्रसंग ज्याप्रमाणे मोठमोठी राजकारस्थाने घडविण्यास कारणीभूत झाले, त्याप्रमाणे बायजाबाई हिचे लग्न हे देखील महाराष्ट्रांतील एक राजकारस्थान घडवून आणण्यास कारणीभूत झाले.
बाजीरावाने सर्जेरावाचे मन वळवून बायजाबाईचे लग्न दौलतराव शिंद्याशी लावून दिले. हे लग्न पुणे मुक्कामी इ.स. १७९८ च्या मार्च महिन्यांत मोठया थाटाने झाले. लग्न झाल्यानंतर, बायजाबाई नेहमी लष्कराबरोबर असे, व तिचा सर्व राजकारणामध्ये प्रवेश असे.
पुढे दौलतराव १८२७ साली मरण पावला. तेव्हा बायजाबाईने दत्तक न घेता सर्व कारभार आपल्या हातांत घेतला. परंतु तिने संस्थानच्या गादीचा धनी करण्याकरिता दत्तक पुत्र घ्यावा अशी सर्व नागरिक जनांची इच्छा होती, व तशी इच्छा ब्रिटिश रेसिडेंट ह्यानेंहि व्यक्त केली होती. नागरिकांच्या इच्छेवरून तिने शिंदे घराण्यापैकी पाटलोजी म्हणून जे पुरूष होते त्याचा पुत्र मुकुटराव हा बारा वर्षांचा असता दत्तक घेतला. बायजाबाईची एकंदर राजकीय कारकीर्द इ.स. १८२७ पासून इ.स.१८३३ पर्यंत सरासरी सहा वर्षेच चालली, परंतु तेवढया अवधीमध्ये तिने मोठया दक्षतेने व शहाणपणाने राज्यकारभार चालविला, पुढे राज्यांत जनकोजी शिंदे व बायजाबाई यांचा बेबनाव होऊन राज्यांत थोडे बंडहि झाले. बंडाची परिसमाप्ति होऊन सर्वत्र शांतता झाल्यावर बायजाबाई ग्वाल्हेर मुकामी जयाजीराव शिंदे याच्याजवळ राहिली. ता. २७ जून इ.स. १८६३ रोजी, ही राजकारस्थानी व शहाणी स्त्री कैलासवासी झाली.
विद्वानांनी हिच्याबद्दल जे धन्योद्गार काढिले आहेत, ते तिची खरी योग्यता व्यक्त करतात. तत्कालीन 'मुंबई ग्याझेट' पत्रांत बायजाबाईसंबंधाचे जे मृत्युवृत्त आले त्यांत असे म्हटले होते की, ''बेगम सुमरू, नागपुरची राणी, झांशीची राणी, लाहोरची चंदाराणी आणि भोपाळची बेगम या सुप्रसिध्द स्त्रियांमध्ये ही राजस्त्रीहि आपल्या परीने प्रख्यात असून हिने अनेक वेळा आपल्या देशाच्या शत्रूशी घोडयावर बसून टक्कर दिली होती.'' (पारसनीस - महाराणी बायजा-बाईसाहेब शिंदे याचें चरित्र)

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १०५

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १०५
कदम इंद्रोजी -
कदम घराण्यांतील एक शाखेंत कंठाजी कदमाच्याच काळांत इंद्रोजी कदम या नांवाचा एक प्रख्यात मराठा सरदार होऊन गेला. हा सातारा जिल्ह्यांतील साप गांवचा राहणारा असून, आपल्या पराक्रमाच्या जोरावर फार योग्यतेस चढला होता. शाहू महाराज दक्षिणेंत येऊन त्यांनीं सातारा येथील छत्रपतींच्या गादीवर आरोहण केलें त्यावेळीं इंद्रोजी कदम याचें प्राबल्य महाराष्ट्रामध्यें इतकें होतें कीं त्याचें नांव केवळ कर्दन काळासारखें वाटत होतें. त्याच्या शौर्यप्रभावाप्रमाणें त्याचें वैभव व थाटहि फार मोठा होता. त्याच्या जवळ ७०० निवडक सैन्य असून घोडेस्वारहि बरेच होते. तो आपल्या शौर्यप्रभावाच्या योगानें इतका गर्विष्ठ व प्रमत्त झाला होता कीं, त्यास आपल्यापुढें सर्व जग तुच्छ दिसत असे. एवढेंच नव्हे तर त्यानें आपल्या पागेंतील खाशा घोड्यांस रुप्याचे नाल लावून, असा हुकूम सोडला होता कीं, हे रुप्याचे नाल पागेंतील लोकांनीं न घेतां, शत्रूच्या हद्दींत पडूं द्यावे व ते परक्या लोकांनीं पाहून आपल्या वैभवाचें कौतुक करावें. एके वेळीं शाहू महाराजांच्या कानांवर इंद्रोजी कदम याच्या गर्विष्ठपणाची हकीकत सादर झाली. तेव्हां त्यानीं मुद्दाम त्यास निमंत्रण करून सातार्‍यास बोलाविलें. इंद्रोजी कदम मोठ्या थाटानें आपल्या सैन्यानिशीं सातारा येथें आला व आदितवार पेठेंतील माळावर तळ देऊन राहिला. त्यानें शाहू महाराजांस असा निरोप पाठविला कीं, ''तुमचे पेशवे मुख्य प्रधान तुम्हांस भेटावयास आले म्हणजे लष्करच्या नौबदी व नगारे बंद करितात, त्याप्रमाणें मी करणार नाहीं. मी माझ्या सर्व इतमामानिशीं डंकेनौबदी वाजवीत तुमच्या भेटीस येईन.'' शाहूमहाराजांनीं त्याप्रमाणें त्यास परवानगी दिली व त्याची रंगमहाल राजवाड्यांतील मुख्य दरबारांत भेट घेण्याची योजना केली. इंद्रोजी कदम यास आपल्या वैभवाचें प्रदर्शन करण्याची फार हौस असल्यामुळें, तो आपल्या सर्व सैन्यास कडीतोडे घालून व आपण स्वतः नाना प्रकारचे रत्‍नालंकार परिधान करून शाहूमहाराजांचे भेटीसाठीं नगारे व नौबदी वाजवीत राजवाड्यांत आला. शाहूमहाराजांस त्याचा हा डामडौलपणा पाहून फार तिरसकार वाटला. परंतु त्यांनीं तो व्यक्त न करतां, मुद्दाम त्याचा गर्वपरिहार करण्याच्या उद्देशानें आपलें स्वतःचें जडजवाहीर व रत्‍नालंकार आपल्या खंड्या कुत्र्याच्या अंगावर घातले आणि आपण अगदीं साधा सफेत पोषाख घालून दरबारास आले. इकडे इंद्रोजी कदम मोठ्या थाटानें व दिमाखानें आपल्या रत्‍नालंकारांचें प्रदर्शन करीत शाहूमहाराजांच्या भेटीस आला. त्याची अशी कल्पना होती कीं, शाहूमहाराजांच्या दरबारांतील अष्टप्रधान व उमराव हे माझें बहुमूल्य जवाहीर पाहून दिपून जातील आणि खुद्द शाहूमहाराज माझें वैभव पाहून खालीं मान घालतील. परंतु दरबारांत प्रवेश करितांच सर्व सरदार लोक व खुद्द शाहूमहाराज यांचा साधेपणा व शुभ्र पोषाख पाहून त्यास फार आश्चर्य वाटलें, व खंड्या कुत्र्याखेरीज दुसर्‍या कोणाच्याहि अंगावर अलंकार नसलेले पाहून तो मनांत फार ओशाळला व लज्जित झाला. आणि शाहूमहाराज छत्रपति हे केवळ अवतारी पुरुष आहेत, त्यांचा मी विनाकारण अपमान करण्याची पापबुद्धि मनांत धरिली, असा पश्चात्ताप पावून त्यानें शाहूमहाराजांच्या पायांवर डोई ठेविली आणि त्यांची क्षमा मागितली. शाहूमहाराजांनीं क्षमा करून त्याचा योग्य आदरसत्कार केला. इंद्रोजी कदम यानें शाहूमहाराज यांस सोन्याच्या मोहरांचें सिंहासन करून त्यांजवर बसविलें व आपल्या जवळचें जडजवाहीर त्यांस अर्पण केलें. महाराजांनीं त्यास व त्याच्या पदरच्या लोकांस मोठी मेजवानी देऊन पोषाख बक्षीस दिले. तेव्हांपासून इंद्रोजी कदम याचें नांव सातारच्या दरबारांत फार प्रसिद्धीस आलें. शाहूमहाराज मनुष्याची परीक्षा करण्यांत कसे चतुर असत व दुसर्‍या कोणाचाहि गर्व कसा युक्तीनें परिहार करीत ह्याची ह्या आख्यायिकेवरून साक्ष पटते. इ.स. १७३७ (मार्च) मध्ये बाजीराव साहेबांनीं झील तलाव (दिल्ली) येथें दिल्लीकर मोगलांचा जो पराभव केला, त्या लढाईंत ''इंद्रोजी कदम यांसी बोटास गोळी लागोन दोन बोटें उडोन गेलीं.'' या वेळीं इंद्रोजी हा राणोजी शिंदे यांच्या हाताखाली सरदार होता. पुढें रामराजे यांनां बार्शी पानगांवहून आणविण्याकरितां जी पेशव्यांची विश्वासाची मंडळी गेली होती. तीत इंद्रोजीहि होता (जानेवारी १७५०) (इ.सं. ५.७; म.रि.म.वि.).

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १०४

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १०४
जगदाळे
"जगदाळे घराणे" हे मुळचे धार येथील राजे पवार यांच्या घराण्याची शाखा होय.पवार घराण्यापासून जगदाळे,निंबाळकर आणि पोकळे हि घराणी निर्माण झाली.जगदाळे घराणे ९६ कुळी मराठा घराणे आहे.हे घराणे १६५९ पासून मराठा साम्राज्यात म्हणजेच स्वराज्यात समाविष्ट झाले.पानिपत च्या युद्धात गाजवलेल्या भीम पराक्रमासाठी हे घराणे प्रसिद्ध आहे.
अनुक्रमणिका
• १ घराण्याचा विस्तार
... • २ इतिहास
• ३ गणेशोत्सवाची सर्वात जुनी परंपरा
• ४ संदर्भ
घराण्याचा विस्तार
बहामनी काळापासून या घराण्याला सुमारे १६८ गावाची मसूर परगणा येथील देशमुखी होती.नंतर शिवशाही आल्यामुळे वतनदारी पद्धत बंद झाली आणि देशमुखी च्या ऐवजी जगदाळे घराण्याने सर-पाटीलकी स्वीकारली.मसूर परगण्यातीलच काही गावाची पिढीजात सर-पाटीलकी शिवाजी महाराजांकडे सुद्धा होती.त्यावेळी या घराण्याला मसूर,गराडे व दौंड-लिंगाळी येथील दीडशे गावांची सर-पाटीलकी मिळाली[१].जगदेवराव जगदाळे हे या घराण्याचे मूळ पुरुष समजले जातात.
इतिहास
मसूरच्या जगदाळ्यांनी आदिलशाहीची परंपरेनं चाकरी केली. अर्थात महाराजांना विरोध करणं त्यांना भागच पडलं. महादाजी जगदाळे हे तर शाही नोकर म्हणून अफझलखानाच्या सांगाती प्रतापगडच्या आखाड्यात उतरले. त्यात खान संपला. शाही फौजेची दाणादाण उडाली. महाराजांनी त्याचे हात तोडले. याच महादाजीला आठदहा वर्षाचा पोरगा होता. जिजाऊसाहेबांनी अगदी आजीच्या मायेनं या पोराला आपल्यापाशी सांभाळला[२]. त्याला शहाणा केला. तो स्वराज्याचाच झाला.
सरदार जगदेवराव जगदाळे,सरदार महादजी जगदाळे,सरदार मल्हारराव जगदाळे,सेनापती आबाजीराव जगदाळे,सरदार यशवंतराव जगदाळे,सरदार पिराजीराव जगदाळे असे अनेक पराक्रमी मराठा योद्धे या घराण्यात होऊन गेले.
सरदार यशवंतराव जगदाळे व सरदार पिराजीराव जगदाळे यांनी पानिपतच्या लढाईत भीम-पराक्रम गाजवला दत्ताजीराव शिंदे यांच्यासमवेत ते नजीबखान याच्या विरुद्ध बुराडीघाट च्या लढाईत लढले.शिंदे यांच्या बरोबरच या दोन सरदारांनी आपल्या प्राणाची आहुती या संग्रामात दिली[३].
गणेशोत्सवाची सर्वात जुनी परंपरा
या संदर्भातच १७३२ मधील नोंद उपलब्ध असून, गराडे या सासवडजवळील गावाची सर-पाटीलकी जगदाळे यांची होती.तर पोट-पाटीलकी थोरले बाजीराव पेशवे आणि त्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी विकत घेतली होती. ती नानासाहेब पेशवे यांनी पुरंदरे यांना देऊन टाकली. या पाटीलकीचे हक्क आणि मानपान याविषयी कलम असून, "गणेश गौरी पुरंदऱ्यांच्या पुढे व मागे जगदाळे यांच्या' असा स्पष्ट उल्लेख आहे.गराडेसारख्या गावातदेखील गणेश-गौरीची प्रथा पूर्वापार चालत होती आणि तेथेसुद्धा मिरवणुकीने मानाच्या क्रमांकासह प्रतिष्ठापना होत होती.वंश परंपरेनुसार पहिला मान जगदाळे यांना होता [४]
संदर्भ
1. ↑ जगदाळे कैफियत- मराठा इतिहासाची साधने
2. ↑ बाबासाहेब पुरंदरे - मातृत्व,नेतृत्व आणि कर्तृत्व
3. ↑ पानिपत- विश्वास पाटील आणि पेशवा दफ्तर
4. ↑ भारत इतिहास संशोधक मंडळ

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १०३

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १०३
रामचंद्र गणेश कानडे -
उत्तरपेशवाईंतील एक प्रसिद्ध सेनापति व मुत्सद्दी. शाहूनें याला इनाम दिलें होतें. नाना, साहेब व थोरले माधवराव यांच्या कारकीर्दीत कर्नाटक उत्तरहिंदुस्थान वगेरे हिंदुस्थानच्या सर्व भागांत यानें अनेक मोहिमा व कामगिर्‍या केल्या. याचें लढाईचें शिक्षण सदाशिवरावभाऊसाहेब यांच्या हाताखालीं झालें होतें. जानोजी भोंसल्यावरील थोरल्या माधवरावांच्या स्वारींत रामचंद्रपंतावर श्रीमंतांचा मुख्य भरंवसा होता. त्यानंतर लागलीच जी उत्तरेत स्वारी झाली तिचा सर्व अखत्यार पंताकडेच दिलेला होता. पानपतामुळें रजपूत, जाठ, राहिले व वजीर (सुजा उद्दौला) वगैरे लोक मराठयांच्या विरुद्ध उठले होते, त्यांची खोड मोडण्याचें काम पंताकडे सोंपविलें होतें, तें त्यानीं शिंदेहोळकरांच्या मदतीनें उत्तम तर्‍हेनें पार पाडलें. शहा अलम बादशहास इंग्रजांच्या व सुजाच्या ताब्यांतून काढून मराठयांच्या ताब्यांत आणण्याचें व दिल्लीची पातशाही पेशवाईच्या पंखाखालीं घालण्याचें अवघड काम पंतानें केलें (१७७१). बिनीवाले व कानडे यांच्यांत तंटा उपस्थित झाला तेव्हां पेशव्यानीं पंतास दक्षिणेंत परत बोलाविलें (१७७२). ही मानखंडना त्या शूर पुरुषास सहन न झाल्यानें त्यानें संन्यास घेण्याचा बेत केला, पण श्रीमंतानीं त्याची समजूत केली. यानंतर बारभाईच्या पक्षांत बरींच वर्षे पंतानें कामगिरी केली. शेवटीं खंडाळ्याच्या लढाईंत इंग्रजांशी लढत असतां पंतानें धारातीर्थी देह ठेविला (ता. १२-१२-१७८०). त्यांच पुत्र माधवराव यानेंहि मराठेशाहींत बरीच कामगिरी केली. पंताचा वाडा पुण्यास शनिवारवाडयाच्या उत्तरेस नदीच्या कांठीं होता. हा वाडा व त्याचें नक्षीकाम अतिशय प्रेक्षणीय होतें. १९२४ सालीं शनवारवाडयापुढें नवा पूल झाला तेव्हां हा वाडा पाडण्यांत आला. [पेशवेबखर; खरे. भा. ७; अहवाल १८३७;म. रि.भा. ४.]

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १०२

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १०२
देवकाते घराणे भाग २
सुभेदार बळवंतराव देवकाते- संभाजीराजांना औरंगजेबाने ठार मारल्यानंतर स्वराज्यातील कित्येक सरदार वतनाच्या लालसेने मोघलांना मिळाले. अशा बिकट प्रसंगी संकटात सापडलेली स्वराज्यरूपी नौका पैलतीरास लावण्याचे काम सेनापतींच्या दिमतीला राहून देवकाते यांनी पार पाडले. जे सरदार स्वराज्याशी एकनिष्ठ राहिले. अशा सरदारांना राजाराम महाराजांनी इ. स.वी सन १६९० मध्ये वतने दिली. त्यात देवकाते घराण्याचाही समावेश आहे. यात धर्मोजी बळवंतराव देवकाते यांना प्रांत कडेवळीत मधील ८ महालांचे सरपाटील हे वतन दिले. धर्मोजींच्या मृत्यूनंतर त्यांचे पुञ सुभानजी यांना "बळवंतराव" तर मकाजी यांना "हटकरराव" असे किताब व सरंजाम देऊन त्यांचा गौरव केला. पुढे राजाराम महाराज व सेनापती संताजी घोरपडे यांच्यात बेबनाव निर्माण झाल्याने घोरपडे यांचे सेनापती पद काढून घेण्यात आले. व त्यांच्या दिमतीला असलेली स्वराज्याची फौज ही काढून घेण्यात आली. ही घटना १६९६ साली घडली तेव्हा सेनापतींच्या दिमतीला असलेले मकाजी हटकरराव आपले भाऊबंद व फौजेसह जिंजी येथे राजाराम महाराजांना जाऊन मिळाले. स्वराज्याच्या व नंतर साम्राज्याच्या अनेक महत्वपूर्ण लढायांत देवकाते सरदारांचे योगदान बहुमूल्य राहिले.
सरदार देवकाते यांचा सरंजाम- शाहूने देवकाते यांना लष्करी खर्चासाठी एकूण १६ महाल व २१ गावे सरंजाम म्हणून दिली होती. हा सरंजाम बळवंतराव व हटकरराव यांच्यात ३:२ प्रमाणात विभागला गेला. पुढे दोघांच्याही सरंजामात वारसांच्या संख्येच्या प्रमाणात भाग होत गेले.बळवंतराव घराण्याच्या ३ तकसीम (भाग) सरंजामापैकी २ तकसीम चव्हाजी बळवंतराव बाळगून असत तो असा.- प्रांत सुपे बारामती : ६ गावे प्रांत कडेवळीत : ३९ गावे प्रांत बालेघाट : अर्धा महाल सरकार नांदेड: १महाल व ३ गावे सरकार पाथरी : १ कसबा सरकार माहूर : ६ महाल दीड कसबे व १ गाव एकूण : साडे सात महाल अडिच कसबे व ४९ गावे.
सरंजामातील संबंधीत प्रांत,गाव व गावांवरील एकूण हक्काची सविस्तर माहितीही सरंजामपञात दिलेली असे. सरंजाम हा वंशपरंपरेने चालणारा अधिकार नसे. त्यामुळे त्या सरंजामात वारंवार बदल ही होत असत. अनेकदा सरंजाम जप्त अथवा कमी करण्यात येई. तसेच तो वेळप्रसंगी वाढविण्यातही येई.सरंजामातील काही गावे इनाम करून दिली असल्यास अशा गावांवरील संबंधित सरदारांचा अधिकार माञ वंशपरंपरेने चाले. देवकाते यांना बारामती येथील कन्हेरी,सोनगाव व निरावागज तर कडेवळीत मधील कोंढार चिंचोली,कवढणे व दिगसल अंब अशी ६ गावे शाहूने व पेशव्यांनी प्रांत गंगथडी मधील सेंदूरजने अशी ७ गावे वंशपरंपरेने इनाम होती. [३]

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध भाग १०१

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग १०१

देवकाते घराणे भाग १

अतिप्राचीन काळापासून हट्टी लोकांमध्ये अग्निवंशी (अग्नीउपासक) यांची परंपरा आहे. अश्या हाटकर अग्निवंशी योध्यांनी महाराष्ट्रामध्ये मोठा पराक्रम गाजवलेला दिसून येतो. त्यामध्ये आतापर्यंत धायगुडे, पांढरे, बंडगर, शेळके, रूपनवर, खताळ आणि देवकाते इत्यादी सरदारांचे उल्लेख मिळाले आहेत. देवकाते घराणे हे अग्निवंशी असून चाहमान या अतिप्राचीन टोळीसंघ/कुळातील आहे.[१]

सरदार जिवाजीराजे देवकाते (सुभेदार बळवंतराव)- बळवंतराव हे विजापूर दरबारातील एक मातब्बर सरदार. विजापूरच्या पातशाहाकडून वंशपरंपरेने जहागीर, मनसब, इनामे व वतने घेऊन सेवाचाकरी करत होता. पहिल्या शाहूने देवकाते यांना दिलेल्या वतनपञातील नोंदीनुसार विजापूरकरांकडून कर्यात बारामती प्रांत सुपे येथील २२ गावांची सरपाटीलकी तर ६ गावांची पाटीलकी त्यास वंशपरंपरेने मिळाली होती. तसेच मौजे कन्हेरी हा गाव वंशपरंपरेने इनाम देण्यात आला तर मौजे सोनगाव या गावी एक चावर (६० एकर) जमिन इनाम देण्यात आली होती अशी नोंद सापडते.[२]

छञपती शिवाजी राजांनी रयतेचं राज्य उभे केल्यानंतर स्वताच्या जहागिरीला व वतनाला लाथ मारत देवकाते स्वराज्यात सामील झाले. अफजलखान मोहिमेतही शिवाजी राजांकडून देवकाते लढल्याच्या नोंदी मिळतात. इ.स.वी सन १६७४ च्या शिवछञपतींच्या राज्याभिषेकाला उपस्थित असलेल्या सरदारांच्या यादीमध्ये देवकाते घराण्यातील "भवानराव" व "बळवंतराव" यांचा उल्लेख येतो. "भवानराव" व "बळवंतराव" ही केवळ नावे नसून ते किताब असल्याचं शाहू व पेशवे कालीन कागदपञांवरून सिद्ध होतं. प्रत्यक्ष शिवछञपतींने दिलेले हे किताब देवकाते सरदारांनी स्वराज्यासाठी दिलेलं महत्वपूर्ण योगदानच अधोरेखित करतात. शिवछञपतींनी बळवंतराव यांना मौजे सोनगाव या गावी सवा चावर(७५ एकर)जमिन इनाम दिली असल्याची नोंद ही या कागदपञांमध्ये सापडते. आजही या गावातील देवकाते मंडळींची निवासीवस्ती इनामपट्टा म्हणूणच ओळखली जाते.